आपल्या मनातून उडी मारून काही बाहेर आलं तर?(शतकोटी रसिक)

आपल्या मनातून उडी मारून काही बाहेर आलं तर?(शतकोटी रसिक) बापरे मनातून उडी मारुन काही बाहेर आले तर?

उडी ही टुणकन मारतात त्यामुळे बाहेर येणारे असे हळूहळू थोडीच येणार ते तर अचानक टुण्णकन उडी मारूनच येणार! न सांगता सवरता!

मग बाहेर काय येणार तर मनातील आनंदच कारण दुःख रेंगाळत, सावकाश बाहेर पडणार पण आनंदच असतो जो लगेच बाहेर पडतो. पण बाहेर आल्यावर मी त्याला आंजारून गोंजारून परत जवळ घेईन आणि घट्ट पकडून ठेवेन. आनंद दूर गेला आणि परतीचा रस्ता त्याला सापडलाच नाही तर? मग माझं काय होईल?
बरं आनंद आणि समाधान हे दोघे भाऊ भाऊ, जुळ्यांसारखे एकमेकांना धरुन असलेले. म्हणजे आनंद बाहेर पडला की त्याच्या मागे समाधान पण पटदिशी मनातून उडी मारून बाहेर पडणार हे नक्की! मग समाधान धरुन ठेवू की आनंद धरुन ठेवू? माझी दमछाक होणार!
बरं हे दोघे बाहेर पडले की त्या दोघांना पकडायला सगळेच टपलेले असतील.
मग ठरवलं की आनंद मनातून उडी मारून बाहेर पडायला लागला की त्याला संयम आणि तटस्थतेच्या लगामाने आवर घालायचा आणि बाहेर येऊच द्यायचं नाही.दूध उतु जायला लागलं की आपण झाकण ठेवतो न तसं!

अर्थात कधीतरी अति झालं की दुःखही बिचारे मनातून उडी मारून बाहेर पडायचा प्रयत्न करणारच! किती वेळ मनात दबून राहाणार? मी त्याला मात्र बाहेर पडू देईन आणि वाटलंच तर मागून एक जोरात धक्का मारून त्याला अजून दूर ढकलेन!
मी म्हणेन, जा मेल्या जिथे जायचं तिथे! परत येऊच नको! किती त्रास होतो तुझ्यामुळे!

दुःख मनातून बाहेर पडल्यावर जरा सुटल्यासारखे वाटेल. त्याला जवळ घ्यायला कोणीच तयार होणार नाही त्यामुळे परत माझ्याकडे यायची भीती! मी आता मनाचा दरवाजा घट्ट बंद करेन.

एकटेच हिंडत बसेल बिचारे, रडतखडत!

पण दुःख मनातून उडी मारून बाहेर गेले तर मला करमेल का? कारण मनात दडवून ठेवलेल्या आनंदापेक्षा दूर गेलेल्या दुःखाचीच जास्त आठवण येते. दुःखाला गोंजारत बसायची सवयच लागली असते. तुम्हांला पण नं?

वर्षा हेमंत फाटक, पुणे
3/6/2024

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »