काल सगळीकडे अमेरिकेतील लाॉसएजेलिस मधील आगीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. खरंतर गेले एकदोन दिवस ही बातमी ऐकत होतो पण असं वाटलं की नेहमीप्रमाणेच लागलेला वणवा असावा, होईल शांत! पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच दिसतंय, आग अजूनही भडकलेली आहे, किती जणांचा जीव घेणार, काय माहीत.
करोना च्या काळात ही एका हॉस्पिटलमध्ये असेच शाॅर्ट सर्कीट होऊन आग लागली होती आणि लहान बाळांचा जळून मृत्यू झाला होता.
आग आणि पाणी ही दोन मला वाटतं निसर्गाची खास शस्त्रं आहेत ज्याच्या बळावर निसर्ग मानवाला नामोहरम करतो.
मानवाचे काहीही चालतं नाही या दोन गोष्टींसमोर!
खरंतर मानवाने कितीतरी अशक्य गोष्टींवर नियंत्रण ठेवले आहे. चक्क चंद्र, मंगळ त्याच्या आवाक्यात आले आहे, खरोखरच मानवाला गर्व वाटावा अशाच या गोष्टी आहेत पण मग जे दोन अंतराळवीर अंतराळात अडकले आहे त्यांना परत आणणे का कठीण होऊन बसले आहे?
का ही लाॉसएजेलिसमधील आग सहजासहजी विझत नाही आहे?
अटलांटाला बर्फ पडतो आहे, मग का नाही थोडासा बर्फ एलेला पडतं आणि ती आग विझवतं.
आसामात ब्रम्हपुत्रेला पूर येतो आणि महाराष्ट्रात आपणं एकेका थेंबासाठी तरसतो.
मग लक्षात आलं माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या डोक्यात फक्त या गोष्टी येऊ शकतात, पण माझ्या हातात काहीच नाही. मी एक क्षुल्लक बाब!
मग अचानक लक्षात आलं की लाक्षागृह जळून खाकं झालं होतं पण पांडव वाचले होते. का?
तो परमात्मा त्यांच्या पाठीशी उभा होता म्हणून!
म्हणजे त्याची इच्छा असेल तर खरंच सगळे योग्य होणार, नाही तर द्वारका तरी कुठे वाचली?
लाक्षागृहाचा परिणाम म्हणजे दुर्योधन आणि कंपूत आनंदाचे वातावरण होते, ते मजेत होते, भ्रमात होते.
अशाचप्रकारे महासत्ता ही भ्रमात होती का? सर्व काही आपल्या ताब्यात असल्याची गुर्मी, भावना मानवजातीला रसातळाला नेणार का? सर्वपेक्षा अहंकार मोठा ठरणार का?
आगीत जसे सर्व जळून खाक होते पण कोणतातरी कीडा बहुतेक झुरळ हा सर्वात शेवटी मरतो म्हणतात तसंच आयुष्य जगतांना सर्व भावभावनांचा नाश होतो पण अहंकार उरतोच असे म्हणतात.
तो का नाही असा जळून खाक होतं?
समजायला लागल्यापासून अहंकार जोपासल्या जातो.
पैसा, श्रीमंती, सौंदर्य या बाबी अहंकाराला खतपाणी घालतात आणि हा अहंकार आभाळाला भिडतो.
कधी कधी वाटतं नको असणाऱ्या वस्तू माणूस दुसर्याला देऊन टाकतो किंवा नको असलेला कचरा जाळून टाकतो तसं एखादं लाक्षागृह माणसाने बांधायला हवं. नको असलेल्या वस्तूसारखा अहंकार त्या लाक्षागृहात जाळण्यासाठी टाकून द्यायचा आणि परत फिरायचं......
पण परत फिरलेले उलटे पाऊल अहंकाररूपी असेल.... पहा मी अहंकारावर कशी मात केली.....