सगळ्यांना पाऊस खूप आवडतो पण मला मात्र पावसाळा अजिबात आवडत नाही. आणि डोंबिवली ला आल्यावर तर तिथल्या रिपरिप पडणाऱ्या पावसाने अजूनच तो नावडता झाला. विदर्भात कस जोरदार पडतो आणि मोकळा होऊन जातो. इथे मात्र चार पाच दिवस सूरुच!थांबायच नावच नाही. असो.
मला हिवाळा खूप आवडतो. मस्त थंडी त सकाळी उठून बाहेर फिरायला जायचे. एकदम फ्रेश वाटत. परत येतांना सूर्याची ची कोवळी किरणे अंगावर घेत घरी यायच. मग घरी येऊन गरम चाय की प्याली हो, कोई उसको पिलाने वाली हो/ वाला हो। गरम पोहे आणि गरम चहा! आहाहा! काय काँम्बिनेशन आहे! हिवाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या मिळतात. मंड्ई त जायला ही मजा येते. मी नेहमी हिवाळ्यातच फिरायला बाहेर पडते.
ही आठवण अटलांटाची आहे. मी आणि राहूल मार्चमध्ये तिथे गेलो. हेमंत आधीच तेथे गेले होते त्यामळे सुरुवातीपासून सुरुवात करायची नव्हती. अटलांटाला बऱ्यापैकी ऊन असत. पण एक दिवस टीव्हीवर सांगितले कि आज रात्री बर्फ पडणार आहे. मी खूप excited होते. कारण मी बर्फ एकदाच काश्मीर ला गेले होती तेव्हाच अनुभवला होता. गुलमर्ग आणि पहेलगामला. पण अटलांटाला आधीपासून राहाण्याऱ्या लोकांकडून कळलं कि गेली 8/10 वर्षे अटलांटाला Snow झालाच नाही आहे. त्यामूळे आत्ता ही खूप अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. मी खूपच नाराज झाले होते. झोपतांना देवाला प्रार्थना पण केली कि उद्या बर्फ पडू दे.
सकाळी नेहमी प्रमाणे उठले. लाईट लावायला गेले तर लाईट लागेना. पण माझी ट्यूब पेटली होती. लगेच टेरेस कडे धाव घेतली आणि दार उघडल आणि बघते तर काय! माझ स्वप्न प्रत्यक्षात अवतरल होत! आकाशातून अलगदपणे खाली आल होत! राहूलला आणि ह्यांना लगेच उठवल आणि मग काय खाली जाऊन धमाल. सगळे लोक बाहेर आले होते. 70% लोक इंडियन होते. का नाही येणार? कोणाच्या बापाने एवढा बर्फ पाहिला होता! पण खरी मज्जा तर नंतर च होती. एक दोघांनी तर बर्फाला साष्टांग नमस्कार घातले. ते पाहिल्यावर मात्र मी, राहूल आणि माझ्या दोघी मैत्रीणी घरी आलो. आता मस्त आल घालून चहा करायचा आणि प्यायचा अस ठरवलं. पण कसच काय? आमच्या कडे लिंकन हील्स ला काँईल होत्या. गँस नव्हता आणि लाईट गेल्यामुळे काँइल वर चहा करायचा प्रश्नच नव्हता. आली का पंचाईत. चहा नाही म्हणजे काय! अमेरिकेची एक नकारात्मक गोष्ट लक्षात आली.
चहा तर हवाच होता. जेवायला बाजूच्या पंजाबी हाँटेल मधे जायच ठरल. पण चहा? दोघेही विचार करू लागलो. काहीतरी तर जुगाड करायला च हवा. तेवढ्यात ह्यांना मी वाँलमार्ट मधून आणलेल्या छोट्या, मोट्या हो मोट्याच आणि बसक्या मेणबत्त्या दिसल्या. त्या तीन मेणबत्त्यांवर न एक छोटीशी जाळी होती आपल्या हाताच्या तळव्यांएवढी. मग काय आमची बिरबलाची खिचडी पकायला सुरुवात झाली. दोन मेणबत्त्या संपेपर्यंत एक कप चहा तयार झाला होता. अवर्णनीय अशी चव होती त्या चहाची.
12 ला जेव्हा सगळे जेवायला जमलो तेव्हा चहा न मिळाल्याबद्दल प्रत्येकाला हळहळ वाटत होती आणि आम्ही सांगितल कि आम्ही चहा प्यायलो. तेव्हा प्रत्येकाने आमच्याकडे असे पाहिले कि विचारू नका. काय नव्हत त्या नजरेत! (खाऊ कि गिळू या वाक्प्रचाराचा अनुभव आम्ही साक्षात घेत होतो.) आमचा प्रयोग सांगितल्या वर तर सगळ्यांना अजूनच वाईट वाटलं. अरे मेरे पास भी मोमबत्ती थी। अस म्हणत दुपारचा चहा करण्याचा (मेणबत्ती वर) बेत सगळ्यांनी ठरवला. पण घरी जाईपर्यंत लाईट आले होते. त्यामुळे ते भाग्य कोणाला लाभल नाही. आम्ही एकमेवाद्वितीय ठरलो.