जन्मभूमी: आपण जन्म घेतला ती धरणी आणि म्रुत्यच्या वेळेस आपल्या देहाची राख ज्या मातीत मिसळून जाते ती जन्मभूमी.
आपल्या जन्मभूमी साठी प्राण देणारी पिढी अलौकिक आणि अद्वितीय अशी होती. आपण सुदैवी,फुकटात स्वातंत्र्य मिळाले. पण ते टिकवणे हे आपल कर्तव्य आहे.
जन्मभूमीसाठी आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे फार मोठे महत्त्व आहे. कदाचित आपल्या पिढीने त्याचा दाहक अनुभव घेतलेला नाही पण जन्म भूमीसाठी प्राण देणारे देशभक्त आणि आत्ता ही देशाच्या सीमेवर तैनात असणारे सैनिक यांचे महत्त्व जो देश पारतंत्र्यात आहे तोच जास्त चांगल्या रीतीने समजू शकतो.भारतदेशाला हा लढा आणि त्या देशभक्ताचे महत्त्व चांगलेच ठावूक आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाचे वेळी बरेचसे युक्रेन चे लोक त्यांच्या देशाच्या सैनिकांसोबत,खाद्यांला खांदा लावून जन्मभूमीच्या रक्षणासाठी उतरले होते.त्यात स्त्रिया पण होत्या. म्हणजे वेळ आली कि प्रत्येक जण जन्मभूमीसाठी प्राणपणाने लढतोच.
पण जेव्हा श्रीलंकेतील बातम्या बघते तेव्हा मात्र मन विषण्ण होत.म्हणजे काय ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर रक्षण करतो त्याप्रमाणेच अंतर्गत बाबींवर लक्ष ठेवायला एक उत्तम राज्यकर्ते हवेत जे आर्थिक, सामाजिक आणि न्यायिक बाजूंचे रक्षण करतील,देशात शांतता आणि सुव्यवस्था ठेवतील.हे नाही जमल तर मात्र मग कोणत्याही शत्रूंची गरज पडणार नाही तो देश आपोआपच रसातळाला जाईल.
थोडक्यात काय तर प्रत्येक जण जागरूक नागरिक बनून जन्मभूमीच्या प्रगतीत हातभार लावेल: टँक्स वेळेवर भरून, प्रत्येक धर्माचा आदर राखून, स्वच्छता राखून, कायद्याची बूज राखून, मतदानाचा अधिकार निभावून तर मला वाटत खरचं एक स्वर्ग धरणीवर अवतरेल आणि ती जन्मभूमी धन्य होऊन जाईल.
*माझ्या कवितेतला नागरिक असेल तर मग काही खर नाही.*
आहे मी जागरुक नागरिक।
अधिकार माझे जाणतो ।
येता गदा त्याच्यावर
चवताळून मी उठतो
घर स्वच्छ ठेवणे कर्तव्य मानतो।
भरलेली कचराकुंडी नजरेआड करतो।
नियम असतात पाळायचे
हे जगाला सांगतो।
पळवाटा शोधण्यात मी
धन्यता मानतो।
दिवसा पर्यावरण रक्षणाचे
मी धडे देतो।
रातोरात जुन्या
झाडांची कत्तल करतो।
इंधन वाचवा हा नारा दुनियेला देतो।
माणशी प्रत्येकी कार
मी विकत घेतो।
गरीबांच्या बद्दल कळकळीने बोलतो।
भुकबळी मी
तटस्थपणे पहातो।
सहिष्णुतेवर भाषणबाजी मी करतो।
मत देतांना मात्र
धर्माची बुज मी राखतो।
देशाचा विकास
करुन कधी कधी।
मी पहिले माझा
स्वार्थ साधतो।