चातक

चातक

बऱ्याच गोष्टींमधे, कवितेत चातक पक्षाचा उल्लेख सापडतो. चातक पक्षी हा चंद्राची, त्याच्या शीतल किरणांची आतुरतेने वाट पहात असतो. मला वाटत आपल्यात ही एक चातक पक्षी लपला आहे कि जो कधीतरी कोणती न कोणती इच्छा पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पहात असतो.

कधी आई मुलाची, लहान मुल आईची, प्रियकर -प्रेयसीची, शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पहात असतो. एवढेच कशाला एखाद्या माझ्या सारख्या टवाळ मुलाने शाळा सुटण्याची सुद्धा आतुरतेने वाट पाहिली असेल. थोडक्यात काय तर वाट पहाणे हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे अस मला वाटत. (वाट लावणे हा नसावा) मग एखादी व्यक्ती D3 आणि B12 च्या रिपोर्ट ची पण चातकासारखी वाट पहात असेल. असो हा गंमतीचा भाग झाला. पण कधी कधी वाट पहाण हे अंगावर येत. एक एक क्षण पहाडाएवढा वाटतो. त्याच्याशी निगडीत हा प्रसंग.

9/11 चा Attack झाला तेव्हा आम्ही US ला होतो. सकाळी 7:45 ला मिस्टरांनी मुलाला शाळेत सोडल आणि ते आँफिसला गेले. मी आणि माझी मैत्रिण फिरून आलो आणि चहा घेत नाही तर ह्यांचा फोन. पहिले Tv on कर. Twin towers वर Attack झाला आहे. बापरे ! ऐकूनच धडधडायला लागल. तितक्यात मधू तेच सांगत आली. Tv वर तेच दाखवत होते. मी लगेच मुलाच्या शाळेत फोन लावला तर लागत नव्हता. आँफिसला लावला तर मिस्टर फोन उचलत नव्हते. आता मात्र अवसान गळाल होत. फोन हातात धरून मी रिंग वाजण्याची वाट बघत होते पण नाही. ती मला झुलवत होती. मनातल्या मनात महाराजांच नाव घेतल आणि फोन लावला. तर लागला. प्रचिती येतेच. मी ह्यांना लगेच घरी यायला सांगितले कारण मला मुलाला शाळेतून घरी आणायच होत. हे यायच्या आधीच मी खाली जाऊन उभी राहिली. एक एक क्षण जाता जात नव्हता.

हे आलेच. जीव भांड्यात पडला. जे झाल ते फार भयानक होत. शाळेत जाईपर्यंत जीव थाऱ्यावर नव्हता. तिथे गेलो तर टिचर म्हणाल्या it is our responsibility, don’t get panic!!

मी म्हणाले नाही आम्हाला त्याला घरी न्यायच आहे. मी जरा माझ बळ दाखवलच. आम्ही मुलाला घेऊन घरी आलो तर कळल आमचा एक मित्र WTC च्या त्याच फ्लोअर ला होता जिथे ते first फ्लाईट हिट झाल होत. अक्षरशः जिवाचा थरकाप झाला. देवासमोर हात जोडले आणि तो सुखरूप असावा असा धावा करत होते. मधूनच फोन बंद पडत होते पण त्या फोनची चातकासारखी वाट पहात होतो आम्ही सगळेजण. तो फोन आला ती वाईट बातमी घेऊनच. त्याची body नाही सापडली. शक्यच नव्हते. आँफिसच्या सूत्रांनी confirm केल होत कि तो त्याच फ्लोअर ला होता.

आधी आजुबाजूला राहणारे अमेरिकेन लोक hi, how are you doing? वगैरे विचारायचे. दुसऱ्या दिवसापासून ते मान फिरवून जाऊ लागले. एक काका राहूलशी नेहमी बोलायचे. ख्रिसमस ला आमच्या दाराशी दोन toy truck gift ठेवले होते. ते अंकलनीच ठेवले होते हे आम्ही ओळखून होतो. पण ते आज नाही बोलले. मुलाला ते एकदम जाणवल. म्हणजे आपली चुक नसतांना आपल्याला सहन कराव लागत होत.

Twin towers उभ करायला किती वर्षे लागली असतील पण कोसळायला एक मिनिट ही नाही. दोन महिने आधीच आम्ही बघून आलो होतो. त्यामुळे त्याची भव्यता लक्षात आली होती आणि आज ते एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल होत.

इंदिरा गांधीजींच्या हत्येच्या वेळेस एका धर्माच्या लोकांना काय काय सहन कराव लागल हे आपण पाहिले होते मग आपण तर दुसऱ्या देशात आहोत आणि ते त्यांचा राग फक्त न बोलता दाखवत होते. बस्स!! ते मान्य करण भाग होत.

पण हळूहळू परिस्थिती निवळली. त्यांना ही कळल कि इंडियन लोकांचा ह्यात काहीच हात नाही आहे. पण मी मात्र अंकलच्या बोलण्याची वाट पहात होते. चातकासारखी!!

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »