दादा दादा सोनू हत्ती कुठे गेला? मंदिरातले लोक घेऊन गेले का त्याला?तुम्ही का नेऊ दिलत? अनू आता रडवेली झाली होती.
मी काहीच नाही बोललो. ती लहान मुलगी काय समजायचं ते समजली बिचारी.
मी दादासाहेब विचारे.
जेम्स सर्कस चा सर्वेसर्वा. पण आता कफल्लक!
90 लोकांच कुटुंब होत माझं.हत्ती, घोडे ,कुत्री सगळे होते माझ्या कुटुंबात.
6/7 महिने आराम असायचा.दिवाळी झाली कि आमचे खेळ सुरू व्हायचे ते जूनपर्यंत. पावसाळा सुरू होईपर्यंत. गावोगावी आम्हाला मागणी असायची.आजूबाजूच्या खेड्यातील लोक भरभरून आमची सर्कस बघायला यायचे.मोठाले पोस्टर्स लागायचे. टाळ्या/शिट्ट्यांनी तंबू दणाणून जायचा.
रिंग मास्तर दिनू हत्ती चे सुरेख खेळ करायचा. गणपतीला हार घालणे,घंटी वाजवणे,नारळ फोडणे हे खेळ सोनूहत्ती करायचा. चंगू-मंगू आमचे जोकर. जुळे भाऊ होते पण एकदम गिट्टे होते. छान करायचे जोकरांच काम.
मी,माझी बायको सूनिता आणि अजून दोघे नेटचे खेळ करायचो.लोक जीव मुठीत धरून आमचा खेळ पहायचे.
एकदा तर हात मोडला होता माझा. रेश्मा आणि सुलताना सायकलचे खेळ करायच्या.2/3 तास आमचा एक शो चालायचा.लोक आनंदी
होऊन घरी जायचे.
पण या वैभवाला ओहोटी लागली.
व्हिडीओ गेम्स,VCD/DVD player मुळे नविन पिढीचा इंटरेस्ट गेला.रंगीत TV घरोघरी आले. लोकांना ते प्रोग्राम जास्त आवडायला लागलेत. Picture पहाणे या पिढीला जास्त आवडू लागले. हळूहळू खेळ कमी झाले. खर्च परवडेनासा झाला. मग मीच सगळ्यांना सर्कस सोडून जायला सांगितल.सगळे दुःखी झालो होतो पण नाईलाज होता.
एवढ वैभव पाहिलेला मी आज चहाची टपरी आणि भेळेच दुकान लावून बसलो होतो.
वाताहत होते तेंव्हा अशीच होते.
सोनूला इथले मंदिरातले लोक पोसत होते.सगळा खर्च ते करत होते पण आज ते सोनूला घेऊन गेले कारण त्यांच्या मंदिरातला हत्ती मेला होता.
शेवटचा दुवा पण निखळला होता.
माझं एवढ मोठ कुटुंब तितरफितर झाले होतं.
रोज रात्री झोपतांना सगळ डोळ्यासमोर येत आणि झोप लागत नाही.
कधी कधी कोणी भेटायला येतात. मग जुन्या आठवणी निघतात. तेवढच.