नाट्यानुभव

नाट्यानुभव
वर्ग चौथी ब. दहा बारा मुलींना हेडबाईंनी बोलावले. राम सीतेवर असलेला एकेक पॅराग्राफ वाचायला लावला. मी वाचल्यावर म्हणाल्या शाब्बास! छान वाचलेस तू!

मग अजून ४/५ जणींचे कौतुक करुन त्यांनाही बाजूला बसवून ठेवले आणि बाकीच्या मुलींना जायला सांगितले.

मग अजून दुसर्‍या बाई आल्या. त्यांनी आम्हांला सांगितले की आपण एक नाटक बसवणार आहोत. 'राम- सीता भेट'
भारती, तू रामाचा रोल करायचा, एक मंजू नावाची मुलगी होती तिला सीतेचा रोल मिळाला. एक कठाळे होती तिला लक्ष्मणाचा रोल मिळाला. अजुन दोघी होत्या. त्या सीतेच्या दासी कम मैत्रीणी होत्या.

माझ्या डोक्यात एकच शंका वळवळत होती की राम घारा होता का? कधी फोटोत बघितले नव्हते. स्वभावाला अनुसरून भोचकपणा केलाच.
बाई म्हणाल्या तुझे उच्चार स्पष्ट आणि आवाज खणखणीत आहे म्हणून तूला राम केलं आहे. जास्त शहाणपणा करायची गरज नाही.
काय बिशाद पुढे बोलायची.

मग शाळा सुटली की रोज एक तास प्रॅक्टिस चालायची. बरं मी आणि सीता दोघीही खो-खो च्या टीममध्ये होतो. दमून जायचो.

माझं पाठांतर जबरदस्त त्यामुळे कोणी काही विसरले की मी तिथल्या तिथे त्या मुलीला सांगायची. मग भांडण व्हायची. त्या म्हणायच्या ही आम्हाला वाक्य आठवायला वेळच देत नाही. मग चूप बसावं लागायचं.

लक्ष्मणाच्या लक्षात अजिबात राहायचे नाही मग बाई मागून सांगायच्या तिला पण अति विसरायला लागल्या वर लक्ष्मणाला दोन छड्या हातावर बसल्या. दुसर्‍या दिवशी घडाघडा संवाद पाठ झाले.

रंगीत तालीम झाली त्या दिवशी सीतेपेक्षा एका दासीची साडी आणि दागिने जास्त चांगले होते मग तिला तिचा हार सीतेला द्यायला लावला. ती तयार नव्हती मग रडारड झाली. शेवटी सीतेच्या आईच्या सगळ्या साड्या बघण्यात आल्या आणि शेवटी लग्नातल्या शालूवर शिक्कामोर्तब केले गेले. हार मात्र दासीने काही शेवटपर्यंत सीतेला दिला नाही. त्यांची कट्टी ती कट्टीच राहीली.

मला मात्र मावस भावाचा मुंजीतला लांब कुर्ता आणि एक सॅटीनचे सोवळे शिवून घ्यावे लागले होते. मुगुट, धनुष्यबाण आपापलं तयार करायचं होतं. त्याला सोनेरी रंगाचा कागद लावला. वरती रंगबिरंगी खडे लावले.
सुंदर मुकुट तयार झाले.

रामाच्या भात्यात मात्र एकच बाण होता.

नाटकाच्या दिवशी राम आणि सीतेचे जोरदार भांडण झाले.
मी तिला खोखो त आऊट करतांना मागून धप्पा मारला तर ती तोंडावर पडली. हाताला बरंच खरचटलं तिच्या. आता खो देतांना असं होतंच पण त्या दिवशी ती जोरात पडली आणि मग रामायण तिथेच घडलं. राम - सीतेचं भांडण बघायला सगळे जमले.

खो खो चे सर आणि नाटकाच्या बाईंचे पण जोरदार भांडण झाले. नाटकातील मुलींना खो खो त घेतलेच कसे वगैरे वगैरे! तिथे महाभारत घडले पण हेडबाईंच्या मध्यस्थीने रामायण आणि महाभारतावर पडदा पडला.

नाटकाच्या वेळी मात्र छान तयार झालो सगळ्या आणि संवादही छान झाले सगळे.राम आणि सीतेने सकाळचे भांडण विसरून एकमेकांकडे अगदी प्रेमळ कटाक्ष वगैरे टाकले. लक्ष्मणाने संवाद बरोबर म्हणून सर्वांना सुखद धक्का दिला. यवतमाळमधील सर्व शाळांतून आमचा पहिला नंबर आला आणि दिग्रसला होणाऱ्या नाटकाच्या स्पर्धेत आम्हांला परत भाग घ्यायचा होता.

तिथेही 5/6 तालुक्यातील जिंकलेली नाटके आली होती. पण तिथेही आमच्या यवतमाळच्या शाळेचा पहिला नंबर आला. स्टेजवर जाऊन जिल्ह्यासाठी ढाल हातात घेतांना अभिमान वाटला. पण खोखोत मात्र आम्ही हरलो होतो.

वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 0 Views: 38