अनाथ (31 जुलै 2023) शब्दवर्षा :पाक्षिक सदर


जिंदगी तो बेवफा हैं एक दिन ठुकराएगी, मौत मेहबूबा हैं अपने साथ लेकर जाएगी।

पण या मौत नावाच्या मेहबूबा ने बेवफाई केली तर काय होईल? वाचायला विचित्र वाटतं आहे न? कोणीतरी जन्मतःच एखाद्याला मरायला एखाद्या कचराकुंडीत फेकावे आणि मौतने उसको गले लगानेके बजाय जिंदा छोड दिया! तर काय होईल? कल्पना करा की खरंच अस आपल्या बाबतीत घडलं असतं तर! सर्रकन पायाखालची जमीन सरकते.

अनाथ म्हणून जगणं कसं असेल?
अर्थात यामागे काहीतरी कारणं असतीलच नाही असे नाही. पण दोष कुणाचा आणि भोग कुणाचे आणि का? हा प्रश्न मनात आल्यावाचून राहात नाही. अर्थात या *मजबूरी* आपल्या सिनेमातून छानपैकी रंगवल्या जातात. वास्तवात काय होत असेल त्या जीवाचे? सगळं इतकं सोपं असतं?

आजकाल सोशल मिडियावर खूपदा फोटो बघायला मिळतात. मुलांच्या वाढदिवसाला बरेच जण अनाथाश्रमात खाऊ, कपडे आणि खेळणी घेऊन जातात,लगेच सोशल मिडियावर फोटो पण टाकतात. चांगलीच गोष्ट आहे. समाजाप्रती काहीतरी देणं लागतोच. पण शेवटी मनात बिच्चारे असं आल्यावाचून राहात नाही.त्यांची कीव करणं योग्य आहे का? माहीत नाही. कारण कदाचित त्या कीवेपोटी तरी लोक त्यांना आसरा देतील. उपकार केल्याची भावना अहंकाराला गोंजारते.

कोणीतरी तर कधी कधी 4/5 वर्षांच्या मुलांना अनाथाश्रमात सोडून जातात. काय वाटतं असेल तेंव्हा त्या मुलांना? अधांतरी लटकल्यासारखं होतं असेल! आईवडीलांच्या पुसटशा आठवणी तर नक्कीच असतील त्यांच्या मनात! अचानक आईवडील दिसेनासे झाल्यावर काय होतं असेल? कधी कधी अशा पालकांचा संताप येतो. झेपत नाही तर कशाला जन्माला घालतात? कधी कधी वाटतं अनाथाश्रम नसते तर.......

मारून टाकलं असतं का?

म्हणजे अनाथाश्रम असणे चांगले की वाईट? ह्या प्रकारची लोक सोकावतात का? चित भी मेरी पट भी मेरी!

परवा एका कचराकुंडीत एक नवजात अर्भक सापडले, अशी बातमी आपण बरेचदा वाचतो. कारण खुपदा असंच टाकून देण घडतं. हेडिंग ही कॅची असतं *देव तारी त्याला कोण मारी*
बातमीदारांची पण कमाल वाटते.

पोलिस आणि समाजसेवक योग्य ठिकाणी त्या बाळाची नावनोंदणी करतात. कोणत्याही धर्माचा, जातिचा काहीच संबंध नाही फक्त माणुसकी हाच धर्म!
म्हणजे अनाथ म्हणून जन्माला यायचा एक फायदाच! धर्माच्या, जातीच्या नावाखाली होणाऱ्या दंगलीपासून सुटका! जात नाही, धर्म नाही काहीच नाही.
मग सगळ्यांनीच लावारिस म्हणून जन्माला यावं का? नावं सोडून सगळे काॅलम फक्त *माहीत नाही* या शब्दाने भरतील. सगळीकडे शांतता!

पण अर्थात मनुष्य दंग्याच दुसरं एखाद कारण शोधून काढेलच! राजकारण्यांना मते कशी मिळतील?

जगात लावारिस म्हणून जगणं खरंच सोप आहे का? काय होतं असेल? टाकून दिल्याची भावना कुरतडत असेल आणि मग जगावर सूड उगवायला एखादा पेटूनही उठत असेल. न पाहिलेल्या आईवडीलांचा समाजाच्या नकळत शोध घ्यायचा प्रयत्न करत असेल आणि त्यातला फोलपणा जाणवला की कुढतही असेल. समाज घृणेने बघणार. सर्व प्रश्न आवासून त्याच्यापुढे उभे राहात असतील की हे प्रश्न फक्त आपल्यासारख्या सनाथ म्हणून जन्मलेल्या पांढरपेशा समाजालाच पडतात. ज्याला फक्त चर्चा करायला आवडतं कृती करायला नाही आणि एखाद्याने वाकडी वाट करून चांगली कृती केली, एखाद्या अनाथ मुलाला /मुलीला दत्तक घेतले तर समाज त्या जोडप्याकडे कुत्सित नजरेने बघणार.
अरे होत नव्हतं म्हणून दत्तक घेतले. कुठलं कोणाचं पोर उचलून घरात आणलं काय माहित? अरे माणसांचच आहे न!
एखाद्याची उदात्त भावना असू शकते की यामागे.
आणि स्वतःला मूल होत नाही म्हणून मूल दत्तक घेण्याच्या निर्णयाला पण धाडस लागतं. असे कितीजण मूल दत्तक घेतात?हाताच्या बोटावर मोजता येतील इतके. दुसर्‍याच्या मुलाला प्रेम आणि जिव्हाळा लावणं सोप काम नाही. ती मोठी होतं असतांना सांभाळणे महाकठीण कर्म आहे. दत्तक घेतलेलं मूल कसं निघेल याची धास्ती सर्वांनाच असते पण आपलं पोटचं मूलही चांगलेच निपजणार याची काय गॅरंटी? पण शेवटी रक्ताचे नाते! तिथे मूग गिळून गप्प बसायचे.

मध्यंतरी सिनेइंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांनी मूलं दत्तक घेतली. काहीतरी आदर्श ठेवला समाजापुढे पण समाजही चतुर असतो, हवं तेच घेतो.

जो दत्तक जातो त्याला वयात येतांना आजूबाजूच्या लोकांकडून नको ती माहिती मिळत असेलचं! मग ते कसं सहन करत असतील?टोचा मारणारे फुंकर घालणाऱ्यांपेक्षा जास्त असतात.

कदाचित जाणीव झाल्यावर अनाथ चे सनाथ झालो म्हणून त्या पालकांचे आभार ही मानत असतील.

समाजात एक विचारप्रवाह असा ही आहे की मूल दत्तक घेण्यापेक्षा एखाद्या अनाथ मुलाच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च करायचा. हे ही नसे थोडके! कुटुंबाचं सुख नाही मिळणार कदाचित त्या अनाथ मुलाला पण एक आयुष्य नक्कीच उभे राहील.

अनाथ ते सनाथ हा प्रवास घडायला बऱ्याच कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागते. मूल दत्तक घेण्याची अतिशय किचकट प्रोसेस आहे. वाईट या गोष्टीचं वाटत की मूल टाकतांनाची प्रोसेस कित्ती सोप्पी आहे, कुठेही फेका अगदी कचराकुंडीत सुद्धा पण दत्तक घेण्याची उदात्त प्रोसेस इतकी कठीण का?

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »