मला वाटतं हा शब्द खास स्त्रियांसाठीच बनला आहे. तिच्या एवढे बदल आयुष्यात कोणीच अनुभवले नसतील. कधी ते बदल सुखावह असतात तर कधी नकोसे पण स्त्री सगळ्या बदलांना समर्थपणे तोंड देते एवढे मात्र नक्की.
सर्वात पहिला बदल म्हणजे पाळी येणे, नंतर लग्न होणे आणि त्यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे आई होण्याचा आणि सगळ्यात शेवटचा आणि दुःखद टप्पा म्हणजे वैधव्याचा. जोडीदाराशी होणारी ताटातूट.
पण या सगळ्यांमधे एक मोठं संक्रमण घडत ते म्हणजे सासू होण्याच. म्हटल तर थोडं दुर्लक्षित पण महत्त्वाचं कारण उरलेल्या म्हातारपणाच्या सुखाची हा काळ गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं.
*सासू* होणे हा माझ्या मते अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, जमल तर म्हातारपण सुखाच नाहीतर…….
वरमाई होणे हा तिच्या आयुष्यातला आनंद असतो पण थोडी धाकधूकही असतेच.
*कशी येते काय माहित* हा प्रत्येकीचा परवलीचा शब्द. माझा राजू खूप गुणी आहे हो पण समोरचा पारखी हवा नं! मग मुलाला आडून आडून विचारणं सुरु होत आणि एकदा का त्याने म्हटल कि आई तुझ्या आवडीची बायको मला चालेल कि स्वर्ग दोन बोट उरतो. मग चाळणी लावून सूनहंट सुरू होतो.
सून आली कि मग खरा संक्रमणाचा काळ सुरु होतो.
सून हुषार असेल तर आपल स्थान डळमळीत व्हायला फारसा वेळ नाही लागत अर्थात या ठिकाणी जी सासू तिच्या सासूच्या हाताखाली वावरली असेल तिला थोडाफार फायदा होतोच. अनुभवाचा!!
सून वेंधळी असेल, हळूबाई असेल तर मग फारसा बदल अपेक्षित नसतो. आपण लढाई जिंकली अस वाटत पण हळूहळू सून घराचा ताबा घेते. गुणी बाळ अवगुणी वाटायला लागतो. सासरा नावाचा प्राणी तिच कौतुक करू लागतो. उगीचच डोळे भरून येतात. शरीर थकल असतं. BP खालीवर होत असतं. आसन डळमळायला लागत. आई, आई करणार पिल्लू दूर गेल्यासारख वाटतं. आपण कोणाला नकोच आहोत ही भावना वाढीस लागते. मला वाटतं हा संक्रमणाचा काळ बाईसाठी फार कठिण असतो.
पण…… तेवढ्यात सून गोड बातमी देते आणि सासू ते आज्जी हा संक्रमणाचा गोड काळ सुरू होतो.