ईश्वर साक्ष खरं सांगेन!

ईश्वर साक्ष खरं सांगेन!
हे वाक्य आपण सामान्य लोक सिनेमात कोर्टसीन असला की हमखास ऐकतो. मला मात्र हे वाक्य माफीचा साक्षीदार मधील राघवेंद्र ची आठवण करुन देतं. इतका त्या सिनेमाचा पगडा मनावर आहे. ज्याचा ईश्वराशी दूर दूरपर्यंत संबंध नव्हता असा राघव! त्याची ती भेदक, खुनशी नजर आणि किडकिडीत देहबोली! पण खून करतांना अंगात संचारणारा राक्षस, सगळं सगळं अंगावर येतं. द ग्रेट नाना पाटेकर! अजूनही मी जेव्हा हा सिनेमा बघते तेव्हा जीवाचा थरकाप उडतो.
असं वाटतं की त्याचे ते खुनशी डोळे फोडून टाकावे आणि सटासट त्याच्या कानफटात द्याव्यात आणि विचारावे की का असा वागला?

जोशी - अभ्यंकर खून खटला कोण विसरणार?

अर्थात नंतर सर्वांना फाशी झाली आणि ती आवश्यकच होती.

पण मग ईश्वर साक्ष खरं सांगेन! हे कोणासाठी असतं? सगळे खरं सांगणार तर मग दोन्ही बाजूंनी वकील कशाला हवेत? शपथ कशाला हवी?
किंबहुना हा क्रूर गुन्हा करतांना ईश्वराची आठवण का होतं नाही? समोरची व्यक्ती ईश्वराचे नाव घेऊन प्राणाची भीक मागत असते तेव्हा तरी एकदा ईश्वर असल्याची जाणीव का होत नाही? या नराधमांचा हात अपराध करतांना कापत कसा नाही? परत गीतेवर हात ठेवून ईश्वर साक्ष खरं सांगेन! हे म्हणायला मोकळे!

हे वाक्य खरंतर किती महत्वपूर्ण आहे. सत्याची कास धरणारे, परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणारेच अशी शपथ घेतात. उचलली जीभ लावली टाळ्याला! एवढे सोपे नाही आहे. पण कोर्टात काय काय घडतं हे सर्वांना माहित आहे त्यामुळे त्यावर चर्चा करून काही उपयोग नाही. पापी पेट का सवाल आहे! पण कुठेतरी आत्म्याला बोच हवी! जाणीव हवी!

का 'तो' वरुन बघणारा प्रत्यक्षात दिसत नाही म्हणून त्याची शपथ घ्यायची आणि मोकळे व्हायचे?
की समाजातील आस्तिकता आता संपत आली आहे ? हा विचार पण कधीतरी मनात येतो.

ईश्वरापुढे कोणीही कधीच खोटे बोलू शकत नाही ही आपली आस्था आहे, विश्वास आहे. लहानपणापासून हेच संस्कार झालेले आहेत. त्यामुळे समोरच्याने देवाची शप्पत म्हटलं की आपण डोळे मिटून विश्वास ठेवतो. कारण त्याच्याकडे आपल्या कर्माची नोंद असते, तो सर्व बघत असतो ही आपली भावना असते.पण ठगणारे असतातच आणि भोळेपणाचा फायदा उठवणारेही! ईश्वराच्या नावाचा असाही उपयोग!

माझी एक मैत्रीण होती जी सर्रास देवाची शपथ घ्यायची आणि खोटे बोलायची. आम्हांला खूप आश्चर्य वाटायचं. एकदा मला म्हणाली की तो कुठे येतो आहे बघायला मी काय केलं ते? शपथ घेऊन मोकळे व्हायचे. अर्थात नंतर ती नास्तिकतेवर लेक्चर द्यायला लागली.
एकदा मी तिला विचारलं की देव जर नाहीच आहे तर खोट बोलतांना त्याचा आधार का घेतेस? छातीठोकपणे खरं बोलता नाही येत का? किंवा खोटे ही? स्वतःच्या जीवावर, हिमतीवर?
ईश्वराच्या नावाने सुरवात का? नका घेऊ त्या शब्दांचा आधार! तुमच्या दृष्टीने तो नाहीच आहे!

आम्ही एकदा काश्मीरला गेलो होतो. तिथे एका बागेत खूप गुलाबाची फुले होती. आम्ही सगळे इकडे तिकडे फिरत होतो. तिथे पण समवयस्कर दोघीतिघी मैत्रीणी जमल्या . तेवढ्यात एक माणूस मागून धावत आला आणि आम्ही गुलाब तोडले म्हणून डाफरायला लागला. आम्ही हातही नव्हता लावला. आम्ही खूप घाबरलो होतो. तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते आईवडिलांना लगेच फोन करायला. ट्रीपमधली ती मैत्रीण म्हणाली, "चाचा अल्ला की कसम हमने तो हाथ भी नहीं लगाया।" त्या म्हाताऱ्याला सूचलंच नाही की काय बोलावे ते कारण एक हिंदू मुलगी अल्ला ची शपथ घेते आहे. आम्ही पळत पळत सगळेजण होते तिकडे गेलो. टूर लीडरला सर्व सांगितले. तो म्हणाला की तेच लोक तोडतात आणि टुरिस्टना घाबरवून पैसे उकळतात.
प्रसंगावधान कशाला म्हणतात हे मी त्या दिवशी त्या मैत्रिणीकडून शिकले.
देवाने आम्हांला वाचवले होते. फुलांना आम्ही हातही लावला नव्हता हे खरे होते !
ईश्वर साक्ष आम्ही खरंच बोललो होतो!

पण आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात कि वेळ मारून न्यायला देवाचे नाव घेतले जाते. 'तो' वरती बसून हसत तरी असेल किंवा आपली किव तरी करतं असेल किंवा त्यानीच निर्माण केलेल्या मानव नामक गोष्टीवर पस्तावत असेल....

मला वाटतं प्रत्येकातच ईश्वराचा अंश असतो या गोष्टीची प्रत्येकाने जाणीव ठेवली तर कोणाच्याही हातून पाप घडणारच नाही आणि 'ईश्वर साक्ष खरं सांगेन! हे वाक्य म्हणायची आणि कोर्टात उभं राहायची गरजच पडणार नाही.

वर्षा हेमंत फाटक, पुणे
(विषय सौजन्य : शतकोटी रसिक)


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 0 Views: 51