एक अनोळखी ओळख

दीपकचा फोन आला, आवाज जरा भरलेलाच होता. महत्त्वाचे काम आहे, घरी येऊ का म्हणून विचारत होता. मी खरंतर वामकुक्षीच्या विचारात होतो पण त्याचा आवाज ऐकून ये म्हणालो त्याला. दीपक आणि मी गेली वीस वर्षे एकाच ऑफिसमध्ये होतो. त्याच्या बोलघेवड्या स्वभावामुळे कधी एकमेकांचे दोस्त बनलो ते समजलंच नाही. दोघांची मुले साधारणपणे बरोबरीची होती. होळी, दीवाळी सगळे सण, बाहेर हिंडणे आमचे सोबतच असायचे. दीपकच्या मुलाने म्हणजे अविनाश ने बिल्डरचा व्यवसाय सुरु केला होता आणि छानपैकी तो सेटल झाला होता. माझा मुलगा आणि मुलगी इंजिनिअर होऊन सेटल झाले होते. आम्ही दोघे अजूनच जवळ आलो. रिटायरमेंट नंतर मस्त जगत होतो. 7/8 दिवसांपूर्वी अविनाशची बायको त्याला सोडून गेली होती. दीपक जरा नाराज होता.सुन मुलाला सोडून गेल्यावर. आम्हांला ही जरा आश्चर्य च वाटलं होतं. कारण रेवती अतिशय चांगली मुलगी होती. मला वाटलं म्हणूनच तो माझ्याशी बोलायला येतो आहे. दहा मिनिटांत दीपक आला तो 1/2 कागदपत्रे घेऊनच. त्याला माझी गॅंरटर म्हणून सही हवी होती. अविनाश ला बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला होता आणि त्यासाठी त्याला लोन हवं होतं आणि गॅंरटर म्हणून सही हवी होती. त्यात काय मी लगेच केली. दीपकवर म्हणजेच इनडायरेक्टली अविनाशवर माझा विश्वास होता. आणि खरं सांगायचं तर अविनाश ची बायको त्याला सोडून गेल्यामुळे अविनाशच्या बाबतीत मी जरा हळवा झालो होतो. लहानपणापासून त्याला बघत आलो होतो. करुन टाकली सही. सही घेतल्यावर दीपक मात्र लगेच निघाला. मी पण निश्चित होऊन झोपलो. पुढे काय वाढून ठेवले आहे याबाबत अज्ञभिज्ञ! 5/6 दिवसात दीपकचा काहीच फोन नव्हता आणि आज एका दुसर्‍या मित्राचा फोन आला आणि तो सांगत होता की अविनाशने 3/4 कोटींचा घपला केला आहे, बॅंकेने त्याच्यावर केस ठोकली आहे. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी दीपकला फोन करतो आहे, तो नाॅट रिचेबल येतो आहे. मी अविनाशला फोन लावला तो पण उचलत नव्हता. तशीच रिक्षा केली आणि दीपकच घर गाठले तर बाहेरच्या गेटला कुलुप! तितक्यात माझ्या बॅंकेतल्या मित्राचा फोन आला, तो सांगत होता की माझ नाव गॅंरटरच्या जागी आहे. माझ्या घरावर जप्ती येऊ शकते. मी कसाबसा घरी गेलो. बायकोला सांगितले. ती तर रडायलाच लागली. घरासाठी खाल्लेल्या खस्ता आठवल्या आणि मुख्य म्हणजे इतका मोठा विश्वासघात! अविनाश चे हे सर्व उद्योग दीपकला माहीत होते तरीही त्याने माझी गॅंरटर म्हणून सही घेतली होती. त्याची कातडी वाचवायला! जीवाचा संताप झाला. दोन दिवसात जप्तीची नोटीस आली. वकील केला. चूक माझीच होती. आंधळ्यासारखा विश्वास ठेवला होता. अविनाशचे सगळे गुन्हे बाहेर आले. घर असून मी बेघर झालो होतो. माझंच घर जे मी पंचवीस वर्षांपूर्वी 2/3 लाखात बांधले होते आज ते च घर मी परत 60 /70 लाखाला विकत घेतले. नशीब फक्त हे च की बॅंकेतल्या ओळखीमुळे जेव्हा बॅंकेने घर विकायला काढले तेव्हा मला लगेच कळवले आणि माझं घर मला असं परत मिळालं. आमच्या सगळ्या गोड आठवणी त्या घरात होत्या आणि शेवटची कडू आठवणही! इथेच माझ्या मित्राने मगरमच्छ के आंसू बहाए थे! फक्त ते गोष्टीतील माकड हुशार होतं आणि माझं मात्र खरंच माकड झालं होतं. घराचे वासे असेही फिरतात! एक साधी सही केली होती विश्वास ठेवून पण आज त्याची किती मोठी किंमत मला द्यावी लागली. मनस्ताप झाला तो वेगळाच! ओळखीच्या व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवला होता मी. त्याची शिक्षा आता भोगत होतो. कोण कोणाला ओळखायला चुकलं होतं? की ओळखच चुकीची होती? का सगळेच केव्हातरी, एकमेकांशी असेच अनोळखी वागतात ? आणि ती ओळख अनोळखी होऊन जाते. वर्षा हेमंत फाटक, पुणे




- Varsha Hemant Phatak





« Prev Next »