चिऊ-काऊ

चिऊ-काऊ
मी टेरेसवर पुस्तक वाचत बसले होते. भरपेट जेवण झाले होते, नाही म्हटले तरी आहारले होते. तितक्यात सुरकन कोणीतरी खांबावरुन पळाले. काळसर रंगाचे, मग नंतर राखाडी रंगाचे.दोन तीनदा ती हालचाल जाणवली. मग मात्र लक्षच ठेवायचे ठरवले आणि बघते तर काय दोन खारी मजेत इकडून तिकडे पळत होत्या. काळ्या रंगाची खारुताई तर मी प्रथमच बघितली. असं वाटलं त्यांना काहीतरी खायला घालावे पण विचार केला की परदेशात उगीचच आगाऊपणा करायला नको आणि खरं सांगू आजूबाजूला एवढी झाडे होती की त्यांचा उदरनिर्वाह सहज होत होता.
मग फिरायला जातांना पण त्या खारी दिसायच्या. एकमेकींना धरुन असायच्या हे मात्र खरं आणि बरीच आपली दिसणारी माणसं जेव्हा एकमेकांना टाळतांना दिसत होती तेव्हा हे खारींचे एकमेकांना असे धरुन राहणे जास्तच भावले.
मला तर मग नादच लागला त्यांच्याकडे बघायचा. त्या पण बहुतेक माझ्या अस्तित्वाला सरावल्या होत्या. सरकन टेरेसवरून खालच्या मजल्यावर जायच्या आणि सतत तोंडात काहीतरी असायचंच. खादाड होत्या बहुतेक!

आणि एक दिवस तर चक्क ससुला दिसला. घाबरत घाबरत इकडे तिकडे बघत सुसाट पळत चक्क आमच्या घराच्या पायरीवर. मीच जोरात ओरडले कारण सवयच नाही न ससा इतका जवळून बघायची! मग मात्र ठरवलं की शांत राहायचे पण महाराज एकदम ४/५ दिवसांनी उगवले. कदाचित माझ्या आवाजाची दहशत बसली असावी.
नंतर मात्र फेऱ्या सुरू झाल्या. सशाला इतक्या जवळून प्रथमच बघत होते. मग ते पण दोघे तिघे मिळून यायचे पण खारींएवढे चपळ मात्र नव्हते. खारी जास्त बिनधास्त वाटायच्या, त्या मानाने ससुला जरा बिचकलेला असायचा. खारींची झुपकेदार शेपटी बघायला मजा यायची.

एक दिवस ब्लू जय दिसला. कार्डिनल दिसला. मी जाम हरखले पण नंतर काही ते दोघे आले नाही.

आणि एकदा चक्क दोन कावळे!
मुलगी म्हणाली, आई तुझा मित्र आला बघ तूला शोधत शोधत! खरं सांगू त्या दिवशी राखीपौर्णिमा होती. मी सर्वांच्या नकळत पुरणाचा एक छोटासा घास झुडपाजवळ ठेवला. दुसर्‍या दिवशी सकाळी तो तिथे नव्हता. खूप छान वाटलं.

शेवटी परदेशात सुद्धा आपला काऊच का जवळचा वाटला?

वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 0 Views: 52