पाक्षिक सदर :शतकोटी रसिक, प्रतिबिंब आणि प्रतिमा

पाक्षिक सदर :शतकोटी रसिक, प्रतिबिंब आणि प्रतिमा

प्रतिबिंब शब्द उच्चारला की पहिले माझ्या डोळ्यासमोर हे गीत येतं.

एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख होते कुरुप वेडे पिल्लू तयात एक

पाण्यात पाहतांना चोरुनिया क्षणैक त्याचेस त्या कळाले तो राजहंस एक।

प्रतिबिंब दिसलंच नसतं तर तो राजहंस स्वतःच्या एका वेगळ्याच प्रतिमेला कवटाळून बसला असता आणि आयुष्यभर एक नकारात्मकतेच ओझे घेऊन जगला असता.

इथेच प्रतिबिंबाचे महत्त्व अधोरेखित होते.
पण मग त्यासाठी आरसा हवाच कारण त्याशिवाय कोणीही प्रतिबिंब कसे बघणार? पण तो आरसा फसवा असेल तर मग?

समोरची व्यक्ती आपले खूप गुणगान करत असेल, जरा जास्तच कौतुक करत असेल तर? तर, थांबा कारण तो जो आरसा दाखवतो आहे तो फसवा असू शकतो आणि मग प्रतिबिंब सुद्धा ओघाने फसवेच!
म्हणजेच आरश्यावर किती विश्वास ठेवायचा हा पण एक प्रश्नच आहे.

जत्रेत हसीं चेहरे नावाच एक प्रकार असतो. त्यात विविध प्रकारचे आरसे लावले असतात. आपले प्रतिबिंब त्यात कधी खूप लहान, कधी इतके मोठे असते की आपण त्या आरशात अर्धेच दिसतो तर कधी खूप लठ्ठ तर कधी बारके, कधी आपल्याला 8/10 प्रतिबिंब एकाच वेळी दिसतात. आपण खूप हसतो कारण ते खोटं आहे हे माहीत असतं. अर्थात स्वतःवरही हसता आलंच पाहिजे,केव्हातरी, कधीतरी! मी तर म्हणेन नेहमीच!

पण यावरुन एक मात्र स्पष्ट होतं की प्रतिबिंब कशीही असू देत चेहराच खरा असतो.

पण चेहर्‍यावर नकाब ओढून असलेले आजूबाजूला असतातच की!

प्रतिबिंब या शब्दाचा अजून एक अर्थ म्हणजे छबी!
तारुण्यात पदार्पण करतांना ही छबी फार हवीहवीशी वाटते. आरशात छबी न्याहाळत बसणे हे तारुण्याचे लक्षण आहे. मग तो आरसा दुसर्‍याच्या टू-व्हीलरचा असो किंवा रस्त्यावरच्या दुकानातला! छबी दिसल्याशी मतलब! आरसा दिसला की माणूस डोकावणारचं! माणूस या छबीला फार म्हणजे फारच जपतो.

कारण प्रत्येकाला त्याच प्रेम सुंदरतेतच दिसतं!

तारुण्य थोडे ओसरायला लागले, संसारात पडलो की मग आरशात बघायला ही वेळ मिळत नाही. पण आपल्या वागण्या-बोलण्यातून आपण आपली एक प्रतिमा निर्माण होत असते आणि ती फार महत्वाची असते. त्या प्रतिमेचा आपल्या बाह्य सौंदर्याशी काहीच संबंध नसतो. आंतरिक सौंदर्य इथे सर्वांना भूरळ घालतं आणि हेच मला जास्त आवडतं.

काही काही व्यक्तींच्या आपण बघताक्षणीच प्रेमात पडतो पण नंतर हळूहळू ते प्रेम कमी कमी होत जातो. ती पहिली छबी धूसर व्हायला लागते. याच्या उलट एखाद्या व्यक्तीकडे आपण सुरवातीला दुर्लक्ष करतो किंवा ती आपल्याला आकर्षुन घेत नाही पण नंतर सहवासाने आपल्याला ती व्यक्ती आवडायला लागते, हवीहवीशी वाटते. तिची प्रतिमा मनात ठसते ती कायमची!!

प्रतिमा हा एक खरतंर प्रतिकात्मक सामाजिक आरसा आहे. इथे तुम्हांला तुमची प्रतिमा जपावी लागते. तिला तडा जाऊन चालत नाही. अर्थात ती जपतांना तडजोड ही आलीच.

मग तुम्ही म्हणाल प्रतिबिंब नाही का जपावं लागत? हो ते पण महत्वाचे आहे. आरशाला तडा गेला की ते पण विचित्र दिसतं.
प्रतिबिंब आपलंच असत तशीच प्रतिमाही आपलीच असते पण प्रतिमेला जास्त जपावं लागतं कारण ती लोकांच्या मनःपटलावर तयार होते, या प्रतिमेला खूपसारे कंगोरे असतात. एकासाठी ती अत्यंत सुंदर असते तर दुसऱ्यासाठी तेवढीच टाकाऊ!!

अनुभवी नजर प्रतिबिंब आणि प्रतिमा यातला फरक लगेच टिपते.

आपली प्रतिमा आपल्याच मनात किती वेगळी असते.
तो कोण असतो तर राजहंस आणि बदकांच्या कळपात त्याची अवस्था काय असते! म्हणजे आपल्या आजूबाजूला कशाप्रकारचे लोक आहेत त्यावरूनही आपली एक प्रतिमा तयार होते. आधुनिक भाषेत त्याला *सर्कल* असे गोंडस नाव आहे.

दानशूर कर्ण जर कौरवांच्या सहवासात नसता आला तर त्याची प्रतिमा अजून उजळून निघाली असती का?

बदक की राजहंस ते आपणचं ठरवायचं असतं.

नकली चेहरा सामने आए असली सूरत छुपी रहे।

हेलन केअर सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला मात्र ना आरशाची गरज होती ना प्रतिबिंबाची! कारण त्यांची आभाळाएवढी प्रतिमा सर्वांच्या मनःपटलावर कायमची कोरली गेली आहे.

अगदी दृष्टीहीनांच्याही!!!

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »