इंग्रजी भाषा: अग कुठे चालली? बोल न माझ्याशी. रागावलीस का?
मराठी भाषा: अग मी तुझ्यावर नाही ग माझ्या मुलांवर रागावली आहे.
इंग्रजी भाषाः पण का ?
मराठी भाषा: बघितलं न! जिथे तिथे तुझा वापर आणि तो पण धड नाही. उबग आला आहे ग या गोष्टींचा आता.
इंग्रजी भाषा: हो तू म्हणते न ते खरे आहे. परवा तर तो मुलगा नुसत Ya ya करत होता. मला वाटल आता
या बालांनो या रे या ही कविता म्हणायला सुरवात करतो कि काय?
मराठी भाषा: त्याला कुठल्या माहित असणार या सुंदर कविता! यम यन यो पी करतात तुझा उच्चार करतांना सुध्दा.
इंग्रजी भाषा: हो ग ऐकवत नाही. न चा ण आणि ण चा न करतात तेव्हा. येथे जेवन आनि जुस मिळेल अशी पाटी असते बरेच ठिकाणी. माझा वापर करतांना पण कधी कधी to टु आणि go गु करतात ग ही मुल.
मराठी भाषा: अग पण माझ तस नाही हं. ग ला ओ लागला कि गो च होतो आणि त ला ओ लागला कि तो च होतो. तू मोठी गंमतीशीर आहेस. कधी i silent तर कधी p silent. अमेरिकेत तुझे वेगळे उच्चार आणि लंडनमधे वेगळे उच्चार!
इंग्रजी भाषा: आहे तस खरं. पण आपल्यावरुन मारामारी होते, लोकांच्यात फूट पडते ते नको वाटतं ग. खूप दुःख होत. मला तर वाळीत टाकल्यासारखं करतात काही जण. माझ्या नावाच्या पाट्यांची तोड-फोड करतात. वाईट वाटतं ग!
मराठी भाषा: अग नको वाईट वाटून घेऊ. देशाबाहेर पडले कि तुझ महत्त्व कळत मग आपोआप. आपल्या बाकिच्या बहिणी हिंदी, कानडी, गुजराती या सगळ्यांना हा त्रास सहन करावा लागतो ग. प्रत्येक भाषेत किती साहित्य आहे. जन्म पुरणार नाही समजून घ्यायला पण नुसत आपल्यावरुन भांडायच एवढच येत.
ज्ञान मिळवण्यासाठी भाषा हे माध्यम आहे. त्यावरून वादविवाद का करायचे म्हणते मी?
इंग्रजी भाषा: मी काय म्हणते आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक सभा घेऊन ठराव पास करु कि यापुढे जो आमच्या नावाने भांडेल, अशांतता निर्माण करेल तो आमचा उपयोग नाही करू शकणार.
मराठी भाषा: खरच असच काहीतरी करायला हवयं आपण.
खूप झाली भाषेवरून भांडण. आता एकत्र या. कोणतीही भाषा वापरा पण एकमेकांशी गोड बोला.