बोनस

बोनस मिळणार असे कोणी म्हणाले की आपसूकच तोंडातून व्वा! असं निघतं आणि तो स्वतःला मिळणार असेल तर मग आनंदी आनंद गडे!
पण काही छोटे छोटे बोनस फार महत्वाचे असतात अर्थात प्रत्येकाचा नजरिया वेगळा असतो पण हा नजरिया आपल्याला चकित करतो हे नक्की.

त्याच असं झालं की परवा एक लहान मुलगी(10/12 वर्षांची) घरी आली होती तिच्या आजीसोबत! एकुलती एक बिचारी!

मी आणि तिची आजी गप्पा मारत बसलो होतो. माझ्या बोलण्यातून तिला समजले की मला एक भाऊ आणि एक बहीण आहे.

व्वा व्वा आजी! हा तर बोनस!

म्हणजे? मला काही कळेना. माझ्या जन्माचा संबंध बोनसशी कसा काय?

भावंड असणं म्हणजे बोनस?

अग आजी तूझ्या आईला आॅलरेडी एक मुलगी आणि एक मुलगा होता तरी पण तूझा जन्म झाला म्हणजे तू बोनसच झाली ना?
सो लकी!

आम्ही तेव्हा तिच्या बोलण्यावर हसलो पण नंतर त्या मुलीला काय म्हणायचे ते माझ्या लक्षात आले आणि एकुलत्या एक मुलांच दुःख समजलं.
तिला म्हणायचे होते की माझ्या आईला जर एक मुलगा आणि एक मुलगी आॅलरेडी होते तर माझा जन्म का झाला? काहीच गरज नव्हती, This is a bonus for my brother and sister! माझा जन्म हा कोणासाठी बोनस असू शकतो या गोष्टीचा मी कधीच विचार केला नव्हता.

मी अवाक्! हा प्रश्न मी पण कधी आईला विचारला नाही की बाई ग तूला आधीच एक मुलगा आणि एक मुलगी होती तर मी कशाला?
आईच उत्तर ही काय असेल ते मला माहीत आहे की ज्याचं जिथे दाणापाणी असेल तेथे तो जन्म घेतो!!
मी हे आत्ताच्या त्या मुलीला सांगितले असते तर तिने मला वेड्यात काढले असते.

मी चूप बसले कारण मला बोनस हा शब्द आवडला होता. तिलाही असे बोनस भाऊबहीण हवे होते पण ती एकटीच होती. थोडक्यात 'बोनस' मिळायला नशीब लागतं मग तो कोणताही असो.

मला आठवत त्या काळात पण शेजारी काही मुलं एकटी होती पण त्यांच्या तोंडून कधी एकटे असल्याचे दुःख जाणवलेले आठवत नाही कारण शेजारी आम्ही तिघे,बाजूच्या घरात चौघेजण, तेव्हा बऱ्याच घरांमध्ये तीनचा पाढा होता. तो एकुलता एक मुलगा रमायचा सर्वांत!
पण आता मात्र घरटी एक बाळ त्यामुळे कोण कोणाकडे जाणार आणि कोणात रमणार? खरंतर या एकेकट्या मुलांच छान जमायला हवे पण मग अॅडजेस्टमेंट नावाचा राक्षस आवासून उभा राहतो, जो आपला लहानपणी मित्र होता. जिथे तिथे सोबत असायचा पण आजकालच्या मुलांचा तो शत्रु आहे. त्यांच्या आजूबाजूला तडजोड नावाची गोष्ट अजिबात फिरकत नाही. त्यातून निर्माण होणारा हट्टीपणा वाढतच जातो आणि एक दिवस अपेक्षाभंग झाला की मग मानसिक ताकद पणाला लागते आणि जगणं नकोसं होतं. कारण लहानपणापासून जे हवं ते मिळायची सवय लागते. पालकांमध्ये पण आम्ही आमच्या मुलांना खूप सुखात ठेवतो ही गैरसमजाची भावना असते पण ते एक आभासी जग मुलाभोवती निर्माण करत असतात आणि वास्तवाशी पाला पडला की मग खेळखंडोबा होतो.

एकाला दुसरं असावं अशी आधी समजूत होती ती खरंच योग्य होती. आता फक्त आर्थिक परिस्थितीचा विचार केला जातो पण कधीतरी दुसर्‍या भावंडामुळे मानसिक आधार मिळतो, मानसिक आरोग्य किती चांगले राहते हा विचार करायला हवा.

कधीतरी मागे वळून पाहताना जाणवतं की खरंच आम्ही तिघे होतो तरी कधी आर्थिक परिस्थितीमुळे आमच्या इच्छा मारल्या गेलेल्या आठवत नाही उलट आम्ही समाधानी होतो, आनंदी होतो. शक्य असेल तेवढे लाड व्हायचे. मग आज एवढाला पैसा असूनही एकावरच थांबणारी पिढी पाहिली की आश्चर्य वाटतं. खरं काय? कोणतं सुख हवंय? की सुखाची व्याख्याच बदलली आहे?

खरंतर या प्रश्नावर परफेक्ट असं कोणतंच उत्तर नाही पण कधीतरी नाहीची सवय मुलांना असू द्यावी. कदाचित पुढील आयुष्यात येणारे नकार पचवायची ताकत मिळेल आणि एखादे भावंड असेल तर ह्या नकाराचे ओझे हलके करण्यासाठी, पेलण्यासाठी खांदाही मिळेल.

शेवटी मिळालेला 'बोनस' कसा वापरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे!!

वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Share
Likes: 0 Views: 22