खूपच कठिण असत निरोप घेण पण तेवढच महत्वाचही असत न! नाहीतर पुढे जाणार कसं? पण या वर्षाला खरच काय आणि कसा निरोप द्यायचा?
2019 मधे आणि 2020 मधे जमीन अस्मानचा फरक पडला. सार जग वेठीस आलं. पण खरच नाटक नाही, सिनेमा नाही, हाँटेलिंग नाही, नातेवाईक आणि मैत्रिणींच गेट टुगेदर नाही. सकाळी उठून घाईघाईने टिफिन करण नाही. क्लास घेण नाही. काकू मला हे परत समजावून सांगा म्हणून मागे लागणारी मुले नाही. मुलीला क्लास ला सोडण आणण नाही. काहीच नाही. Society च्या बाहेर पडल कि शी केव्हढी गर्दी! वैताग आला आता या गर्दीचा आणि ट्रँफिक जामचा अस म्हणत वैतागण नाही. चिडचिड नाही. काहीच नाही.
इतके वर्षे जी धावपळ सुरु होती. श्वास घ्यायला फुरसत नव्हती ती नियतीने आपल्याला दिली. मनन करायला लावल.सगळं तिच्या हातात आहे हे दाखवून दिलं आणि माणूस किती हतबल आहे हे दिसलं. आपण सगळ्या रोगांवर लस काढू ,औषधे काढू पण शेवटचा एक्का तिच्या हातात आहे. कितीही जिवाचा आटापिटा करा ती ठरवेल तसच होणार.
मग आपल्या हातात काय? आहेन प्रयत्न करण आणि मन शांत ठेवणे. सहनशीलता वाढवणे आणि एकमेकांना मदत करणे.
काल खराडी ला गेलो चक्कर मारायला. गाडीत बसूनच. जिथे सगळा चकचकाट होता त्या काचेच्या इमारती केविलवाण्या दिसत होत्या. केवढ्या अवाढव्य होत्या. साध चिटपाखरूही नव्हत तिथे. 15/20000 लोक एका इमारतीत काम करत असतील. मलाच कसतरी झालंं. वैभवच आहे न ते पण. जुन्या राजवाड्यांप्रमाणे भकास वाटत होत.
आता ती गर्दी, ते हाँर्न चे आवाज सगळ सगळ हवय मला. सतत येणारा Ambulance चा आवाज नको आहे. बस झाले आता.
निरोप देतांना हेच मागणे आहे देवाला कि खरचं असशील न तर आता परीक्षा पहाण बंद कर. आम्हाला धडे दे, ते आवश्यकच आहे पण स्वतःची माणसे गमवून नको. तेव्हढी मात्र काळजी घे.