पण मी तुला कालच नाही म्हणून सांगितले होते न! ती भाभी 10000 ची पैठणी 3000 ला मागते आहे. काय बदमाश बाई आहे. का दिल्या तिला तू पैठण्या? ते जाम चिडले होते.
लताने दणादण सगळे डबे आणून उपडे केले त्यांच्या समोर.
पैठण्या खाऊन पोट भरणार आहे का आपली? भाभीने पैसेही दिले आणि महिनाभराच धान्य पण पाठवते आहे ती दुपारी. आधीच या करोना ने जीव नकोसा केला आणि आता तुमच हे अव्यवहारी बोलण. जगायच कस? बसा त्या पैठण्यांना कवटाळून आणि मरु द्या आम्हाला उपाशीपोटी.
रामराव डोक्याला हात लावून बसले. करोना ने जीव नकोसा केला होता. तेवढ्यात मोबाईल वाजला. पुण्यातील मोठ्या दुकानदाराचा फोन होता. तो पण भाव पाडून पैठण्या मागत होता. खुप घासाघीस झाली पण मनासारखा भाव काही मिळत नव्हता. शाळेची फी, दुकानाच भाड सगळं भरायच होत.
ते तावातावात उठले. महागड्या पैठण्या काढल्या आणि शहराकडे निघाले. रस्त्यावरच त्यांनी बस्तान मांडले. बायका यायच्या आणि पाहून जायच्या. रामराव आता 10000 ची पैठणी 2000 ला द्यायला तयार झाले होते. पण एकही पैठणी विकल्या नाही गेली. एक बाई म्हणाली अग नकली असतील खरी पैठणी कोण देणार एवढी स्वस्त? काही नको फसायला.
आता मात्र रामरावांचा पेशन्स गेला होता.
तितक्यात भडक मेकअप केलेली, तोंडाला रंगरंगोटी केलेली एक बाई तेथे आली. ती केव्हाची समोर उभी राहून रामरावांची गंमत बघत होती.
ती बाई कोण आहे हे तिच्या कपड्यांवरून त्यांच्या लक्षात आले होते.
दादा कशी दिली पैठणी?
रामराव एकदम चिडले. ही बाई माझ्या पैठण्या घेणार? त्यांनी रागाने तिच्याकडे पाहिले.
अवो दादा प्रत्येक गोष्टीची एक जागा असते. मला नकोच तुमची ही पैठणी. ही पैठणी नेसून इथे उभी राहिले तर कोण गिऱ्हाईक येईल माझ्याकडे? अस म्हणून हसली.
ही पैठणी रस्त्यावर नाही विकली जाणार दादा हिची खरी जागा दुकानातच.
घरंदाज स्त्रिया येऊन घेतील. माझ्या सारखीला नको तुझी पैठणी. माझी ही झकपक साडीच बरी.
तिच अस बोलण ऐकल्यावर ते जरा वरमले.
अहो ताई व्यवसाय ठप्प झाला आहे. मध्यमवर्गीय माणूस मी भीक पण नाही मागू शकत. सगळी सोंग आणता येतात पैशाच सोंग नाही आणता येत.
अहो दादा धंदा म्हणशील तर माझा बी चालत नाय या करोनापायी. पण जित्ती हाय अजून. होईल सगळं भल जरा कळ काढ.
तितक्यात एक मोठी गाडी तिथे आली. तशी ती बाई म्हणाली आल रे माझ गिऱ्हाईक.
ती बाई काहीतरी बोलली गाडीतल्या माणसाशी. गाडीतल्या माणसाने हाताला येईल तेवढ्या दोनहजाराच्या नोटा रामरावांना दिल्या आणि न बघताच 4/5 पैठण्या उचलल्या आणि त्या बाईच्या हातात दिल्या. ती बाई गाडीत बसली आणि भरकन गाडी निघून गेली.
रामरावांनी मोजले 30000 होते. नकळत त्यांचे डोळे पाणावले.
रामरावांनी एक महागडी पैठणी घेतली आणि एका पिशवीत ठेवली. ती बाई जिथे उभी होती तिथे पिशवी अडकवून ठेवली.
त्यावर लिहिले एका भावाकडून बहिणीला भेट.
आत्तापर्यंत त्यांनी पैशाने श्रीमंत असणाऱ्यांना पैठण्या विकल्या होत्या. आज मनाने श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी पैठणी दिली होती.समाधानाने ते घराकडे निघाले.