अर्थपूर्ण आशयाची ही कविता स्त्रियांवर पुरुषप्रधान व्यवस्थेने घातलेली बंधने या विषयावर प्रकाश टाकते. कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकात बहीण आणि आई या दोघींबद्दलही उत्कट भावना दिसून येतात आणि वडिलांबद्दल थोडासा आकस!
कदाचित तो कुठेतरी मनात खोलवर रुतलेला सल या कवितेत प्रगट झाला आहे की काय असे वाटतं राहतं.
पहिल्या कडव्यातच स्त्रीच्या घरगुती कामांचे यथोचित वर्णन केले आहे. सडा घालणे, रांगोळी काढणे ही कामे सांसारिक बाईच्या जीवनातील अविभाज्य अंग होते. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कामाला जुंपलेल्या सर्व स्त्रियांचे चित्र या कडव्यात रेखाटलेले आहे. चूल आणि मूल एवढेच तिचे जग आहे हे ठळकपणे दिसून येते. रुढी आणि परंपरेच्या नावाखाली स्त्रियांना घरात डांबून ठेवण्याऱ्या समाजातील रुढींचा कवी विरोध करतात.
रांधा, वाढा नि उष्टी काढा एवढेच तिला माहीत होते. बाहेरच्या जगाची दूरदूरपर्यंत तिला जाणीवच नव्हती. रहाटगाडग्याला जुंपलेली गरीब गाय होती ती. गोठ्यात गाय आणि घरात माय! दोघीही प्रेमळ पण दावणीला बांधलेल्या. विचारस्वातंत्र्य नसलेल्या!
आंदणांची उभी समई!
या शब्दाचा एक विशिष्ट अर्थ आहे. हुंड्याबरोबर आलेली समई म्हणजेच हुंडा घेऊन झालेले लग्न! हा यामागील अर्थ आहे.म्हणजे तिथेही स्त्रीचा अपमानच!खरेदी - विक्रीचा व्यवहार! स्त्री म्हणजे फक्त एक वस्तू! मला वाटतं कवीला समाजातील चूकीच्या प्रथांवर आसूड ओढायचे आहे. पुरुषीवर्चस्वाला कुठेतरी शह द्यायचा आहे.
कोसलातील संदर्भ बघितले तर या कवितेत हे ठळकपणे दिसून येतात. आई, बहीण या स्त्री च्या रूपाबद्दल असलेली माया आणि कणव या संपूर्ण कवितेत जाणवते.
कसल्या गुणगुणत्या आरत्या?
सुरवातीलाच कविने घरंदाज व्यथांना हा शब्द लिहीला आहे.
तेव्हाच्या काळी खरोखरंच घरंदाज घरातील मुलींना गाणे गाण्याची परवानगी नव्हतीच .पण इतकेच काय तोंडातून ब्र काढायचीही हिंमत नव्हती. मग फक्त पुटपुटणेच नशिबात होते आणि मग तिच्या दबलेल्या इच्छा कदाचित त्या कावळ्यांच्या तोडून फुटत असाव्यात. मेल्यानंतर! कावळा हे प्रतिक मला वाटतं मारल्या गेलेल्या इच्छांसाठी वापरले गेले आहे. मरणोत्तर पिंडाला कावळा शिवला की मोक्ष मिळतो पण इथे तर इतक्या इच्छा दबलेल्या आहे की ती पिंपळाची फांदीच काळीकुट्ट झाली आहे. इतके कावळे आहेत आणि कोणकोणत्या अगणित इच्छांचा गळा घोटला गेला आहे, काय माहीत! आता त्यांचे ओरडणे मात्र अंगावर येत आहे.तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसणारी सोशिक स्त्री डोळ्यासमोर येते. एक पिडिता!
तिचा डोईवरचा पदर कधीच खाली येऊ द्यायचा नाही हा अलिखित नियम किती दिवस पाळायचा? कधी तुम्ही तोंड वर करून बोलणार? अन्यायाचा प्रतिकार करणार? की फक्त अंगठ्याने जमीन उरकून तुमचा दुबळा विरोध दर्शवणार?खरंतर इथे कविला स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणे अपेक्षित असावे.
'उंबरठ्यावत रुतवलेल्या बांगड्यांच्या नक्षीलाच कळणारी' हे प्रतिक घराबाहेर पडणारी स्त्री आणि तिच्यासाठी आखलेली लक्ष्मणरेषा आहे हे जाणवते. बांगडीच्या रुतवलेल्या काचा हा शब्द महत्त्वाचा आहे. त्या काचा मुद्दामून रुतवलेल्या आहेत. स्त्री बाहेर पडली तर होणारा काच आणि जाच काय असेल हे ती जाणून आहे किंबहुना या जखमेचा अनुभव तिच्या आधीच्या स्त्रियांनी घेतलेला तिच्या दृष्टीस पडला आहे आणि आता ती कशी काय हिंमत करणार पाऊल बाहेर टाकायची? त्या रुतवलेल्या काचा तिला नामोहरम करणार. बेगडी समाजाची बेगडी वृत्ती अशी समोर येते.
'कुणासाठी ही अबोल संथ वाटपाहणी'
अनेक पुरुष तेव्हाच्या काळी 'अंगवस्त्र' बाळगून असतं. ते घरंदाजपणाचे, पौरुषत्वाचे लक्षण मानले जायचे आणि सर्व माहीत असूनही स्त्रिया हे सहन करायचा. केव्हाही नवऱ्याच्या स्वागताला तिने तयार असावे हा अलिखित नियम होता. तिच्यासाठी मात्र टोचणारी मर्यादा! घराबाहेर पाऊल टाकलेली स्त्री कुलटा ठरवली जायची. केवढा हा विरोधाभास! किती पिळवणूक!
विधवांना तर अपशकुनी ठरवले जायचे. कोणासमोर यायची पण चोरी होती!
'पहाटेचे फटफटीत कपाळ' या ओळीत पण किती गहन अर्थ दडला आहे.
पहाट झाली की सगळीकडे फटफटफत! उजेड पडतो पण या पांढऱ्या कपाळामुळे सगळा 'उजेडच' आहे म्हणजे सुखाचा दुरवर पत्ता नाही. नशिबात फक्त भोग आहेत. कविने अतिशय जवळून बायकांची दुःखे बघितली आहे हे समजतं.
तिची पाऊले, तिची मर्यादा फक्त न्हाणीघर ते पडवी एवढीच आहे.थोडक्यात स्त्रीने जे काही करायचे ते चार भिंतींच्या आत राहुनच! हे तिला बहाल केलेले स्वातंत्र्य!
परकराच्या किनारीवर भरलेल्या बिनपायांच्या मोराची भुलावण! या ओळींत किती सुंदर आणि मनाला भिडणारा आशय व्यक्त झाला आहे.
मोराची चाल खरंतर डौलदार! बघत राहावी अशी पण पायच नसतील तर तो नाचणार कसा? आनंदविभोर होणार कसा?
मनातील सल त्या नक्षीतून उमटला असेल का?की ती स्वतःच एक मोर आहे.
त्याला पिसारा आहे पण तो फुलवून नाचण्याचा अधिकार नाही. स्त्रियांची गत हीच होती.
आहे ते झाकूनच ठेवायचे, पदर अंगभरच घ्यायचा. तेच खरे संस्कार! घुंगट ओढणाऱ्या बायकांना खरंच चेहरा असतो का? इथे चेहरा म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची ओळख कविला अभिप्रेत असावी. आरशात तरी काय प्रतित होत असेल? तिथे तरी स्वतःच्या नजरेला नजर एखादी स्त्री देत असेल का? चेहराच नसलेल्या विद्रूप शिल्पासारखा या विषण्ण करतात. एखाद्या शिल्पाचा जर चेहराच नसेल तर ते विद्रूपच दिसणार किंबहुना चेहराच नाही तर बघणारे डोळे नाही आणि विरोध करणारे तोंडही नाही. थोडक्यात स्त्री ने पुरुषांनी आखून दिलेल्या मार्गावर चालायचे. किती मोठा गहन अर्थ दडलेला आहे या ओळीत.
शेवटी कवी म्हणतो की माझे अंगण तरीही तुम्ही रांगोळीने सजवले आहे पण ते पांढऱ्या रंगानेच कारण तुमच्याच आयुष्यात जर रंग नाही आहेत तर ते रांगोळीत तरी कसे उतरणार?
ती पांढरी , उदासच राहाणार.
जोवर घराला घरपण देणारी स्त्री सुखात नसेल तोवर ते घरही सुखी नसणार. पण हे समजून घेणारी कुटुंबव्यवस्था हवी. दुर्दैवाने कविच्या नजरेला ती कधीच अनुभवता आली नाही. सतत अत्याचारित पीडीताच आढळून आल्या. त्या जाणिवेतूनच इतकी करुणरस असणारी कविता जन्माला आली.
मी, माझे, मलाही असे शब्द कवितेत आलेले आहेत. हा 'मी' खरंच कोण आहे?
हे स्त्रीचे अंतर्मुख करणारे, तिच्या वेदनांना समजून घेणारे कथन आहे. हे कथन करणारा नक्कीच विशाल हृदयी असावा. स्त्रीला तिच्या सामर्थ्याची, ताकदीची जाणीव करुन देणारा किंवा बायकांचे दुःख जाणणारा एक समाजसुधारकही!
की एक सखा? कृष्ण?
ज्याने द्रौपदीचेही अंतरंग जाणले आणि गांधारीचेही!
पण शेवटी वाटतं हा 'मी' एक सामान्य माणूसच असेल तर फार बरे होईल. माणसाने माणसाला समजून घेणे गरजेचे! स्त्री असो वा पुरुष! मला तरी हाच अर्थ गवसला या आशयगर्भ कवितेतून!