कोंडी

ललित लेख


*कोंडी*

परवा हा शब्द कुठेतरी वाचला आणि जाणवलं की अरेच्चा हा ही शब्द हळूहळू लोप पावतो आहे की काय?

कोंडी करणे, कोंडी होणे म्हणजे थोडक्यात पेचात पडणे किंवा अडचणीत टाकणे, सापडणे होय.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मुसलमान राजवटीची कोंडी करुन त्यांना पलायन करायला लावले होते. कित्येक लढाया त्यांनी शत्रुला कोंडीत पकडून जिंकल्या होत्या.

दुसर्‍याची कोंडी करणारी व्यक्ती ही तल्लख, हुशार आणि सारासार विचार करणारी असावी लागते.

राजकारणात होणारी कोंडी ही कधीतरी कोणासाठी केविलवाणी असते तर कोणासाठी विजय निश्चित करणारी असते. जो इतरांची कोंडी करण्यात तरबेज असतो तो राजकारणात यशस्वी होतो.

पण कोणाचीही इतकी कोंडी करु नये की त्याला स्वाभिमान गमावून मग कदाचित जीवच गमवावा लागेल.

कोंडी करणे हा राजकीय खेळीचाच एक भाग आहे. मग ते राजकारण घरचे असो वा दारचे!
सासू कधीतरी डाव साधते आणि सुनेची कोंडी करते तर हाच डाव सूनही मोक्याच्या क्षणी उलटवतेच! ह्या कोंडीत सापडणाऱ्या पुरुषाचे मात्र काही खरं नसतं.

कोंडी अजून एका गोष्टीची होते.ती म्हणजे वाहतुकीची! ही कोंडी कोणत्याही क्षुल्लक कारणावरून होऊ शकते. पण यामुळे होणारा मनस्ताप जास्त असतो. मुख्य म्हणजे जेव्हा या वाहतुक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकून बसते तेव्हा धस्स होतं.
ही कोंडी खरंच मनस्ताप देते.

वेगवेगळ्या नकारात्मक विचारांची जेव्हा मनात कोंडी होते तेव्हा ही माणूस आतातायी भूमिका घेतो म्हणजे कोंडी आतली असो की बाहेरची, तिचा निचरा हा व्हायलाच हवा. नाहीतर गुदमरून जायला होईल.

एखाद्या रहस्याची कोंडी फोडणे हे किती महाकठीण असते हे ती पोलिसयंत्रणाच जाणे. ते आहेत म्हणून आपण सेफ आहोत.

कोंडी शी संबंधित अजून एक शब्द म्हणजे कानकोंडे होणे.
आपल्या घरी पाहुणे आलेले असतात, बघण्याचा कार्यक्रम असतो आणि मोठ्यांच्या गप्पा सुरु असतात. तितक्यात घरातील एक लहान मुलं येतं आणि असे काहीतरी बोलून जातं की कानकोंड्यांसारखे होतं प्रत्येकाला.
उदाहरणार्थ आई म्हणते की हे पोहे न आमच्या सुलुने केले आहे.
सुलु छानशी लाजते वगैरे पण तितक्यात तिचा लहान भाऊ म्हणतो की आई ताईने केलेले वातड पोहे तर मी मगाशी खाल्ले, हे तू केले आहेस नं? मस्त झाले आहेत. तू च करत जा पोहे!

कानकोंड्यांसारखे होणे!!!! आई आणि सुलू
दोघीही कोंडीत सापडतात.

ही परिस्थिती बरेच वेळा सत्कार समारंभात ही येते. मुख्य पाहुण्यांचे ओळख करून देणारा त्यांच इतके कौतुक करतो कि त्यांना कानकोंड्यांसारखे होते. कारण तिथे ही त्यांना ओळखणारे बरेच असतात.
तर कधी कधी मुख्य पाहुणे इतका वेळ बोलतात की आयोजकांची कोंडी होते.

आयुष्यात अशा अनेक कोंडीत माणूस सापडतो पण ही कोंडी फोडून त्यातून शिताफीने बाहेर पडणारा सिकंदर होतो. हे एक कसब आहे आणि ते आत्मसात करणे आवश्यक आहे.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »