भांडण

भांडण

जोरात बेल वाजली तशी वनिता धावतच दार उघडायला गेली. लेकीची बेल वाजवण्याची style तिला माहीत होती. दार उघडत नाही तर बाईसाहेब आल्याच तणतणत आत. चेहऱ्यावर काय झाले ते दिसत होतच.

काय ग आज परत भांडण का निखिल शी?

तस लीना जोरात हो म्हणाली. लीना मनोज आणि वनिताची मुलगी.

तितक्यात आतून मनोज वनिताचा नवरा जोरात ओरडला अग माझा निळा शर्ट कुठे ठेवला आहेस? एक गोष्ट जागेवर सापडेल तर शप्पथ! नुसत्या गप्पा ऐका हिच्या व्यवस्थितपणाच्या.

हो मग तुम्ही सगळ अगदी जागेवरच ठेवता न? टीपटाँप!! परवा पासबुक मी शोधून दिल. चालत चालत गादीखाली गेल होत झोपायला! इति वनिता.

माणूस चुकू शकतो एखादवेळेस. एवढ काही टोमणे मारायला नको. मनोज म्हणाला.

मी टोमणे मारते. मी?? माझे बाबा आवाज करत कढी प्यायचे तर सायलेंसर गेलेल्या फटफटीचा आवाज येतो आहे अस तू आणि भाऊजी म्हणायचे. काय मुर्ख आहे का मी? माझ्या माहेरची माणस मोठ्या मनाची म्हणून निभवल सगळ. 100 च्या ऐवजी 123 माणसे आणली होती लग्नात. माझे बाबा काही बोलले नाहीत. देवमाणूस होते बिचारे. इति वनिता.

ते पण सांगन माझ्या आईने दोनाच्या ऐवजी चार सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या तुला लग्नात. ते नाहीच कबूल करणार तू. सोयिस्करपणे विसरते माझ्या आईने केलेल! मनोज उवाच.

आहे हं लक्षात. वन्सना ४ बांगड्या घातल्या म्हणून मला ही ४! मोठेपणा दाखवण्यात तुमची आई पटाईत.

आणि तुमच्या बहिणाबाई स्वत:ला तर काय मालासिन्हा च समजायच्या. कसल मेल नाकाच भज झालेल. तोडली कि माझ्या आईने दिलेली नथ!

पण तू दुप्पट किंमतीची ठुशी घेतली न. आवळा देऊन कोहळा काढण छान जमत तुला. मनोज उवाच.

आणि काय हो विसरलात का? लग्नाचा 25 वा वाढदिवस? मला चपलाहार आणायला निघालो होतो आपण. पण गाडगीळांच्या पायरीवर चप्पल ठेवत नाही तर भाऊजींचा call आला. 40000 आहेत का दादा? घरासाठी कमी पडतात आहे. लगेच महाराजांनी about turn घेतला. लग्नाचा 25 वा वाढदिवस चांगला लक्षात आहे माझ्या. वनिता उवाच.

हो पण घरी येऊन भांडलीस कि कडकड . त्याच काय? मनोज म्हणाला.

वनिता काही बोलणार इतक्यात लीना म्हणाली

आई थांब. तुमच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस मला नीट आठवतो आहे. तुम्ही दोघे मजेत होता. आपण बाहेर जेवायला गेलो होतो. मग भांडलात केव्हा तुम्ही दोघे??

आमच्या रुममधे जाऊन. वनिता म्हणाली.

तसा मनोज म्हणाला, ‘अग तुझी आई काय अशी तशी नाही आहे. Phd केली आहे तिने भांडण या विषयात. निखिल शी भांडण झाल न कि काँल करत जा आईला. टीप्स मिळतील छा….न !!”

म्हणजे आई-बाबा तुम्ही दोघे भांडायचे एकमेकांशी? आमच्या सारखेच!! तरीही तुमच प्रेम टिकून आहे एकमेकांवरच!!

कोई शक!! दोघेही एकदमच म्हणाले.

हे ऐकल्यावर लीनाने तडक बँग उचलली आणि येतेग आई म्हणून निघाली सुद्धा .

दोघांनीही तिला अडवायचा प्रयत्न नाही केला.

तितक्यात आतून टाळ्या वाजवत निखिल बाहेर आला आणि त्याने दोघांनाही नमस्कार केला आणि Thanks म्हणाला. तसा

मनोज म्हणाला, “अरे आमच लग्न झाल तेव्हा घरात आई होती .लहान भाऊ होता . त्यांच्या समोर कस भांडणार?” मग ती सवयच लागली कि लोकांसमोर भांडण करायच नाही. वाद वाढवायचे नाहीत. त्यामुळे लीनाचा ही असाच गैरसमज झाला कि आपले आई-बाबा एकमेकांशी कधीच भांडत नाहीत. पण त्यामुळे तुझ्याशी भांडण झाली कि ती तुमची तुलना आमच्याशी करायची आणि दुःखी व्हायची. तिला वाटायच तिचच काहीतरी चुकत आहे. असो.

पण जमल कि नाही आम्हाला हे भांडण? आता नीघ लवकर आणि जा पटकन घरी. लीना तुझी वाट पहात असेल.

आपले आईबाबा एकमेकांशी कधीच भांडले नाहीत ह्या गैरसमजामुळे आमच्या मुलीच घर मोडायची वेळ आली होती. नवरा-बायको कधीच भांडत नाही असच तिला वाटल. अरे दोन व्यक्ती न भांडता कशा राहतील रे! तिच्या समोर मात्र नाही भांडलो. कारण कुठेतरी वाचल होत कि पालकांच्या भांडणामुळे मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पण थोडस भांडायला हरकत नाही हं. आता तुम्ही लक्षात ठेवा हे! वनिता म्हणाली

अरे, तु आम्हाला हे सगळ सांगितल, विश्वासात घेतलस म्हणून आम्हीच तुला Thanks म्हणतो. तुझ्यामुळे आम्ही हे नाटक करु शकलो. तुझ्यासारखा जावई मिळायला नशीब लागत रे! जप बाबा आमच्या लेकराला. अस म्हणून मनोज ने निखिल ला निरोप दिला.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »