मृत्यूपेक्षाही
भयानक असत ते आपल्या माणसाचे जिवंतपणी हरवणे,कुठेतरी दूर निघून जाणे,बेपत्ता होणे, न सांगता – सवरता गायब होणे.
माझ्या मैत्रिणीचे आजोबा आजींवर रागावून निघून गेले होते. सकाळी चहा द्यायला उशीर झाला म्हणून रागारागात निघून गेले. आत्ता येतील मग येतील म्हणून वाट पाहिली. एक/दोन तास उलटल्यावर मात्र नातेवाईकांकडे चौकशी सुरु केली. एकजण मंदिरात जाऊन पाहून आला,तिथेही नव्हते. कोणाला काहीच माहित नव्हतं. मग मात्र धाबं दणाणल सगळ्यांच. पोलिस कंप्लेट झाली. सगळ झालं. आजी दिवसेंदिवस खंगत चालल्या होत्या.आजींना 6/7 दिवस अँडमिट कराव लागलं. सैरभैर झाल्या होत्या.केव्हाही उठून दरवाजा उघडायला धावायच्या आजोबा आले म्हणून.आजोबांचा मात्र काहीच पत्ता लागत नव्हता. हळूहळू सगळं सुरळीत झालं. आजी आता थोड्या सावरल्या होत्या.काळा सारखे दुसरे औषध नाही हेच खरं!!
आजी हरतालिका, वटपौर्णिमा सगळं नित्यनेमाने करत होत्या.आजी आता सत्तरीच्या जवळपास आलेल्या होत्या.आजोबांना घर सोडून आता 10/12 वर्षे होत आली होती.
आणि एकदा त्यांचा पुतण्या नाशिकला गेला होता आणि आश्चर्य म्हणजे तिथे काळ्या रामाच्या मंदिरापाशी त्यांना आजोबा दिसले.अगदी व्यवस्थित होते.सगळी फोनाफोनी झाली.
आजी मात्र शांत होत्या.
मुलगा म्हणाला,” आई चल आपण जाऊ लगेच बाबांना घरी घेऊन येऊं”.
“अरे ,मला एवढा लांबचा प्रवास सहन नाही होणार.तूला सुट्टी मिळाली कि तू जा सावकाश त्यांना आणायला”.
“आई अग काय बोलते आहेस?” मुलगा म्हणाला.
आजी म्हणाल्या,”अरे खरं तेच बोलते आहे.ते जेव्हा सोडून गेले नं तेव्हा खूप खचले होते रे मी. काय काय नवस बोलले.जपजाप केले. पण जसजसे दिवस जायला लागले तसतशी आशा मावळायला लागली. रात्र रात्र रडत असायची मी. उद्याचा दिवस कोणती वाईट बातमी घेऊन येणार या टेंशन मधे अख्खी रात्र जायची. सतत त्यांचे भास व्हायचे.
नंतर नंतर वाटायला लागलं हे मेले असते नं तर बरं झालं असत,रोजची वाट पहाण्याची कटकट तरी संपली असती. वाट पहाणं खूप जीवघेण असतं रे! त्यापेक्षा मृत्यू परवडला. एकदाच काय ती कायमची सुटका करतो. सोक्षमोक्ष लावतो. हे अधांतरी जिण नकोस होऊन जातं बघ! एखादा नवरा चहाला उशीर झाला म्हणून घर सोडून कसा काय जाऊ शकतो रे? आत्ता हे सापडले म्हणून नाहीतर तुम्ही सगळे ते जिवंत नाही असच मानून चालला होतात नं?
नाशिक म्हणजे काही लांब नाही रे. ते आधी आपणहून ही येऊ शकले असते नं!! एखाद पत्र लिहू शकले असते.
रोज कुंकू लावतांना हात थरथरायचा माझा.पण आता हातालाही सवय झाली आहे. माझ्या कुंकवाकडे पहातांना इतर बायकांच्या नजरेत मी माझं विधवा होण केव्हाच अनुभवल आहे. फक्त नवरा जिवंत आहे हा विश्वास होता तो खरा ठरला माझा. बाकी काही नाही. तू आता ठरव”.
एवढ बोलून आजी थांबल्या आणि हातातील भगवत-गीता वाचायला लागल्या.