श्रावण कहाण्या : एक आठवण ठेवा

श्रावण कहाण्या : एक आठवण ठेवा

लहान असतांना प्रत्येकाच्या घरी संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक असायचेच.कहाण्या वाचणे हा माझा आवडता छंद.
श्रावणात शाळा 12:30 च्या ऐवजी 10 ला च सुटायची. मग सगळ्या मैत्रिणी महादेवाच्या मंदिरात जायचो.दर्शन झालं कि बाजूला सभामंडप होता म्हणजे अजूनही आहे. तिथे 8/10 जणींचा घोळका कहाण्या ऐकत बसायचा.खुलभर दूधाची, शिवामुठीची,नागपंचमीची, फसकीची,संपत शनिवारची,मंगळागौरीची अशा कितीतरी कहाण्या ऐकायचो. कधी सकाळी पूजा झाली कि आणि कधी परत संध्याकाळी. मला तर जवळपास सगळ्या कहाण्या तोंडपाठ होत्या. कदाचित एखादी कथा रंगवून सांगायची कला आपल्या पिढीला या संस्कारातून मिळाली असच वाटत.किती मनोभावे आपण कहाणी ऐकायचो.नागकन्या-देवकन्या बरोबर दुःखी माणसांनाच कशा भेटायच्या? त्यानांच वसा द्यायच्या आणि त्याला राज्य मिळायच,स्त्री असेल तर नावडतीची आवडती राणी व्हायची.किती स्वप्नवत होत सगळ.आपण वेगळ्याच जगात जायचो. मला या कहाणी लिहीणाऱ्या लेखकाला भेटायची खूप इच्छा होती आणि अजूनही आहे. केवढा कल्पनाविस्तार!!

मला या सगळ्या कहाण्यांमधे फसकीची कहाणी खूप आवडायची.त्या फसकी शब्दाला एकप्रकारची लय आहे. ' जय महादेवा,घे फसकी व दे लक्ष्मी'. मग मी आणि माझी मैत्रीण वेगवेगळ्या पद्धतीने हे वाक्य म्हणायचो.
आणि पुढची गंमत म्हणजे नंदीच्या पाठीवर तांदूळ व्हायचे,ते सगळे तांदूळ
घरंगळत खाली सांडायचे मग परत तेच.अर्थात तेवढ्यावेळा नमस्कार पण व्हायचा.
आटपाट नगर खर वाटायचं.

दुसरी खुलभर दूधाची कहाणी. आजीच्या हूशारीच आणि समजूतदारपणाच कौतुक वाटायच आणि एक सामाजिक संदेश मिळायचा.मी आत्तापण महादेवाच्या पिंडीवर थोडसच दूध वाहाते किंवादूधाची पिशवी आमच्या मावशींना देते.
तो महादेव आहे आपण त्याला काय देणार? तो भक्तिचा भूकेला!
अशा या रंजक आणि सुरेल कहाण्यांनी आपल बालपण आनंदात गेल,चांगले संस्कार झाले आपल्यावर.आता मुलांना कहाणी हा प्रकार माहिती आहे कि नाही शंकाच आहे आणि त्यात आपल्या पिढीची पण थोडीफार चूक आहे.हा ठेवा हळूहळू नष्ट होतो आहे!दुर्दैवाने!

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »