हा विषय वाचल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. बाटली काय?हा काय विषय आहे का ? पण खरं सांगते आजच्या माॅडर्न युगात बाटली शिवाय लोकांचे पान हलत नाही.आता ही अतिशयोक्ती आहे का? तर मला नाही वाटतं पण शेवटी तुम्ही ठरवा काय ते! मी काही तुम्हाला बाटलीत उतरवायचा प्रयत्न करत नाही आहे.
झालं काय इतक्यात 8/10 वेळा विमान प्रवास करावा लागला. पंधरा /सोळा / तास नुसतेच बसून करायचं काय , मग निरिक्षण सुरू झाले आणि प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे हवाई सुंदरीच्या ट्रॉलीमधील लहान लहान सुंदर बाटल्या!
ती प्रेमाने विचारते Only Water? No drinks?
आणि मी हसून तिच्याकडून पाण्याचा ग्लास घ्यायची. आजकाल जवळपास सगळ्यांनीच परदेश प्रवास केलेला असतो. हा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल.
Only Water?
मला आलं लक्षात ही बया असं का विचारते आहे ते!
आजूबाजूला बसलेल्या स्त्रियांनी मागितलेल्या आणि रिचवलेल्या बाटल्या मला थक्क करुन गेल्या. बाजूला एक मुलगी बसली होती. तिने सुरवातीला दोन वाईनच्या बाटल्या घेतल्या.
मग दोन छोट्याश्या चपट्या बाटल्या आणि ग्लास. रम म्हणतात ते समजलं मला. मनात आलं अग एकटी प्रवास करते आहेस तर जरा जपून! पण आता वयोमानानुसार कुठे काय बोलायचे याची जाणीव नक्कीच झाली आहे. मग तर मी लंडनला गेल्यावर दुसरी फ्लाईट येईपर्यंत बसल्या बसल्या पाणी सोडून उरलेल्या सगळ्या रंगीत पाण्याची माहिती काढली.
वाईन, बिअर, रम, व्होडका ही नावे कळली. वाईन ही वाईट नसते, कोणीही पिऊ शकतं हे सामान्य ज्ञान वाढलं. मी कोणीही नाही याची तीव्र जाणीव झाली आणि स्वतःचीच पाठ थोपटली.
पण माझ्यासारख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच आहेत हे ही लक्षात आलं.
आमच्या समोरच दोन आज्या एका 3/4 वर्षाच्या लहान मुलीला घेऊन भारतात यायला निघायला होत्या. दोघींपैकी एकीने दोन अस्वल घेतले, दुसरी आज्जी नको म्हणाली. मीच निश्वास सोडला. चला एकीला तरी जाणीव आहे की तिच्या सोबत लहान मूल आहे ते! त्या दुसर्या आजीने दूधाची बाटली त्या लहान मुलीच्या तोंडात दिली आणि मग दुसर्या आजीनेही बटन दाबून मस्तपैकी एक चपटी छोटी बाटली मागवली. तशी ती पोरगी त्या चपट्या सुंदर बाटलीसाठी हट्ट करायला लागली आणि जे भोकाड पसरलं की विचारता सोय नाही. काय बोलावं? तुम्ही समोर काय ठेवता आहात या पिढीच्या? आणि मग आपणच त्यांना नावं ठेवायची.
मला छान छान गोष्टी सांगणारी, आमच्या सोबत भांडत भांडत अष्टचंग आणि पत्ते खेळणारी माझी आजी आठवली.
दिवाळीत एका ठिकाणी डिनरला जायचं होतं. तिथे दोघीजणी एवढ्या प्यायला होत्या की त्यांचे नवरे त्यांना सांभाळून नेत होते. दारू प्यायलेला बच्चन काय झोकांड्या खाईल एवढ्या त्या दोघी झोकांड्या खात होत्या.
खरी स्त्री मुक्ती तिथे दिसली मला. नाहीतर आमच्या लहानपणी बाई प्यायलेल्या नवऱ्याला ओढत ओढत घरी घेऊन जायची फक्त इथे एकच कमी होती की दारू पिऊन तर् झालेला नवरा बायको मुलांना झोडपायचा इथे त्या दोघी तेवढे नव्हत्या करत. कदाचित पूर्ण स्त्री मुक्ती त्यांच्या अंगात भिनली नव्हती अजून!
दारू पिऊन पुरुषांची बरोबरी करण्यापेक्षा नवरा चूकला तर काडकन त्याच्या कानाखाली वाजवायची हिंमत जेव्हा स्त्री दाखवेल तेव्हा ती खरी स्त्री मुक्ती! दारुची बाटली नवऱ्याच्या डोक्यात फोडायची की त्याच्या बरोबरीने त्याच बाटलीतून दारु प्यायची हा प्रत्येकीचा स्वतंत्र विषय आहे.
मी मात्र हादरले होते त्यांची ती अवस्था पाहून. आत्तापर्यंत बायका पण घेतात हे ऐकून होते पण प्रत्यक्षात बघून ते पचवणं कठीण होतं.(त्या दोघींची पचवायची कॅपॅसिटी मी बघितली होती)
स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी करायलाचं हवी पण देवाने मुलं जन्माला घालायचे एक वरदान आपल्याला दिले आहे त्याचे थोडेतरी भान ठेवावे ही माफक अपेक्षा!
आणि दारु प्यायल्यावर जेव्हा तुमचे झोक जातात तेंव्हा आधार देणारा एखादा राक्षस असूच शकतो आणि तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याची पण जाणीव असूद्या कारण अजूनही स्त्री ही लग्नाच्या वेळेस पवित्रच लागते(आता हा पण एक वादाचा विषय होऊ शकतो) त्यामुळे आपल्या सत्वाची काळजी घ्या आणि काय आहे समाज दारु पिऊन रस्त्यावर पडलेल्या पुरुषाला स्विकारतो पण पाय घसरलेल्या बाईला स्विकारणारा कोणी नसतो.
लहानपणी अल्लाउद्दीन त्या राक्षसाला बाटलीत बंद करतो, तसेच काहीसे होऊन हा दारू नावाचा राक्षस बाटलीत बंद करता येईल का?