हे नाव माझ्या मुलीने दिले आहे.आई कुकि कुठे आहे?विचारायला सोपं जातं नं!
कुलूप-किल्ली किती छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे नं! घराला कुलूप लावले कि ती ग्रुहिणी निर्धास्त असते त्या एवढ्याशा जीवावर!मस्त बाहेर जाऊन शाँपिंग करते,बाकीची काम करते आणि आरामात घरी येते. फक्त कुलुपांचा संग्रह हा आपोआपच होत असेल.आत्ताच बघाना सगळ्या गोष्टींना पासवर्ड म्हणजे एक प्रकारचं कुलुप च!लोकांपासून आपल्या गोष्टी जपून ठेवायच्या. न दिसणार कुलुप!अशी अगणित कुलुपं आजची पिढी सांभाळते आहे.
मी लहान असतांना आमच्याकडे चार/पाच कुलुपं होती. मागच्या दारापासून जे कुलूप लावतं यायचो ते समोरच्या फाटकाला लावलेल्या साखळीच्या कुलुपाने त्याचा शेवट व्हायचा.मला तर कंटाळाच यायचा.पण बाबा अगदी पद्धतशीरपणे कुलूपं लावायचे.तीनतीनदा ओढून पहायचे नीट लागले आहे कि नाही ते आणि मगच बाहेर पडायचे.
नंतर गोदरेजची बसकी कुलुप आली, तीन खटकेवाली पांढऱ्या रंगाची,मग ती आणली.प्रत्येक वेळेला तीनदा किल्ली फिरवायची. एकदा आमच्या बाजूच्यांची लूना चोरीला गेली मग अजून दोन साखळी कुलुप घरात आली, एक स्कुटर साठी आणि आमच्या तिघांच्या तीन सायकली मिळून एक !!
हं अजून एक कुलुप म्हणजे गोदरेजच्या आलमारीच,अर्थात ते आतल्या आतच असायच पण किल्ली सांभाळावी लागायचीच.
सिनेमात ती सासू सुनेला किल्ल्या द्यायची आणि म्हणायची बहू आजसे ये जिम्मेदारी तुम्हारी। तूम सम्भालो।काय आदर्श वाटायची ती सासू!(रती अग्निहोत्री च गाण आठवा,सजना सुन सुन मेरी चाबी की छुन छुन)
काय पण आनंद!
माझी मैत्रीण म्हणायची किल्ल्या वगैरे काहीही नको सासूने तोंडाला कुलुप लावून बसाव म्हणजे झालं!(आता ती सासू झाल्यावर उलट बोलते)
एकदा अस्मादिकांनी किल्लीचा बंच हरवला होता.खर सांगते एवढ अपराध्यासारखं वाटतं होत,डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं.बाबा तर ओरडलेच.एक किल्ली शेजारी असायची तरी पण जबाबदारीची जाणीवच नाही हे ऐकाव लागलचं.पण तेवढ्यात वैशू देवासारखी धावून आली. तिच्या सायकलवर डबलसीट आले होते आणि मागच्या कँरिअरला किल्ल्या विराजमान झालेल्या होत्या. हुश्श झाले. पण तेव्हापासून आजतागायत एकदाही किल्ली हरवली नाही.
माझा मुलगा होस्टेलला गेला तेव्हा मी पण त्याला मोठ्ठ कुलुप आणून दिल तर तो म्हणाला आई मी नंबरवालं कुलुप आणलं आहे, किल्लीची गरज नाही.
"हमममम" मी एवढेच म्हणाले.
अजूनही आईकडे 7/8 कुलुपं आणि किल्ल्या आहेत.गंजली आहेत काही, पण कदाचित बाबांनी आणलेली होती म्हणून जपून ठेवली असतील.
कोण कोणाच्या आठवणीत कसा राहील हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.पण आठवणींना कुलुप घालता येत नाही हे खरं कारण चोरीचीही भीती नसते नं!
कुलुपालाही किल्लीची भाषा समजत असेल का?निदान चोराला तरी कुलुपाच्या मनात काय असाव ते कळाव.कुलूप सांगत असेल का कि बाबारे माझ्या भरवशावर हे लोक घर सोडून गेले आहेत, तू नको चोरी करुस इथे.हा संदेश चोरापऱ्यंत जात असेल का?
किंवा चोर कदाचित त्याला म्हणत असेल अरे पापी पेट का सवाल हैं।गरिबीची भाषा तूला कशी समजणार?
पण काहीही म्हणा त्या छोट्याशा,गोंडस कुलुपानी माझ्या मनात घर केलेले आहे हे नक्की.