शब्दवर्षा :पाक्षिक सदर विषय : अर्थशास्त्र 14 ऑगस्ट 2023


"ताई या महिन्यात चार हजार रुपये जास्त द्याल का?"
कामवाली अजिजीने विचारतं होती.

"देते नं! मुलीची फी भरायची असेल नं?"

"नाही हो ताई नवीन मोबाईल घ्यायचा आहे. तीन वर्ष झाली बघा हा मोबाईल घेऊन".

नवरा आणि माझी लेक गालातल्या गालात हसतं होते. दोघांनीही नुकताच नवीन मोबाईल घेतला होता आणि मी माझ्या जुन्याला कवटाळून बसली होती.

मी अर्थातच कामवालीला नाही म्हणाले. दुसर्‍या दिवशी तिनेही माझा काॅल घेतला नाही आणि कामाला उशीरा आली.

मला ते अपेक्षित होतंच त्यामुळे मी शांत होते. कारण माझं आणि तिचं अर्थशास्त्र वेगळं होतं.

परवा मी एककिलो टमाटर घेऊन आले. मैत्रीण सोबत होती. ती चिडली आणि म्हणाली कशाला एवढे महाग टोमॅटो घ्यायचे?
मी म्हणाले की आपण जर बाराशे रुपये डझन हापूस घेतो तर एकशे चाळीस रुपये किलो टमाटर का नाही घ्यायचे?
परत अर्थशास्त्र क्रॉस झाली होती.

हे असं पदोपदी जाणवतं. वेतन, खर्च, महागाई आणि बचत कसे मॅनेज करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते सेवा व उत्पादनांच्या निर्मीती, वितरण आणि वापर या विषयाचा अभ्यास करते,ही ढोबळमानाने असलेली व्याख्या. शेवटी मनुष्य आला की समाज आला आणि मग उच्च दर्जा, निम्न दर्जा, विविध प्रकारचे आर्थिक स्तर आलेत. हे स्तर मग विषमता निर्माण करतात.

ऋण काढून सण साजरा करू नये हा जो जुन्या लोकांचा समज होता तो आता मात्र वेशीवर टांगून ठेवल्या गेला आहे. कारण कर्ज, व्याजदर, परतावा यावर तर अर्थकारण चालतं आहे.
अंथरुण पाहून पाय पसरणे ही किती योग्य म्हण आहे पण एका सिनेमात एक तरुण मुलगी वडिलांना म्हणते जरा अंथरुण मोठ करान! स्वतःच्या इच्छांना मूठमाती देत मुलीच्या क्लासेसची फी भरणाऱ्या बापाचं आणि पदोपदी बापाच्या गरिबीची लाज बाळगत जगण्याऱ्या मुलीच अर्थशास्त्र वेगळं असेल यात नवल ते काय?

परवा एका दुकानात गेले होते तर शाळेतील पाच मुले चॉकलेट्स घ्यायला आली. तीन चॉकलेट्स पाच जणांनी घेतली आणि साहजिकच बाहेर पडल्यावर भांडायला लागली. मी स्कूटीच्या डिक्कीत सामान ठेवतांना ऐकत होती सगळं. तीन चॉकलेट्स आणि पाच जण! शेवटी त्यातला एक मुलगा इतर मुलांना म्हणाला की त्याने एकट्याने एक रुपया दिला आहे आणि बाकीच्यांनी पन्नास पैसे. त्याने एक अख्ख चॉकलेट घेतल आणि उरलेल्या चौघांनी दोन चॉकलेट्स अर्धी अर्धी वाटून खाल्ली. मला कौतुक वाटलं कारणं अर्थशास्त्र त्यांना समजले होते. (हा प्रसंग खरा आहे)

कुठे शिकतात हे सगळं ?

एकदा आम्ही आणि आमचे फॅमिली फ्रेंड फिरायला गेलो होतो. एक भिखारी आला, खूप भूक लागली आहे असं म्हणायला लागला. सोमने त्याला पैसे दिले.
माझी नाराजी दिसलीच.

वर्षाजी आप उपवास रखती है उस दिन शामको क्या करती हैं?

कुछ नहीं खाना खाती हूँ, दिनभर उपवास रहेता हैं।

उसके पहले?

आणि हा प्रश्न ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा राहिला. संध्याकाळी उपवास सोडायचा म्हणून दुपारीच दोन भाज्या, आमटी, कोशिंबीर करून ठेवायची. बायकोचा उपवास म्हणून नवरा कौतुकाने गोड आणून ठेवतो आणि या भिकाऱ्याचा उपवास किती तासांचा, किती दिवसांचा असेल माहीत नाही.
.... आणि किती खरा असेल ते ही माहीत नाही.

मी म्हणाले, "सोमजी बात तो समझ मे आयी लेकिन ये आदमी भी तो काम करके पैसा कमा सकता हैं न?"

"काम कौन देगा उसको? आप इसको कामपे रखेंगी, मै रखूँगा, नहीं। भिख नही मॉंगेगा तो और क्या करेगा?सब लोगोंमे सुसाईड करनेकी हिम्मत नही होती।"

बेरोजगारी हा पण तर अर्थशास्त्राचाच एक महत्त्वाचा भाग आहे पण भिक मागण्याचा व्यवसाय करणारी पिढी देशाची अर्थव्यवस्था कुठे नेऊन ठेवत असेल? का मित्राच्या बोलण्यात तथ्य असेल? तो भिकारी खरंच लाचार असेल. कदाचित..

मला आठवतय एकदा आम्ही बाहेरगावी चाललो होतो. मी नेहमी बरोबर पाण्याची बाटली आणि बिस्किटे ठेवतेच, सवय. त्या दिवशी पण घेतलं होतंच. पण थोड समोर गेल्यावर कळले की एक अपघात झाला आहे आणि निदान एक दीड तास तरी ट्रॅफिकजाम असणार होता. अर्ध्या तासाने तहान लागली तर पाण्याची बाटली संपत आली होती. आजूबाजूला काहीच दुकान नव्हती. तेवढ्यात काचेवर टकटक झाली, बघते तर काय एक लहान मुलगा पाणी बॉटल घेऊन उभा होता. मला एवढे कौतुक वाटले त्याचे. मी त्याला म्हणाले, अरे थोड पाणी दे नं! हे मागतांना नकळतपणे जीभ जड झाली होती आणि डोळ्यासमोर त्या भिकाऱ्याचा चेहरा आला!!

पण त्या मुलाने उत्तर दिले , "दीदी एक बॉटल पचास रूपया, चाहिए क्या? और दो घंटा ट्रॅफिक जाम रहेगा।"
20 रु ची पाण्याची बाटली 50 रु ला?

अर्थशास्त्र छान जमलं होत त्याला. मी शंभर रुपये देऊन दोन बाटल्या विकत घेतल्या. मागणी वाढली की किंमती वाढतात हा अर्थशास्त्राचा मूळ सिद्धांत मला चांगलाच ठाऊक होता आणि पाणी बॉटलचा पुरवठा करणारा सध्या तरी तो एकच मुलगा द्रृष्टीपथात होता.

- वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »