मी पुण्यात आले तेव्हा लक्ष्मी रोड ते तुळशीबाग आँँटो केला होता. तेव्हा माझी बहिण म्हणाली अग काय डोक्यावर पडली आहेस की काय ?
आणि जेव्हा तिने मला सोबत नेऊन ते अंतर दाखवल तेव्हा मला वाटलं खरच एका मिनिटांत आपण पोचलो असतो. म्हणजे मी खरच डोक्यावर पडले होते कि माझ्या डोक्यात भूसा भरला होता? पण नंतर मात्र मी डोक्याचा वापर करायला लागले. शेवटी पुणेकर झालेच.
असे अनुभव खुपदा येतात. प्रत्येक जण दुसऱ्याला डोकं नाही हे दाखवायचा जीवापाड प्रयत्न करत असतो.
पण जेव्हा शिक्षक सगळ्यांसमोर जरा कमी आहे का? (डोकं) अस विचारायचे तेव्हा मात्र नसलेल्या डोक्यात राग जायचा. बाईंनी डोक ठिकाणावर आहे का अस विचारलं कि जाम डोक सटकायच.
मात्र जेव्हा इतिहासाच्या पुस्तकात वाचायचो कि लोकमान्य टिळक सरकारला उद्देशुन विचारतात कि सरकारच डोक ठिकाणावर आहे का? तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो.
खरच डोक्याला काहीतरी खाद्य हव असत. नाहीतर empty mind devil’s workshop अस होत.
लहान मूल त्रास द्यायला लागल कि आपण म्हणतो जा रे तिकडे डोक नको खाऊस पण एखादा मित्र सल्ले द्यायला लागला कि आपण म्हणतो डोक नको पकवूस.
पण जेव्हा मोठ्या माणसांच डोक काम करेनास होत तेव्हा मात्र मजेदार प्रसंग घडतात.
एकदा माझ्या आईने मीठ म्हणून खाण्याचा सोडा भाजीत टाकला. भावाने वरतून मीठ मागितले तर परत तोच डबा. भाऊ म्हणाला अग आई तो खायचा सोडा आहे. अरे म्हातारपणीन डोकच काम नाही करत बघ.
एकदा आमचे शेजारचे काका काकूंना घेऊन सिनेमाला गेले. परत येतांना स्कूटर स्टँडवर गेले. स्कूटर सुरू केली आणि काकूंना बस म्हणाले. तेवढ्यात ट्रफिक पोलिसाने स्कूटर थोडी समोर घ्यायला सांगितली म्हणून काकू उतरल्या कारण जरा चढ होता. तर काकांनी स्कूटर समोर घेतली आणि किक मारून सरळ घरी. त्याची मुलगी म्हणाली बाबा आई कुठे आहे? ही काय मागे बसलीय आणि मागे काकू नव्हत्याच. परत गेले तर काकू आपल्या चालत चालत येत होत्या.काकांच्या डोक्याची नंतर किती शकले झाली असतील हे सांगणे न लगे!
माझे गणिताचे सर म्हणायचे अग किती डोक खातेस?कांदे बटाटे भरले आहेत कि काय डोक्यात?
थोडक्यात जिथे जिथे आमचा मान आला/आली (दोन्ही अर्थाने) तिथे आमच डोक चालेनास झाल आणि आमच्या डोक्याच खोक झाल.
आम्ही मात्र आमच्या तीर्थरुपांचा न्हाव्याचा खर्च खूप आधीच कमी केला होता.
रावण नक्की कोणत्या डोक्याच ऐकत असेल असा बाळबोध प्रश्न सध्या माझ्या एकुलत्या एका डोक्याला पडला आहे. शिणल आहे बिचार.