शब्दवर्षा :पाक्षिक सदर १३/२/२०२३ : कहे दो के तुम हो मेरी वरना..
विषय :
कहे दो के तुम हो मेरी वरना.......
यापुढे काहीही असू शकत नं! मी जीव देईन किंवा तूझा घेईन ही! काहीही!
त्यामुळे या वरना ची आता भीती वाटायला लागली आहे.
मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, ही प्रेमातली आर्तता, व्याकुळता नक्कीच समजून घेता येईल. पण समोरच्या व्यक्तीने नकार दिल्यावर तो पचवता न येणारा अहंकार कुठुन येतो ? त्याच काय करायचं? तू आत्ताच्या आत्ता होकार दे नाहीतर मी मरतो आणि तुलाही मारतो.
ज्याला प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या करायची असते त्याच्या मनात इतकी टोकाची सूडभावना कशी काय येते? जिच्यावर प्रेम केले तिलाच मारायचं? तिचाच छळ करायचा? मग प्रेम होतं की नाही? की फक्त हव्यास? निर्जीव वस्तूंप्रमाणे ती मिळवण्याची जिद्द? आणि एकदा प्राप्त झाली की मग संपलं सगळ प्रेम-बिम! आणि नाही मिळणार असे दिसताचं संपवून टाकायचे.
प्रेमात असलेला त्याग, ओलावा कुठे जातो?
एकतर अति प्रेम किंवा सूड!
दोन टोकं! मधले काहीच नाही.
इतकी क्रुरता! माणुसकीचा पार चेंदामेंदा झाला आहे.
नैराश्यातून स्वतः आत्महत्या करणे आणि नैराश्येतून दुसर्याचं आयुष्य संपवणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
अपराध दोन्ही ठिकाणी आहेचं.
एक मुलगा आणि एक मुलगी दोघांची छान मैत्री होते. मानसिक पातळीवर खरंच मित्र असतात का माहित नाही पण भेटलं की पहिले मिठ्या मारायच्या. का? आमची मैत्री आहे. मग मैत्रीणीने प्रेमाचा अव्हेर केला की ती लगेच शत्रु होते. नकार दिला की डायरेक्ट मर्डर!!
पण मग ती मैत्री कुठे जाते?
लोकांची वैयक्तिक आणि सामाजिक सहनशीलता कमी झाली आहे हे कदाचित यामागील एक महत्त्वाचे कारण असावे आणि हीच गोष्ट जास्त घातक आहे.
सामाजिक सहनशीलता कमी झाली की दंगे होतात. कोणीतरी निष्पाप बळी पडतो. थोड्यावेळाची हळहळ! परत ये रे माझ्या मागल्या!! आणि दुर्दैवाने या दंग्यात शक्य असेल तर बायकांचाच बळी घेतला जातो. कारण निसर्गाने अब्रु नावाची गोष्ट तिच्याच पदरात टाकली आहे. मग तिची विटंबना करा आणि बदला घ्या. सर्वात सोप्पी गोष्ट!! पुरुषार्थ त्यातच आहे. इतिहास साक्षी आहे!
सध्या एक खटला गाजतो आहे. प्रेयसीचे तिच्या प्रियकराने ३६ तुकडे केले. वाचून थरकाप झाला. इतका हिंस्रपणा?
ज्याच्यावर जिवापाड प्रेम केले त्यानीच जेव्हा गळ्याला चाकू लावला असेल तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल? स्वतःला कोसलं असेल की त्या नराधमाला त्यानी दिलेल्या आणा-भाकांची आठवण करुन दिली असेल? मारु नको म्हणून गयावयाही केली असेल? काय असेल तिची तेव्हाची स्थिती?
आणि त्याची पण!
एका पशुसारखी!की खाटिक!!
का ती जनावर आणि तो खाटिक!!!
मग तंदूर केस आठवली, मग हुंडाबळी,अॅसिड फेकायच्या घटना, विहीरीत ढकलून मेलेल्या स्त्रिया आठवल्या.विधवा झाल्यावर घरातल्याच पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया आठवल्या आणि काळजाचं पाणी पाणी झालं.
कुठे चुकतं? एखाद्याला आपण आवडतो ही किती सुंदर, तरल भावना आहे. पण त्यामागे दडलेल सत्य जर एवढं भयानक असेल तर कोण कोणावर प्रेम करेल? प्रेमविवाह झाल्यावर ही संशय आला म्हणून पति किंवा पत्नीचा खून करणाऱ्या व्यक्ती आजूबाजूला आहेतच.किती सावध राहायचं?
घरच्यांनी/समाजानी लग्नाला विरोध केला म्हणून एकमेकांसोबत आत्महत्या करणारे प्रेमी जीव दुर्दैवीच पण नकार दिला म्हणून दुसर्याचा जीवच घ्यायचा, ह्या सारखे दुर्दैव ते कोणते? ही हीन मानसिकता कोणती? कसं थांबवणार हे सगळं?की अजून यातली हिंसकता, वारंवारता वाढतचं जाणार?
काय होणार?
हे असचं चालतं राहणार!!!
प्यार का अंजाम किसने सोचा, हमतो मोहब्बत किये जा रहे हैं.........