महिला दिन एक विचार

महिला दिन एक विचार

मला वाटतं स्त्रियांचे प्रश्न हे दोन गटात मोडतात. एक आहेरे आणि एक नाहीरे.

आहेरे गटात तीच स्वातंत्र्य, शैक्षणिक पातळी, मंगळसूत्र घालायच कि नाही आणि टिकली लावायची कि नाही, आर्थिक परिस्थिती, पगार नवऱ्याला द्यायचा कि आईवडिलांना, एकत्र राहायच कि स्वतंत्र, लग्न करायच कि लिव्ह इन रिलेशनशिप ठेवायची. मुल आजारी पडले तर कोणी सुट्टी घ्यायची हे प्रश्न असतात.कारण आहेरे गटातल्या स्त्रिला ती कमवती असल्याची जाणीव फार तीव्रतेने जाणवते. पण एवढे असूनही लग्न करतांना नवऱ्याचा पगार मुलीपेक्षा जास्तच हवा!!अस का?तुम्हाला जर त्याच वर्चस्व मान्य नाही तर मग पगार कशाला तुलनेने जास्त हवा? करा कमी पगार असलेल्या मुलाशी लग्न पण तस नाही होत लग्न करतांना नवऱ्याचा पगार जास्तच हवा.

पण नाहीरे गटातील स्त्रियांना गरीबी आणि बाकीचे त्रास असतात. नवरा दारु पिऊन मारहाण करणार. हव तेव्हा शरीर सुखाची मागणी करणार आणि ती बिचारी एकामागोमाग एक मुलांना जन्माला घालणार.शेवटपर्यंत ही काम करणार आणि हा टग्या मजा मारणार.आपल्या घरी येणाऱ्या कामवाल्या बाईंची थोड्याफार फरकाने हिच स्थिती असते.पण ती घटस्फोट नाही घेत.मला वाटतं शिक्षणाने माणूस सुधारतो पण ही अशिक्षित असल्यामुळे तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे हेच तिच्या ध्यानात येत नाही. नवरा कसाही असला तरी तो आपलं रक्षण करतो, कुंकवाचा धनी अशी भावना असते.त्यामुळे विभक्त होण्याचा ती विचार ही करु शकत नाही.

याउलट मला वाटतं आहेरे गटात घटस्फोटाच प्रमाण वाढले आहे. मी फक्त मुलींना दोष देत नाही आहे. पण मी कमवती आहे.मला कोणाची गरज नाही. ही भावना वाढीस लागली. अवलंबवित्व संपल नमत घेण्याची व्रुत्ती गेली आणि तूतू-मीमी सुरु झाले.आधीच्या काळात हे अवलंबवित्व स्त्रीला बांधून ठेवायचं आणि नंतर एकमेकांना समजून घ्यायला मदत व्हायची.आपण जर चुकीचे पाऊल उचलले तर आपल्या पाठच्या बहिणींशी कोण लग्न करणार हा पण एक विचार असायचा.आता पाठची बहिणच नसते आणि असली तरी आजच्या मुली हा विचार करतीलच अस नाही. पण आता तो धागा तुटला. नवऱ्याला सोडल तर पुढे काय? ही आर्थिक आणि सामाजिक भीतीच नाहीशी झाली आहे.माहेर पण सधन असेल तर मग विचारायलाच नको. पटतं नाही मोकळ व्हा ही विचारसरणी मूळ धरु लागली आहे. मला अस वाटतं कि वर्चस्व दाखवण्यापेशा समान पातळीवर नात ठेवलं तर जास्त चांगले. दोन्ही बाजूने अर्थातच स्त्रीला मिळालेले आर्थिक स्वातंत्र्य समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार माहित नाही.

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »