विषय : जगण्यातील गणिते
शतकोटी रसिक
*ललित लेखन स्पर्धा*
गणित आलं कि पक्के आराखडे आले, सुत्रे आलीत, ती सोडवण्याची विशिष्ट पद्धत आली. थोडक्यात गणित म्हणजे रुक्ष! मग त्यातील सुत्रे जगण्यात कशी काय अंमलात आणणार? कारण इथे तर भावभावनांची समीकरणे असतात. गणितात त्रिकोणाचे तीनच कोन असतात पण आयुष्यात त्रिकोणाचा चौथा कोनही असतो. गणितात 1+1 = 2 होतं पण खऱ्या आयुष्यात एक आणि एक ग्यारह करणारे असतात. तिथल्या बेरीज वजाबाक्या वेगवेगळ्या असतात.
दहा फळे दोन मुलांमध्ये समान वाटायची असेल तर प्रत्येकाला पाच येईल पण जर वाटणारी आई असेल तर भुकेल्या मुलाला ती एक फळ जास्त देईल. 6 आणि 4 प्रत्येकाला मिळतील. हे चूक होईल गणिताच्या दृष्टीने पण जीवनात हे असंच घडतं आणि असाच हिशोब असतो. तो योग्य असतो की नाही हे ज्याचे त्याचे ज्याने त्याने ठरवायचे.
लग्न मुलाचं आणि मुलीच असतं पण खर्च सगळा मुलीकडचे करतात. बसचं पन्नास लोकांच भाडं, जेवणाचा खर्च मुलीकडचे देतात? का आणि कशाला? लग्न काय तिचं एकटीचं असतं का? अर्थात जीवनात ह्याची उत्तरे नाहीत पण सगळ्या का? ची उत्तरे गणितात पद्धतशीरपणे देता येतात. अगदी .00000१ इतकी काटेकोरपणे, अचूक!
जगतांना इतके काटेकोरपणे जगता येत नाही आणि जगूही नाही. दोन मित्रांमध्ये हॉटेलमधील जेवणाचा हिशेब कोणीतरी एकजण करतो. आत्ताच्या श्रीमंत असलेल्या मित्राने कॉलेज जीवनात दुसऱ्याकडे आमटी भात ओरपला असतो, फाके असतांना, त्या आमटीभाताची किंमत कधीच करता येणार नसते पण ही जाणीव महत्त्वाची असते.
जाणीवेचे कोणतेचं सूत्र गणितात नाही, तिचे परिमाण पण नाही पण जीवनात ती लागू होते, महत्त्वाची असते आणि ती समोरच्याला दुसर्याच्या वागण्यात, बोलण्यात दिसते.
गणितात जाणीव वगैरे नसते.
अंदाज नसतात. सगळ वजनमापात असतं आणि जीवनात कोणतं माप कोणाच्या पदरात केव्हा पडेल हे काहीच सांगता येत नाही पण गणितात मात्र अचूक उत्तर असतात.काळ,काम, वेगाची गणित बरोब्बर येतात.
अर्थात पैशाची गणित जीवनात फार महत्वाची असतात. तो करोडपती आहे हे कळलं की लोकांची त्या व्यक्तीकडे बघायची 'फुटपट्टी' बदलते. नंबर लाईनवर ती +++अधिकाधिक होते आणि एखादा कफल्लक आहे असं वाटलं कि नंबरलाईनवर त्याची फुटपट्टी - - - - - वजा दाखवते आणि कधीतरी बिचारा 'शुन्या'तच जातो.
जीवनात शुन्यात गेलेला माणूस बरबाद झाला असे मानतात पण गणिती भाषेत शुन्य हा कोणत्याही निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा असतो. आहे की नाही गंमत!
थोडक्यात काय जगण्याची गणिते वेगळी असतात, तिचा शाळेतील गणिताशी काहीही संबंध नसतो. तिथले आराखडे पूर्णपणे वेगळे असतात.
शाळेत ज्याला गणित कठीण जातं तो आयुष्याची गणितं मात्र काहीवेळेस सहजपणे सोडवतो.
अर्थात शाळेतील आणि आयुष्यातील दोन्ही गणितं नीटपणे सोडवणारा मात्र यशस्वी म्हणून गणला जातो.