पुस्तक परिचय : इंदिरेची स्मृतिकथा* लेखिका : इंदिराबाई वाडीकर
*स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरील स्त्रीमनाची स्पंदने*
हे शीर्षक असलेले वेगळ्या धाटणीचे सुंदर आणि साधेसरळ पुस्तक काल वाचायला घेतले. त्या पुस्तकात मी रमून गेले.
खरंतर काहीच माहिती नव्हती या लेखिकेबद्दल आणि पुस्तकाबद्दल!!
परिशीलन अंतर्गत डॉ. अरुणा ढेरे आणि डॉ. नीलिमा गुंडी यांनी जे छानस लिहिले आहे ते पहिले वाचले आणि उत्सुकता निर्माण झाली पुस्तक वाचायची.
संपादन करतांना : यात डॉ अशोक वाडीकर यांनी मनापासून लिहिलेले 'बाई' बद्द्लचे लिखाण, त्यासाठी केलेली धडपड आणि मुख्य म्हणजे इतक्या वर्षांनी गवसलेला अनुभवांचा लिखित खजिना (आजच्या भाषेत डायरी) आणि ते प्रकाशित करायची तीव्र इच्छा, त्यासाठी घेतलेले परिश्रम हे सर्व कौतुकास्पद आहे. आईबद्दलचे प्रेमच इथे दिसून येते.
डॉ. अरुणा ढेरे यांना एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून हे पुस्तक व्हावे असे वाटले होते.
पुस्तकात ८४ छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काहीतर अगदी अर्ध्या पानातच संपतात. 'चांदीची भांडी अशी घेतली' ही गोष्ट वाचतांना एक एक पैसा जमवून वस्तू घेण्याचा आनंद लक्षात येतो तर बोहारणीही माणूस असतात यातील प्रसंग मजेशीररित्या रंगवला आहे. तेव्हाच्या काळी व्याख्यानाला गेल्यावर काय बोलणी खावी लागायची हे वाचल्यावर नवल वाटतं. पण जे योग्य ते योग्यच हे ठणकावून सांगायची वृत्ती इंदिराबाई बाळगून होत्या या गोष्टीचा अभिमान वाटतो. कितीतरी लहानमोठे प्रसंग आनंद देऊन जातात तर काही विचार करायला प्रवृत्त करतात. आता स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या आपण तेव्हाच्या काळाची स्त्री कितीतरी आघाड्यांवर लढत होती, निमूटपणे!विपरीत परिस्थितीत! परत संसार सांभाळून!! १९१३ पासूनच्या आठवणी आहेत या पुस्तकात.
हिंगण्याच्या अण्णासाहेब कर्वे आणि रमाबाई रानडे या थोर विचारवंतांचा उल्लेख आहे पण त्याचबरोबर तेव्हाची सामाजिक परिस्थिती स्त्री शिक्षणाला कशी धार्जिणी नव्हती ते समजतं.'भांडी, कपडे आणि सोने' ही कथा तसेच स्वतःची अब्रू जपण्यासाठी नात्यातल्या माणसाला मारलेला धोंडा हा बरेच काही सांगून जातो. एकदा गर्दीत एक माणूस 'या बायका मूर्ख असतात' हे बोलून जातो, त्यानंतर इंदिराबाईंनी त्याचा घेतलेला समाचार मनाला सुखावून जातो. पण कुठेही प्रौढी मिरवलेली नाही आहे.
स्वातंत्र्याच्या काळातले आणि नंतरचे बदललेले वातावरण, सामाजिक, प्रापंचिक आणि शैक्षणिक रीतीभाती याचा उल्लेख त्यांच्या आत्मकथनातून येतो पण सगळं संसारी स्त्रीच्या नजरेतून, कुठेही बंडखोरी नाही किंवा बडेजाव दिसत नाही.एका साध्या, सोज्वळ पण जागरुक असलेल्या स्त्रीची ही गोष्ट आहे. जशाजशा आपण कथा वाचत जातो तशातशा त्या आपल्याला समजून येतात. खटाव, हिम्मतपूर, सातारा या गावांचा उल्लेख अधूनमधून येत असतो.
पुस्तक वाचल्यावर एक छानस फिलींग येतं. रंजकतेने मांडलेल्या एका गोड संसाराची कहाणी म्हणता येईल. मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारी, (त्या फक्त पाचवी पास होत्या), चांगले संस्कार करणारी आई आपल्या समोर उभी राहते आणि आपण तिच्या प्रेमात पडतो. अर्थात यातही निकटवर्तीयांचे अवेळी झालेले मृत्यू आहेतच. तो सल आयुष्यभर सोबतीला होताच.
पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की सगळ्या गोष्टी मस्तपैकी आपल्यासमोरच घडल्या की काय असंच वाटतं होतं.
मनात एक विचार आला की मी जर निर्माता असते तर नक्कीच या अनुभवांवर एखादी छानशी सिरीयल बनवली असती,हल्की-फुल्की! आनंददायी!!