देवा उद्या माझा पेपर चांगला जाऊदे!
मी वाचलं तेच येऊदे पेपरमध्ये!
सोपा असू दे रे देवा उद्याचा पेपर!
थोडंफार आपण सगळेच लहानपणी असं काही बोललो आहोत. प्रार्थना केलेली आहे
परीक्षा कोणतीही असो दहा मार्कांची की शंभर मार्कांची! सेम फिलिंग!
कोणी सकाळी उठून अभ्यास करतं, कोणी रात्री उशिरापर्यंत जागून! कोणी अगदी जाईपर्यंत! आमच्याकडेच तर तिघांचे तीन प्रकार आहेत. एकजण सकाळी दहाचा पेपर असेल तर सकाळी आरामात उठून वर्तमानपत्र वगैरे वाचून परिक्षेला जातो(कारण दिल्ली ही भारताची राजधानी आहे हे एकदा वाचलं काय आणि दहावेळा वाचलं काय सेमच राहाणार आहे). एकजण उद्या सकाळी दहाला पेपर आहे तर आदल्या दिवशी रात्री दहापर्यंतच अभ्यास करणार मग डायरेक्ट परिक्षेला(माईंड फ्रेश हवं)माझं बीपी वरखाली होतं असतं. आणि तिसरा प्रकार म्हणजे जाईपर्यंत अभ्यास करायचा! म्हणजे जेवतांना पण!!कारमध्ये मागे बसून पण वाचायचं.
परिक्षेचं टेन्शन कोण कसं घेतं हे काहीच सांगू शकतं नाही.
त्यात गणिताचा पेपर असला की तर विचारूच नका. पालक पण उद्या जास्तवेळ क्लास घ्याल न मॅम? मॅथ्स आहे उद्या! हे विचारतात.
अरे आदल्या दिवशी अभ्यास करून काय होणार आहे? इतके दिवस केली आहे की प्रॅक्टिस!!
काही मुलं गणित सोडवतात, काही वाचतात, काही फक्त सूत्र पाठ करुन जातात. तिथेही वेगवेगळे प्रकार! पण मुलांना गणिताइतकी भीती कोणत्याचं विषयाची नसते. का ते कळत नाही. एकदा पद्धत समजली की खरंतर अभ्यास करायची गरजही भासत नाही. माझ्या मैत्रिणीला अजूनही स्वप्न पडतं की ती इंजीनियरिंगला M1 मध्ये फेल झाली आहे. तिची मुलगी गणिताला का घाबरते हे मला कळलं.
आपल्या इथे गणितात एखादा हुशार असेल तरच तो हूशार त्यामुळे ज्यांना गणित कठीण जातं ते बिचारे हिरमुसले होतातं. गणित हा एकच विषय नाही आहे. इतर विषयात पण गति असते खूप जणांना! आता मात्र गणिताचं महत्त्व थोडं कमी झालं आहे.नविन अभ्यासक्रमानुसार तर आठवीतचं तुम्ही गणित सोडू शकता. पण मला वाटतं हिशोब प्रत्येकाला यायला हवेत. परंतु आधी कॅल्क्युलेटरनी आणि आता gpay नी मुलांची वाट लावली आहे. हिशोब नाही, किती पैसे परत घ्यायचे?ते समजतं नाही. परत परत चेक करायचे हा ताणचं डोक्याला नाही. मला वाटतं काही वर्षांनी ही पोर प्लस - मायनस काय आहे हेच विसरतील. आमची भाजीवाली फटाफट तोंडी हिशोब करते. चौथी पण पास नाही आहे.कालायै तस्मै नमः!
गणिताच्या पेपरला कॉपी हा प्रकार खूप व्हायचा. कोणी फूल बाह्यांचा शर्ट घालायचे, तर कोणी बुटांमध्ये कागद लपवून आणायचे. कधी कधी सामूहिक कॉपी व्हायची. कोणी पाणीवाल्याला पटवून ठेवायचं. रिकाम्या जागांची उत्तर एकमेकांना सांगायची. मग पेपर झाली की भांडण पण व्हायची. कारण एकीने पहिल्या रिकाम्या जागेच उत्तर विचारले असायचे आणि दुसरीने तिसऱ्याचं रिकाम्या जागेसाठीच उत्तर सांगितले असायचं.चोरीचा मामला!
परिक्षा झाली की रिझल्ट ची हुरहुर! आणि तेंव्हा तर रिझल्ट पेपरमध्ये यायचा. नंबर दिसेपर्यंत जिवात जीव नसायचा. मेरीटवाल्यांचे फोटो यायचे. स्वतःची गाडी धक्कयाला लागली की मग मैत्रीणींचा रिझल्ट बघायचा. सायकल काढून लगेच भेटायला पळायचं.तिथून मंदिरात जायचं. पाणीपुरी खायची. हेच आमचं सेलिब्रेशन होतं.
तेव्हा कोणी आत्महत्या वगैरे नाही करायचं. नापास झालेली पोरं पण पेपर तपासणाऱ्याला शिव्या देऊन मोकळे व्हायचे.
कोणी रिचेकींगला पाठवायचं. नंतर पासही व्हायचे.पण एक होतं तेंव्हा कोणी नापास झालं तर त्याच्याकडे गुन्हेगारासारंख नाही पाह्यचे आणि खरं सांगते जी मुलं तेंव्हा नापास झाली होती किंवा कमी मार्क्स मिळवायची ती आज आयुष्यात आलेल्या कठीण परिक्षांना तोंड देत ठामपणे उभी आहेत.