सगळ्यांच्या दिवाळीच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. पण माझी आठवण मजेदार आहे.
तेव्हा जितेंद्र , जयाप्रदा आणि श्रीदेवी या त्रिकूटाने हैदोस घातला होता आणि त्यात तोहफा सिनेमा तर खूप गाजत होता. रसरंग आणि फिल्मीदुनिया ही मासिक निघायची ज्यात नविन सिनेमाची सगळी माहिती असायची. तोहफा खूप गाजत होता आणि बिनाका गीतमालामधे सगळी गाणी वाजत होती.
आम्हाला कळल कि दिवाळीच्या पहिल्या दिवशी तोहफा अप्सरा टाँकिज ला लागणार आहे. मग काय पहिल्या दिवशीच पहिला शो बघायच ठरल. तेव्हा काही online booking वगैरे नव्हत. जो रांगेत उभ राहून तिकीट काढायचा तो बाजीगर असायचा. तो दिवस त्याचा असायचा. मी, पद्मा, ताई, मीनूताई अशा सगळ्या नऊजणी होतो. एकाला 5 तिकीट मिळणार होती. 12 चा शो होता. आम्ही 11 ला गेलो तर ही मोठी रांग होती. काय कराव? रांगेत नंबर तर लावला पण काही खर नव्हत. अजून 10 मिनिटं लवकर यायला हव होत अस वाटायला लागल आणि मग एकीने शक्कल काढली कि आपण 12 च्या ऐवजी 3 चा शो पाहून जाऊ. कारण 12 च्या शो ची तिकीट मिळण कठीण दिसत होत. पण 3 च्या शोची तिकीट नक्कीच मिळणार होती. दोघी जणी रांगेत उभ्या होत्या. पण मग घरी काय सांगायच आणि मुख्य म्हणजे कोणी सांगायचे? कारण 11 ला घरून निघालेल्या आम्ही 6 ला घरी जाणार होतो. जी कोणी घरी सांगायला जाणार तिने सगळ्यांच्या वाटच्या शिव्या खाण क्रमप्राप्त होत. आमच्या घरी आईने चकल्यांचा घाट घातला होता आणि मी आणि ताई आईला चकल्या पाडून देणार होतो. कारण आईच मनगट दुखायच. काय महाभारत होणार हे लक्षात आल होत पण सिनेमा चा मोह पण आवरत नव्हता.
शेवटी मी आणि पद्मा घरी सांगायला आलो बाबा समोर होते. वाचलो. त्यांना पटकन सांगितल. चिवडा पिशवीत टाकला आणि सटकलो. तिकीट मिळाली होती. घरी आल्यावर काय झाल असेल ते चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलच असेल.
पण आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हतो. प्रत्येकीने एकमेकींच्या नावावर खपवल. आणि मुख्य म्हणजे आल्यावर लगेच अंगणात रांगोळी काढायला घेतली. कपडे बदलून पणत्या लावायला घेतल्या कारण आम्ही लावलेल्या दिव्याचा प्रकाश आईच्या चेहऱ्यावर छानपैकी दिसत होता पण दिवाळीच्या दिवशी रागवायला नको म्हणून ती शांत होती.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी फटाके फुटलेच. दिवाळी साजरी झाली.