माणूस सवयींचा गुलाम असतो,हे वाक्य बरेचदा आपण ऐकतो, वाचतो आणि खरं सांगायचं तर अनुभवतो पण!
एखाद्याला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो. मग पाच-दहा मिनिटे उशीर झाला तरी पण चिडचिड सुरू होते. कोणाकोणाला सकाळी उठल्यावर दारात पेपर हवा असतो, नाही दिसला की बेचैनी येते. खरंतर दिवसभर विविध चॅनेल्सवर बातम्यांचा रतीब घातला जातो. पण पेपर वाचण्यात वेगळंच समाधान असतं. काही माणसे सकाळी उठलीत की पहिले मराठी गाणी लावतात. त्यांच्या मते सकाळी अभंग ऐकले की प्रसन्न वाटतं, मान्य आहे पण रात्री जागरण केलेल्या माणसाचे काय?
थोडक्यात सवयी या सापेक्ष असतात आणि माझं ते प्रेम नि दुसर्याचं ते लफडं या श्रेणीत मोडणाऱ्या असतात.
जेव्हा माणूस एखाद्या विशिष्ट गोष्टीची पुनरावृत्ती करत राहतो ती गोष्ट म्हणजे सवय किंवा खोड! मग ती गोष्ट त्याच वेळी त्याच पद्धतीने झाली पाहिजे ही पुढची पायरी असते. हे भूत केव्हा मानगुटीवर येऊन बसतं समजतं नाही.
सवय का लागते, कशी लागते यामागे काही ठोस कारणं आहेत का? या गोष्टींचा अजून तरी नीटसा शोध लागलेला नाही.सवय लागते हे मात्र नक्की!
माझ्या मैत्रीणीच्या सासूला एक खोड होती भाजलेले शेंगदाणे खाल्ले की सालं जिथे बसेल तिथेच टाकायची. बरं आजारी वगैरे काही नाही, इकडे तिकडे हिंडायच्या. धडधाकट होत्या. तरी सवय तशीच. सालं तशीच पडली असायची. कोणी पंखा लावला की मस्त इकडे तिकडे उडायची. मैत्रीण बिचारी कुंचा घेऊन सगळं झाडायची.सर्वांनी सांगून झालं,पालथ्या घड्यावर पाणी. मग एक दिवस घरातल्या सर्वांनी मिळून ठरवलं की आता काहीतरी करायला हवंच. मैत्रीणीने भरपूर दाणे भाजले. सर्वांनी ठरवून दाण्याची फोलपट सोफ्यावर, गादीवर, जमिनीवर, डायनिंग टेबलवर जिथे खाल्ली तिथेच ठेवली. दिवसभर तेच. संध्याकाळी आजींनी अक्षरशः सर्वांची माफी मागितली पण माफी मागतांना सून कसा ओटा नीट धूत नाही,कणीक कशी ओट्याला चिकटलेली असते, नातू कसा शाळेतून घरी आला की दप्तर सोफ्यावरच फेकतो आणि मुख्य म्हणजे मुलगा बाहेरून घरी आला की बूट बाहेर न काढता हॉलमध्येच येऊन काढतो ते पण सांगितले. सगळ्यांनी निमूटपणे चूकीच्या सवयी बदलल्या.
कोणी कोणाचे कान टोचले होते माहित नाही.
सगळ्यांत त्रासदायक सवय म्हणजे खोटे बोलण्याची सवय आणि चुगल्या करण्याची सवय!
खोटे बोलण्यात एखादा फारच पटाईत असतो.सहजपणे या हाताची थुंकी त्या हातावर करतो. लोकांच्या भल्यासाठी खोटे बोलणं चांगल असं म्हणतात. मला नाही ते पटतं. खोटं ते खोटंच! ती सवय वाईटच!
(तो श्रीकृष्णच ते करु जाणे)
पण चुगल्या करणे, लावालावी करणे ही सवय त्याहूनही वाईट! ही सवय अनेक गैरसमज पसरवते आणि लोकांमध्ये विनाकारण भांडण होतात, मनं कलुषित होतात, मैत्री तुटते. अशी सवय असणारे लोक समाजासाठी हानीकारक असतात. मला वाटतं असे लोक जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाहीत, त्यांच्या सवयी बदलत नाही तोपर्यंत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकावा. ही सवय खतरनाक आहे.
