काटा!

काटा!
"आई, अग पायाला काहीतरी टोचतय'. लेक ओरडली.
तिला घेऊन मी माहेरी गावी आले होते. अंगणात चालतांना टोकदार दगड पायाखाली आला होता बहुतेक!

मी म्हणाले, "अग काही होत नाही. दुर्लक्ष कर."

" तूला टोचला असता म्हणजे कळलं असत".
लेक म्हणाली. आवाज जरा रडवेला झाला होता.

मी तिला जवळ घेतले.

लहानपणी पायात गेलेले काटे आठवले, रक्तबंबाळ करणारी ठेच आठवली, तुटलेले नख आठवले आणि मग आईने, ताईने हळुवारपणे काढून दिलेला काटा आठवला, जखमेवर बाबांनी लावलेली हळद आणि चूना आठवला. पाय दुखतो म्हणून दादाने सायकलवरून शाळेत सोडलेले आठवले.

एका काट्यामागे माझ्या कितीतरी गोड आठवणी दडल्या होत्या. काटा रुततो! असाही!

मग मी एक
सुई किंचीत गरम केली आणि हळुवारपणे तिच्या पायातला काटा काढला.

"आई तू ग्रेट आहेस हं!
तूला कसा काय काटा काढता येतो?"

अग आमचं लहानपण या काट्यांच्या सहवासात गेले. गुलाबाचा, बाभळीचा, काटेकोरांटीचा, बोराचा विविध प्रकारचे काटे आजूबाजूला होते. सवय होती आम्हांला.

"ओके!पण आई बरं झालं आजीकडे सुईदोरा आहे नाहीतर आत्ता डाॅक्टरांकडे जावे लागले असते.
आपल्याकडे तर पुण्याला सुईदोरा पण नाही आहे. तिथे काटा गेला तर मग?"

ती अशी बोलल्यावर मला जरा ते जाणवलंच.

"अग आहे ग सुईदोरा आपल्याकडे ही!"
मी माझ्याच समाधानासाठी म्हणाले.
पण त्यातला फोलपणा मलाही जाणवला.

आजकाल फुलाचे हार करणे नाही, गजरा नाही, फाटलेले, उसवलेले कपडे शिवणे नाही. शिवणकाम, भरतकाम नाही त्यामुळे सुईदोरा आजकाल नसतोच.
बरं एकमेकींची साडी नेसणे नाही. त्यामुळे ब्लाऊज ला टीप मारुन ब्लाऊज लहान करणे नाही की उसवणे नाही.रफू करणे नाही. साडीची घडी मोडणे हा गोड प्रकार नाही.

खरंच एका काट्याने आणि सुईदोऱ्याने कितीतरी गोष्टी आठवल्या. या छोट्या छोट्या गोष्टींनी माझे जीवन समृद्ध केले होते. आपल्याला स्वावलंबी तर केले होते आणि योग्य तिथे मदतीचा हात देण्याची शिकवण ही दिली होती.

"आई सांग न सुईशिवाय तू काटा कसा काढला असता?" लेक विचारत होती.

"अग काट्याने काटा काढायचा मग!". मी म्हणाले.

"म्हणजे?" तिला हे जरा डोक्यावरून गेले होते.

"अग आम्ही एकदा चिखलदऱ्याला ट्रीपला गेलो होतो तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या पायात काटा गेला होता. जवळ काहीच नव्हते.
मग आम्ही तिथल्या बाभळीच्या झाडाचा मोठा काटा तोडला आणि अगदी सावकाशीने, काळजीपूर्वक तिच्या पायातील काटा काढला".

"भारी होत्या आई तुम्ही सगळ्या!"

"अग याला काट्याने काटा काढणे असे म्हणतात. हा शब्दशः अर्थ आहे त्याचा दूसरा अर्थ मात्र खूप वेगळा आहे. मी हसत हसत म्हणाले".

" ते कसे काय?"लेकीने विचारले.

" अग काट्यानेच काटा काढणे म्हणजे एखाद्या प्रसंगातून शिताफीने बाहेर पडणे. हुशार माणसाला हुशारीने तर बनेल माणसाला बनवाबनवी करुन उत्तर देणे. अर्थात हे प्रत्येकाला जमेलच असे नाही." मी म्हणाले.

"आई, तूझ्यावर कधी असा प्रसंग आला का की तूला काट्याने काटा काढायची वेळ आली?"

" हो खूपदा". मी उत्तरले.

" मग तू काय केलंस?"

" नाही जमलं मला. मी तेवढी तयार नव्हते, माझी एक मैत्रिण इतर मैत्रीणींना माझ्याबद्दल खोटं नाटं सांगायची. मला ते उशिरा कळायचे." मी खेदाने म्हणाले.

मुलीच्या डोळ्यात पाणी तरारलेले पाहून मी म्हणाले,
" पण नंतर मात्र आयुष्यात चार पाच मैत्रीणी इतक्या जिवाभावाच्या मिळाल्या की सगळी बोच बोथट झाली".

मग मला असे अनेक प्रसंग आठवले. लहानपणीच कशाला मोठेपणीही लोकांनी मारलेले टोमणे, मुद्दमून दुखावण्यासाठी उच्चारलेले कटूशब्द किंवा माझ्याविरुद्ध इतरांचे भरलेले कान!कितीतरी गोष्टी मनात दाटून आल्या. तेव्हा दाबून ठेवलेले कढ आत्ता उगीचच येत होते.

कदाचित माझ्या जिवाभावाची माझ्या जवळ होती म्हणूनही असेल!

कधी कधी रागावलेल्या माणसाला मनवता येते पण गैरसमजाची पट्टी बांधलेल्या माणसाला समजावणे महाकठीण असते.. अशावेळी त्याचे कान भरणाऱ्या, आपल्याविषयी खोट्या अफवा पसरणाऱ्या माणसाचा काट्याने काटा काढताच आला पाहिजे. ही कला आत्मसात करायलाच हवी, हे खरं! प्रत्येकाला ते जमेल असेही नाही.

पण कधीतरी असंही वाटतं की
कशाला शह काटशह देत बसायचे? काट्याने काटा काढत बसायचे?
स्वतःला आणि इतरांनाही रक्तबंबाळ करायचं?

कारण शेवटी तो काटाच! खोलवर गेला की नासूरच बनणार!

हृदयातील जखम का
अशी उघडी करायची
का काट्याला रुतायला
परत जागा द्यायची!

वर्षा हेमंत फाटक, पुणे


- Varsha Hemant Phatak
« Prev Next » Share
Likes: 2 Views: 48