परवाच सुधाकर शुक्ल लिखित *विश्वामित्र* हे पुस्तक वाचले.
विश्वामित्र, वशिष्ठ आणि कामधेनूची कहाणी लहानपणीच वाचलेली होती. तेव्हा विश्वामित्राबद्दल मनात एक वेगळीच प्रतिमा होती. कदाचित खूप चांगली नाही कारण कामधेनुचे ते अपहरण करतात म्हणूनही असेल. मध्यंतरी विश्वामित्रांवर अजून एक पुस्तक वाचलं होतं पण सुधाकर शुक्ल यांनी लिहिलेल्या पुस्तकाची आवडलेली गोष्ट म्हणजे विश्वामित्र स्वतः त्यांच्या आयुष्याबद्दल सांगतात आहे असा धागा लेखकाने पकडला आहे त्यामुळे पुस्तक जास्त प्रवाही झाले आहे.
जसं मला महाभारत वाचायला आवडतं (रामायणापेक्षा) तसंच मला *विश्वामित्र* ही वाचायला आवडत. महाभारतात वेगाने विविध प्रकारच्या घटना घडतात आणि त्या अनुषंगाने त्यामागची एकेक घटना आपल्यासमोर येते. उदाहरणार्थ कर्णाच्या रथाचे चाक शेवटच्या क्षणी जमिनीत धसणे किंवा जरासंघाचा मृत्यु!प्रत्येक घटनेमागे एक कारण आहे. महाभारतात पात्र पण खूप आहे त्यामुळे ते अधिक रंजक झाले आहे.
पण इथे एकट्या विश्वामित्रांच्याच आयुष्यात किती विविध घटना घडतात आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती, त्या घटनेमागची कहाणी, सगळा रंजकतेचा प्रवास आणि शेवटी न संपणारा अहंकार आपल्याला अचंबित करतो. पण दुर्योधनासारखा आपण त्यांचा राग नाही करतं.
अर्थात अहंकार हे एक साम्य सोडलं तर विश्वामित्र आणि दुर्योधन या दोघांची कुठेच तुलना होऊ शकत नाही.
ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने वशिष्ठ आणि अगस्ती ऋषींच्या जन्माची कहाणी, निमी राजा आणि ब्रम्हर्षि वशिष्ठ या दोघांनी एकमेकांना दिलेले शाप, त्यांचे विदेही होणे, परत देह प्राप्त करणे, नंदिनीचे विराट रुप पाहून तिची इच्छा करणारे थोर क्षत्रिय आणि पराक्रमी राजा विश्वामित्र, ब्रम्हर्षिकडून युद्धात हरणारे विश्वामित्र, महादेवाची कठोर तपश्चर्या करून मिळालेली अस्त्रे ब्रम्हर्षि वशिष्ठ यांच्यावर सोडूनसुद्धा पराभवच पत्करावा लागणारे विश्वामित्र ही रुपे आपल्याला अचंबित करतात.
शेवटी आयुष्याचे एकच ध्येय बाळगणारे आणि ब्रम्हर्षि होण्याचे ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी अथक परिश्रम करणारे विश्वामित्र आपल्याला भारुन टाकतात.
कवल त्यांचा खरा मित्र! त्यांना सतत ब्रम्हर्षि वशिष्ठांच्या श्रेष्ठतेची जाणीव करून देत असतो आणि विश्वामित्रांना अहंकाराचा त्याग करण्याची!!
सदेह स्वर्गात जाण्याची इच्छा बाळगणारा त्रिशंकू, त्याच्यासाठी परत कठोर तपश्चर्या करणारे विश्वामित्र, स्वर्गात गेलेल्या त्रिशंकूला इंद्राने खाली ढकलल्यावर त्याच्या इच्छापूर्तीसाठी प्रतिसृष्टीच्या निर्मीतीची प्रतिज्ञा विश्वामित्र करतात.
गालव जो पराशर ऋषींचा शिष्य असतो तो विश्वामित्रांना गायत्री मंत्राच्या जपाचं महत्व सांगतो आणि परत सुरु होते कठोर तपश्चर्या! साक्षात ब्रम्हदेवाला आव्हान देणाऱ्या विश्वामित्रांच्या तेजापुढे इंद्राचे आसन डळमळायला लागते.
गायत्री देवी प्रसन्न होते आणि भूः या व्याह्रतींवर स्वामीत्व प्रदान करते. बाकीच्या सहा व्याह् तींवर जमदग्नि, भारद्वाज, गौतम, अत्री, वशिष्ठ आणि कश्यप यांचे स्वामित्व होते.
त्रिशंकू ला स्वर्गात स्थान मिळत. पण तपश्चर्या ज्या कारणासाठी केली होती ते पूर्णत्वास जातं नाही. कारण प्रतिसृष्टी निर्माण करण्यासाठी तिन्ही देवांचा विरोध असतो.
परत तपश्चर्या की परत राजसिंहासन ग्रहण करणे. मेनकेचा प्रवेश, इंद्राचा कावेबाजपणा उघड होणे, मुलीला कण्व ऋषींच्या आश्रमात सोडून मेनका स्वर्गात जाते, रंभेला पाषाण बनून राहाण्याचा दिलेला शाप आणि त्यामुळे तपोबलशुन्य होणे आणि परत खडतर तपश्चर्या करणे. अजब रसायन!! आपण वाचतांना थक्क होतो. महत्वकांक्षा पूर्णत्वास नेणे म्हणजे काय असतं हे लक्षात येतं.
एका क्षणी वशिष्ठांसाठी वृथा वृथा बाळगलेले वैर समाप्त होते आणि विश्वामित्र ब्रम्हर्षी पदाला पोहचतात.
पण त्याआधी विश्वामित्रांनी वशिष्ठांच्या प्रिय शिष्याची राजा हरिश्चंद्राची घेतलेली कठोर परिक्षा ही वशिष्ठांवरच्या वैरभावनेतूनच आलेली होती.
राजा हरिश्चंद्र परिक्षेत खरा उतरतो.
वशिष्ठांनी परत पराभव केला असतो विश्वामित्रांचा!!
प्रत्येक वेळी ठेच लागली की त्यांना वशिष्ठ आठवतात.अंगात भिनलेलं वैर पदोपदी आडवं येतं.
एका महान पराक्रमी राजाचा एका ब्रम्हर्षिकडून पराभव नसता झाला तर ब्रम्हर्षि विश्वामित्रांचा जन्म झाला असता का? वशिष्ठांच्या मनात कधीही तुलना नव्हतीच.
विश्वामित्रांच्या जन्माचे रहस्य काय? ऋषी पत्नीच्या पोटी जन्माला आले असते तर ब्रम्हर्षी विश्वामित्रांचा हा प्रवास एवढा खडतर असता का?
परंतु खरा पराभव हा अहंकार, क्रोध आणि कामवासनेमुळे झाला होता. ब्रम्हर्षी वशिष्ठ हे दया, क्षमा आणि शांती यांच मूर्तिमंत प्रतिक होते.
शेवटी वाचक या दोन्ही ब्रम्हर्षींकडे कोणत्या दृष्टीने बघतो हे जास्त महत्वाचे आहे. या धार्मिक /पौराणिक ग्रंथांमधून आत्ताच्या काळात जगण्यासाठी आपण काय बोध घेतो हे महत्वाचे आहे. मानवी स्वभाव तर सगळीकडे सारखाच राहणार आहे. पण शेवटी झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त करणे हेच जीवनाचे सार आहे का?
शेवटी आपण भारावून जातो.
लेखक म्हणतात तसं
*राजा, ऋषी, महर्षी अन् ब्रम्हर्षी अशा चढत्या क्रमाने जीवन उंचावणाऱ्या विश्वामित्राबद्दल आदर दुणावतच जातो*
हे पुस्तकाचे परीक्षण वगैरे नाही आहे. मला जे आवडलं ते तुमच्यासमोर आपलेपणाने ठेवले. पण एक उत्तम पुस्तक वाचायला मिळाले हे नक्की.
वर्षा हेमंत फाटक
[08/12, 10:38 am] Vijayap: विश्वामित्रांची व्यक्तिरेखा अगदी बारकाईने उभी राहिली आहे.
वर्षा, खूप खूप अभिनंदन.
[08/12, 12:18 pm] +91 93249 01585: उत्तम निरीक्षण...