ती तूझ्या बद्दल अस बोलतं होती..... अशी कोणी बोलतांना सुरवात केली मी लगेच सावध होते....
काही काही सवयी मात्र गंमतशीर असतात. माझी एक मैत्रीण काही झाले की अय्या हो क्का! अस म्हणतं असते, तर दुसरी मैत्रीण होन, होन, हे प्रत्येक वाक्यागणिक म्हणते.
आमच्या शेजारच्या काकू काही झाल की 'हो नाहीतर काय' हे वाक्य दर 15/20 वाक्य झाले की टाकतात.बाजुच्या आजी जेवायला आल्या की आंब्याच्या लोणच्याची फोड कितीतरी वेळ चोखत बसतात. सगळ्यांची जेवण होत आली तरी यांच बाठ चोखणं सुरुच असतं. एक काका घराचे कुलूप दहावेळा ओढून पहातात तर एक काका किल्ली हरवेल म्हणून पाच किल्ल्या तयार करून स्वतःजवळच ठेवतात.
तंद्री लागली की नखं कुरतडणे, सतत नाकात बोट घालत राहणे, करकर डोके खाजवणे या सवयी घाणेरड्या प्रकारात मोडतात.
चांगल्या सवयी या लहानपणीच लागतात.'पाठीमागे अंधार' हा आमच्या घरचा नियम होता. खोलीतून बाहेर पडलं की लाईट बंद करायचा.
वीजेची आणि पैशाची बचत! दर आठ दिवसांनी पाणी यायच त्यामुळे पाणी वाचवण्याची सवय आपोआपच लागली. कोणाला डायरी लिहीण्याची चांगली सवय असते. कोणाला व्यायामाची चांगली सवय असते.चांगल्या सवयी या ठरवून लावायला लागतात.
२१ दिवसांचा वेळ कोणतीही सवय लावण्यासाठी आणि सोडण्यासाठी द्यावा असं WA युनिव्हर्सिटी सांगते.
काही मुलांना दारू आणि सिगारेट पिण्याची सवय खूप तरुण वयात लागते तेव्हा मात्र वाईट वाटतं. आजकाल मुलीपण सर्रास स्मोकिंग करतांना दिसतात तेव्हा जीव हळहळतो.
सुरवातीलाच नाही म्हणता आले पाहिजे. पण उत्सुकता असते, पिअर प्रेशर असतं. अवचटांचे पुस्तक या सवयींवर खूप छान प्रकाश टाकतं. वाईट सवयी सुटण्यासाठी मनाचा निग्रह लागतो नाहीतर मग कठीण होऊन बसतं.
आजकाल तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सहज सापडते. कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था ह्यांना जबाबदार धरलं तर पुर्वी पण लोक चूना-तंबाखूची चंची जवळ बाळगून असायचेच. तोबरा भरलेला असायचाच. तेव्हांही दारुडे होतेच. आजकाल तर ही सवय स्टेटस सिम्बॉल झाली आहे. सवय कशी लागते हे गूढच आहे. ठोस कारण नाही मिळाले.
सवयीचं व्यसनात रूपांतर होणं हे घातक असतं.
टोमणे मारणे ही अजून एक वाईट सवय आहे.एखादं वेळेस ठीक आहे पण सतत जर तुम्ही लोकांना टोमणे मारत असाल तर ती सवय तुम्हांला एकटे पाडल्याशिवाय राहाणार नाही.
अजून एक सवय म्हणजे उसने मागणे. बरेच लोक म्हणतात की यात आपलेपणा असतो. पण मला वाटत घरात जे सामान आहे त्यात गृहिणीला निभावता आलचं पाहिजे. उधार - उसनवारी ची सवय ही वाईटच.
सकाळी लवकर उठणे आणि लवकर झोपणे,ह्या चांगल्या सवयी आहे हे मानणारे लोक आता कमी होत चालले आहेत तसेच नियम न पाळणाऱ्या भूषणरावांचे प्रमाण ही वाढीस लागले आहे.
रस्त्यावर थुंकणे, पान खाऊन पिचकार्या मारणे आणि रस्त्यावर लघुशंका करणे या जगमान्य चूकीच्या सवयी आहेत आणि दुर्दैवाने या सवयींची आपल्याला ही सवय झाली आहे.