ज्योत

ज्योत

दिवाळी आली कि सगळी जण खूष असायची मी पण असायचो. आई मला एका जागेवर बसवून ठेवायची. मी तिथे बसूनच फटाक्यांचे आवाज ऐकायचो. आईला माझी सतत काळजी असायची. माझा पाय दिव्यांवर तर पडणार नाही न. याकडे ती सतत लक्ष ठेवायची.

दोन वर्षांपूर्वी एक काका आले होते आमच्या कडे. आईला म्हणाले तुमच्या मागे याच कस होणार? काय सोय केली आहे याची? आई काहीच नाही बोलली. पण मला जाणवायचं ती रडते आहे ते.

एकदा आम्ही एका hospital मधे गेलो होतो Form भरायला. तिथे लोक मरणोत्तर डोळे दान करायचे. आईने माझ नाव दिल कारण मी पण आंधळा होतोन. पण तिथला माणूस म्हणाला ताई गरीबाच सगळीकडेच कठीण असत हो. इतक्या लवकर तुमचा नंबर लागण कठीण आहे. तुम्ही त्याला मुंबईला घेऊन जा आणि इलाज करा. पण पैसे कुठून आणायचे! आई काय बोलणार बिचारी!!

तिला मोठ्या डॉक्टरांना भेटायच होत पण जमत नव्हत.

एक दिवस आईला कळल कि ते डॉक्टर आमच्या गावात आले आहेत. ते डोळ्यांची आँपरेशन्स खूप कमी पैशात करायचे. आई लगेच त्यांना भेटायला गेली. पण त्यांनाच बर नव्हत अस कळल. किडनी का काहीतरी खराब झाल होत त्यांच. आमच्या भागात ते एकच डोळ्याचे डॉक्टर होते. ते जर गेले तर मग माझ कठीण होत. मुंबईला जाऊन आँपरेशन करण आम्हाला शक्यच नव्हत. आईची खूप इच्छा होती कि मी हे जग पहाव अशी.

आज माझ डोळ्यांच आँपरेशन होत. आईने सांगितले कि मी एका डोळ्याने पाहू शकेन. कोणीतरी नेत्रदान केल होत. मला आश्चर्यच वाटले कि इतक्या लवकर कसा काय आमचा नंबर लागला. आज माझी पट्टी काढणार आहे.

आणि तेच डॉक्टर माझ्या समोर उभे होते जे मरायला टेकले होते. मी आता दिवाळी चे दिवे पाहू शकत होतो. पमी, राजा आणि मन्याला मी पाहात होतो. माझ जग बदलल होत. मी खूप आनंदात होतो.

पण का कोणास ठाऊक आई सारखी आजारी पडत होती आणि आज दिवाळीच्या दिवशी माझी आई देवाघरी गेली.

सगळे जण म्हणत होते एका किडणीवर किती दिवस जगणार बिचारी!!!

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »