मीना,अग ऐक न, नको हे टोकाचे पाऊल उचलूस. लाज आणशील गं आम्हांला. रेवती आता काकुळतीला आली होती. घरातील वातावरण विचित्र झाले होते.
मीना, रेवतीची मोठी मुलगी. भरपूर पगार असलेली 26 वर्षाची सुंदर आणि हुशार!! सगळं घर हसतं-खेळतं होत. पण अचानक मीनाने आज तिचा निर्णय सांगितला होता आणि घरातलं वातावरण तापलं होतं. तिचा नवरा अजित तर मीनाला मारायलाच धावला होता. कसबसं रेवतीने त्याला आवरलं.
तिने दार आतून बंद केल आणि मीनाला म्हणाली, “पळून जा इथून!! मी मदत करेन तुला!!”
मीना आईकडे पहातचं राहिली. तिला वाटलं होत आई तिला दोन/ तीन ठेवून देणार, रागावणार, तिच्यावर चिडणारं. पण आई काहीतरी वेगळचं बोलतं होती. मीनालाच धक्का बसला होता, आईच बोलण ऐकून.
“आई तूला कळतयं का तू काय बोलते आहेस ते?” मीनाने विचारलं.
“हो ग बाळा नीटपैकी समजतं आहे. कारण मला पण तुझ्यासारखचं वाटायचं. मला पण लग्न नव्हतं करायचं. पुरुषाचा स्पर्श नको वाटायचा. मी आणि सुमती बालमैत्रिणी होतो. सतत सोबत.
लुटुपुटुच्या खेळात एकमेकिंचे नवरा-बायको बनायचो. आम्हाला एकमेकिंशिवाय करमायचचं नाही. पण तेव्हा त्याचा अर्थ नाही समजला आम्हाला. आज जेव्हा तू सांगितले कि तू आणि सीमा लग्न करून एकत्र राहाणार आहे तेव्हा हे सगळं आठवलं”. रेवती म्हणाली.
“पण मग आई तू आणि बाबा, तुमचं लग्न, आमचा जन्म”??
“अग, बलात्कार झालेली
बाई पण मुलं जन्माला घालतेचं नं ग, तसंच समजं. आणि हा तर माझा नवरा होता, माझी काळजी घेत होता, भरभरून प्रेम दिल मला. बदलले मी. मला पण पुरुषाचा स्पर्श कधीच आवडला नाही. सुमीच्या स्पर्शात मला नेहमीच आश्वासक वाटायचं पण 30/35 वर्षांपूर्वी कसचं काय? समलिंगी विवाह हा शब्दच माहित नव्हता नं तेव्हा!! आमच्या भावना आमच्याचजवळच! आणि त्या ही अस्पष्टच! सांगितले असतं तर मारून टाकलं असतं आम्हांला दोघींना!”
रेवती म्हणाली.
आई, ती सुमी कुठे आहे ?
“अग 10/12 वर्षांपूर्वी एका अँक्सिडेंट मधे ती गेली ती”.
“आई thanks गं. मला आणि सीमाला समजून घेतल्याबद्दल!!” मीना म्हणाली.
पण मीना तुला एक सांगू का? रेवतीने विचारलं.
“आई सांग नं, बोल तुझ्या मनात काय आहे ते!” मीना म्हणाली. आईने आपल्याला समजून घेतलं यातच मीना खुश होती.
“आम्ही म्हणजे मी आणि सुमी चुकीच्या होतो अस वाटतयं मला आता मागे वळून पहातांना”. रेवती म्हणाली.
“म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे आई? मी चूक करते आहे, माझी भावना अयोग्य आहे? माझा निर्णय चूकिचा आहे?” मीना म्हणाली.
“तसच काहीसं नाही. पण निसर्गाच्या विरुद्ध आहे नं हे! तुझ्यात शारिरीक अपूर्णत्व काहीच नाही आहे. तू एक पुर्ण स्त्री आहेस. तूला आत्ता सीमाबद्दल आकर्षक वाटतं आहे म्हणून तू आणि सीमाने एकत्र राहायचं ठरवलं आहे. पण हे आत्ताच वाटणं बदलू पण शकतं नं!! तू एक नाँर्मल जीवन जगूच शकते एखाद्या मुलाशी लग्न करून!! मी तूला कुठलीच जबरदस्ती करणार नाही. पण एकदा विचार कर बाळा”. रेवती म्हणाली.
“अग पण आई माझ्या मनात पुरुषांबद्दल तशी भावना येतचं नाही. मी काय करू?” मीना म्हणाली.
“अग, हे मनाचे खेळही असू शकतात.
मी माझ्यावरुन सांगू शकते. आपण डॉक्टरांकडे जाऊ. त्यांचा सल्ला घेऊ आणि मग ठरवू.
मी माझ्यावरुन सांगते तुला.
मी रमलेच नं तुझ्या बाबांमधे!
विचार कर आणि मग निर्णय घे.
घाई करू नको.
मला समाजाची पर्वा नाही आहे पण तुझी काळजी नक्कीच आहे”.
एवढे बोलून रेवती थांबली.
मीना म्हणाली, “आई तुझं म्हणणं मला पटतयं अस नाही पण उद्या आपण काँन्सिलिंगसाठी जाऊ. मी येईन आई. स्वतःला एक चान्स नक्कीच देईन!!”
रेवतीला हुश्श झालं. सायकाँलाँजीच्या अभ्यासाचा उपयोग असा होईल हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. रेवतीने देवासमोर दिवा लावला आणि खोटं बोलल्याबद्दल तिने मनोमन देवाची माफी मागितली.
उंबरठ्याबाहेर पडणारं एक चुकीचं पाऊल तिने रोखल होतं.
बहुतेक………..