कुठेतरी वाचले की वयाला आयुष्य नसतं मग वय म्हणजे काय एक निर्जीवता आणि आयुष्य म्हणजे काय तर त्यात सजीवता आणणारे रसायन!
मृत्यू कोणाला येतो? वय संपत की आयुष्य? एखाद्या शंभरी गाठलेल्या माणसाचं वय वाढत असतं पण आयुष्याचा आलेख खरोखरंच उंचावलेला असतो का?
कारण एकेक अवयव साथ देणं सोडतं पण मन आणि मेंदू मात्र तग धरून असतो,दुर्दैवाने! कोण काळजीपूर्वक बोलतं, कोण हेळसांड करतं आहे कोणाला आपण हवं आहोत, कोणाला नको ह्याची नोंद आयुष्य करतं असतं आणि आजूबाजूचे लोक त्याच फक्त वय मोजतं असतात.
वयाला मात्र कसचीच फिकीर नसते. एकसष्टी होते झोकात, पंचाहत्तरी पण होते वाजतगाजत, नव्वदीही पार होते. त्या व्यक्तीची मुलं पण आता साठीला आली असतात.
काय चिवट आहे, जातंच नाही,
आम्ही आमचं आयुष्य केव्हा जगायचं, सतत ह्यांचच करत राहायचे का? ही वाक्ये ऐकायला येतात आणि अजून बरंच काही बाही..... आयुष्य हळूहळू कोमेजायला लागतं.
वय मात्र वाढतंच असतं.
काय वाटतं असेल त्या जीवाला? की सगळ्याच्या पलिकडे गेला असतं ते आयुष्य आणि वयही!! फक्त आकडा मोठा मोठा होत जातो! वयाचा!
जगणं म्हणजे कर्म! जोवर तो वरचा बोलवत नाही तोवर जगायचं! स्थितप्रज्ञता येतं असेल का? का स्वतःच जगणं ओझं वाटतं असेल? त्याच्यापेक्षा वयाने लहान असणारी माणसं वारली की स्वतःच्या जगण्याचं वैषम्य वाटतं असेल का?
एखाद्या घरातील कर्ता पुरुष गेला की मागे उरलेल्या म्हाताऱ्या माणसांना अपराधी वाटतं. मला नेलं असतं तर?? ह्या भावनेचं समर्थन करणं योग्य आहे का?
'हा गेला असता तर बरं झालं असतं'
आजूबाजूच्या लोकांचे हे बोलणे ऐकून काय भावना मनात येतं असतील, तुच्छतेने बघणाऱ्या लोकांकडे पाहून अर्धमेल होतं असेल ते आयुष्य!
का आजकाल पटापट आत्महत्या करणाऱ्या पिढीला पाहून स्वतःच्या जगण्याचा सार्थ अभिमान वाटतं असेल? हे कौतुक आजूबाजूच्या माणसांच्या नजरेत कधीतरी दिसलं असेल का?
आयुष्य म्हणतं असेल, पोरांनो मरण माझ्या हातात नाही रे, काय करु? नशिबात जगणं आहे पण किती? माहीत नाही. थोडे समजून घ्या, ही वेळ तुमच्यावर पण येणार आहे, थोडं थांबा!!
असं म्हणताना आयुष्य हळूच भूतकाळात डोकावतं असेल, हो नं?
वय वाढतंच जातं, वाढतंच जातं आणि आयुष्य मात्र जोडीदार हरवतो त्या क्षणी तिथेच थांबत.....वय परत.......