अंत
आयुष्याच्या प्रवासात
जाणीवांचे ठेचकाळणे
ओल्या जखमेचे व्रण
भरभरून वाहणे।
आनंदाची होडी आणि
वल्हवणे ते दुःखाचे,
भान येता निराशेच्या
काठावर ते विसावणे।
तीरावर बसून उगाच
आशेच्या भोवऱ्यात गुंतणे
अपेक्षाभंगाच्या वाळूला
हळूच बाजूला सारणे।
जगलो किती सुखात
हे बोल आढ्यतेने मिरवणे
मनात मात्र नदीचे
कोरडे पात्र आठवणे।
अहंकाराच्या गाळात
मनाचे खोल खोल रुतणे
प्रेमाच्या झऱ्यांचे
हळू हळू आटत जाणे
पैलतीर नजरेत येता,
संयमाचा बांध घालणे
सुखदुःखाचे हेलकावे
तटस्थपणे सोसणे।
हेच जगणे खरे, अंतास
ते जाणवणे,
उरलेल्या आयुष्याला निर्विकारपणे स्वीकारणे ।
वर्षा हेमंत फाटक, पुणे
29/5/2024
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»