काल रात्री अचानक मैत्रीणीचा फोन आला. बोलणं झाल्यावर कळलं की तिच्या मुलीच आणि जावयाचं जोरात भांडण झालं आणि तिची मुलगी घर सोडून निघून आली आहे. मी जाऊन खरंतर काय बोलणार होती पण मैत्रिणीला बरं वाटेल म्हणून गेले.
दोघीही मायलेकी चेहरा पाडून बसल्या होत्या. गेल्या वर तिची मुलगी रडायला लागली.अगदी नासुकल्या कारणासाठी घर सोडून आली होती ती आणि आता आपणहून नवऱ्याकडे परत जायला अहंकार आड येत होता.
सगळं ऐकल्यावर मी तिला विचारले की भांडण झाल्यावर नवरा गेला का घर सोडून?
तर नाही म्हणाली.
"मग तू का आलीस घर सोडून?" मी तिला विचारले.
थोडक्यात तू दाखवून दिलेस की ते घर तुझं नाही, तूझा त्या घरावर हक्क नाही!
(ही मात्रा बरोब्बर लागू पडली)
"मावशी, अग माझ्या हे लक्षातच नाही आलं! आता जाते आणि बघतेच त्याच्याकडे, नाही त्याला घराबाहेर काढलं तर बघं!"
मी आणि मैत्रिणीने डोक्याला हात लावला आणि तिला म्हणाले, "अग माझे आई, त्यालाही एखादी मावशी असेलचं की!"!(दोघेही सुखात नांदतात आहे. एकमेकांच्या हक्कांचा आदर करत).
गंमतीचा भाग सोडला तर बघा हक्क हा शब्द किती आवडतो आपल्याला! हक्कासारखा अधिकारही प्रिय असतो मनुष्याला!
हक्क ह्या शब्दाचा आवाका खरोखरच खूप मोठा आहे.
मग हक्क आणि अधिकार यातील पुसट सीमारेषा कोणती? हक्कात मालकीची, अरेरावीची भावना जास्त असते आणि अधिकाराला कुठेतरी योग्यतेचा, न्यायाचा मापदंड लावलेला असतो. अर्थात फरक करणे कठीण आहे पण दोघांचाही अतिरेक नको व्हायला. कर्तव्याची बूज दोन्हीकडे राखली असावी मग हक्क आणि अधिकार उठून दिसतील.घटनेने प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याची अंमलबजावणी झाली तर देशात नक्कीच सुख-शांती नांदेल.
मला हे मिळायलाच हवं, तो माझा हक्क आहे. हे आमचं बुकींग आहे, इथे बसायचा हक्क आमचा आहे आणि विजयी मुद्रेने आपण तो हक्क बजावतो. पण एखाद्या वयस्कर व्यक्तीला वरच्या बर्थवर चढता येतं नसेल तर त्याला आनंदाने आपला बर्थ देणं हे आपलं कर्तव्य आहे हे आपण सोयिस्करपणे विसरतो. (काही मदत करणारे ही असतात) कारण लहानपणापासून हक्काची जाणीव तीव्र असते. आम्ही बसमध्ये जागा पकडायला धावत जाऊन सीट पकडायचो.तीन सीट असल्या की मधे बसायचो आणि दोन्ही हात बाजूला पसरुन आपले नातेवाईक येईपर्यंत सीट पकडून ठेवायचो. त्या सीटवर बसण्याचा हक्क फक्त आम्हांलाच असायचा. एकदा एका माणसाने सीटवर बाहेरुनच खिडकीतून रुमाल टाकला आणि आम्ही रांगेत उभं राहून बसमध्ये चढलो तर त्या सीटसाठी आमच्याशी भांडायला लागला. मावशी म्हणाली की तुम्ही उद्या ताजमहालावर रुमाल टाकाल तर काय ताजमहाल तुमचा होईल का? मग चूप बसला.
म्हणजे जमेल तिथे माणूस हक्क सांगत असतो. महाभारत का घडलं? हक्क डावलल्या गेल्याची भावनाच त्या मागे होती.
