मध्यंतरी एक सिनेमा पाहिला होता. एका जोडप्याची एक मुलगी आंधळी असते आणि दुसरी मुलगी नाँर्मल असते. नकळतपणे पालक त्या आंधळ्या मुलीची जास्त काळजी घेतात. पण त्यामुळे त्या नाँर्मल मुलीच्या मनात आंधळ्या बहिणी बद्दल द्वेष निर्माण होतो. ती त्या आंधळ्या बहिणीला त्रास द्यायला लागते. आई तिला च रागवते. चूक कोणाचीच नाही पण हा भेदभाव होतो हे नक्की. अर्थात पालकांनी ही बाब नाँर्मल मुलीला जवळ घेऊन सांगायला हवी कि तिच्या बहिणीला आईवडिलांची जास्त गरज आहे. ती पण लहान च असते आणि आई वडिलांना आपण त्या नाँर्मल मुलीवर अन्याय करतो आहे हे लक्षात च येत नाही. पण भेदभाव होतो हे नक्की!!
ज्या मुलाची आर्थिक बाजू कमी आहे त्या मुलाकडे आई-वडील जास्त लक्ष देतात. त्याच जास्त प्रेमाने आणि काळजी पूर्वक करतात अर्थात तो मोठा झाला तरीही! पण ज्याच चांगल आहे त्याच पण कौतुक करायला च हव. पण ते नाही होत. सुस्थितीत असलेल्या मुलाला तो भेदभाव वाटतो पण परत आई-वडिलांना दोष नाही द्यावासा वाटत. पण भेदभाव मात्र होतोच!!
सामाजिक द्रष्ट्या काळे-गोरे, मुलगा-मुलगी, जात-पात हे दूर्दैवाने मोठ्या प्रमाणात होणारे भेदभाव आहे आणि यात दोन्ही कडचे लोक सारखेच भरडले जातात.
कोणी आधी आणि कोणी नंतर. भेदभाव हा झाडासारखा आहे. ज्यांनी झाड लावली त्यांना त्याची फळ खायला नाही मिळत. तसच अन्याय कोणी तरी कोणावर केव्हातरी केला असतो पण त्या अन्यायाची फळ नंतरच्या पिढीला खावी (भोगावी) लागतात. कारण भेदभाव झालेला असतो हे नक्की!!
लहान असतांना आवडती आणि नावडती राणी ची गोष्ट वाचायचे. त्या नावडती च दु:ख मोठी होत गेले तस उमजायला लागल. राजा एकच राण्या अनेक. भेदभावाची परिसीमा!!!
एक छोटस उदाहरण. मी गणित शिकवतांना कधी कधी मुलांना एखाद गणित फळ्यावर करायला सांगते. एक दिवस एका पँरेटचा फोन आला आणि त्या म्हणाल्या मँडम तुम्ही माझ्या मुलाला कधीच फळ्यावर गणित करायला देत नाही. तो नाराज आहे मँडम. मी त्यांना सांगितले कि तो हुशार आहे. त्याला समजत म्हणून मी नाही सांगत त्याला फळ्यावर गणित करायला. पण यामुळे तो मुलगा नाराज झाला होता. नकळत माझ्या कडून भेदभाव झाला होता.
बरेच दिवस मी WA वर नव्हते पण वेगवेगळ्या group वर गेल्यावर काही दिवसांतच लक्षात आल कि कोण कोणाच्या मेसेजला 👍, 👌 करणार आहे हे ते. सगळा विचार केल्यावर मला मानवी स्वभावाची गंमत वाटली आणि मग मी या निष्कर्षावर आले कि भेदभाव हा मानवी स्वभावाचा मूलभूत गुण आहे. आपण कितीही नाकारले तरी कळत-नकळत आपल्या कडून भेदभाव हा होणारच. हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अर्थात आपण जाणीवपूर्वक तो कमी करु शकतो. नक्कीच!