अशावेळी ध्रुवबाळाची आठवण येते! किती योग्य मार्ग निवडला. अढळपद मिळवले!! हक्काच!
सामान्य माणसाला जमेल का हे? वाद घालणे हाच ज्याचा हक्क, अधिकार आणि कर्तव्य पण आहे.
जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी होणारा रक्तपात नवीन नाही. काश्मिरवर हक्क सांगण्यासाठी शेजारील देश किती उतावीळ आहे हे जगजाहीर आहे.
संसारात कुटुंबप्रमुख हा कुटुंबातील लोकांवर हक्क सांगतो. तो म्हणेल ती पूर्व दिशा असते. कोणीही त्याला विरोध करायचा नसतो. म्हणजे जो पालनपोषण करतो तोच हक्क गाजवू शकतो का? म्हणजे हक्क आणि आर्थिक क्षमतेचा संबंध आहे का? मग आजच्या पिढीला ही भाषा कशी समजेल? सतत पैशाची धमकी द्यायची का? तू माझं नाही ऐकलंस तर तूझा पॉकेटमनी बंद! ही धमकी, धाक पालकांनी दाखवला की मग मुलं ऐकणार आणि मिळवती झाली की बापाशी पण तशीच वागणार.
मी हे लिहीते आहे कारण हक्कासोबत मालकीची भावना नको. ती आली की सगळं बिनसत जातं.
एखादी स्त्री नवऱ्याला न विचारता पाच रुपये पण खर्च करु शकत नाही. तिच्या हक्कावर गदा येते का? तिला त्या डावलल्या गेलेल्या हक्काची जाणीव असते का? की तिच्यासाठी दाद मागणार कोणीच नसतं. सोन्याच्या पिंजऱ्यात राहाणाऱ्या पक्षाला पण तो सोनेरी पिंजरा नको असतो तर स्वातंत्र्य हवं असतं, हक्काच!
मध्यंतरी हक्कसोड पत्राबद्दल वाचण्यात आले. बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच वेळा मुलींना आई-वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळत नाही, तो हक्क सोडावा लागतो. त्यासाठी मुलीला हे पत्र लिहून द्यावे लागते आणि समजा एखादीने हक्क सोडलाच नाही तर माहेरचे लोक तिच्याशी संबंध तोडतात. म्हणजे हक्काची अंमलबजावणी येन तेन प्रकारे होतेच होते. स्त्रीयांच्या हक्काच्या बाबतीत सध्या गाजत असलेला 'रो विरुद्ध वेड' हा गर्भपाताच्या संबधित असलेला खटला गाजतो आहे. गर्भपाताचा हक्क स्त्रीला आहे की नाही?तिच्या शरीरावर तिचा हक्क आहे की नाही? याबाबत विविध विचार समोर येत आहे.
पण तो जन्माला येऊ घातलेला जीव, त्याच्या जगण्याच्या हक्कासाठी कसा लढणार?त्याला जगायचं असेल तर?
विषण्णता येते.
समान नागरी कायदा हक्क,आरक्षणाचा हक्क, वारसा हक्क,मतदानाचा हक्क, मालकी हक्क, आता तर lgbtq च्या अधिकारासाठी लढा देणं सुरू आहे. डोळे उघडे ठेवून बघितले तर बरेच हक्क आजूबाजूला वावरतांना दिसतील.काही एकमेकांच्या हातात हात घालून चालतात, तर काही समांतर चालतात तर काही विरोधात!
*मेरा हक मुझसे कोई नही छिन सकता।* हा हिंदी सिनेमातला डायलॉग आपल्याला तोंडपाठ असतो पण *मी कोणाच्याही अधिकारावर/हक्कावर गदा आणणार नाही* हा डायलॉग आपण कधीच ऐकला नाही. जो अत्यंत आवश्यक आहे. नागरिकशास्त्र शंभर मार्कांच ठेवायला हवं आणि इतिहास वीस मार्कांचा!
कारण *स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच* हे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक हळूहळू विस्मृतीत जातात आहे आणि राजकीय चिन्हांच्या हक्कांसाठी लढणारी नवीनच पिढी उदयास येत आहे.