लेख : लढा


काल अटलांटा (जॉर्जिया राज्य, युएसए) इथली बातमी वाचली की एक 21 आठवड्याची प्रेग्नंट स्त्री घरी कोलॅप्स झाली. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये अँडमिट केले. तिला डॉक्टरांनी तत्काळ ब्रेन डेड घोषित केले.

प्रश्न होता ब्रेन डेड आईने बाळाला जन्म द्यायचा कि नाही? किंबहुना ती देऊ शकते की नाही? का तिचा गर्भपात करायचा? कारण बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते त्यामुळे गर्भपात करणे कायदेशीर नव्हते. कारण तो गर्भ जिवंत आहे. आईचा लाईफ सपोर्ट काढला तर बाळही मरणार! ते कायद्याच्या विरुद्ध होणार. मग पुढे काय?

नियतीचा अजब खेळ?

मी तर बातमी वाचून संभ्रमात पडले. एखाद्या कोड्याचं उत्तर कितीही प्रयत्न केला तरी सापडत नाही आणि इथे तर ब्रेन डेड आई, 21 आठवड्याचा गर्भ आणि त्याच्या जन्माची वाट बघणारे डॉक्टर आणि इतर नातेवाईक.

एका न जन्मलेल्या जिवासाठी चाललेला आटापिटा बघून मला आश्चर्य वाटलं आणि कौतुक ही!

बरं त्या नातेवाईकांना ही भीती आहेच की ते बाळ कसे जन्माला येईल? सुदृढ, निरोगी असेल का? कदाचित अपंग ही असेल. मग पुढच्या जबाबदार्‍या कोण घेणार? मग असं असेल तर त्याला जन्माला घालणे योग्य असेल का?

कायदा नेहमी पाळण्यासाठीच असतो पण कधीतरी नियमाला अपवाद गोष्टी असतातच नं! पण इथे निर्णय कोण घेणार?
सध्या तरी तो गर्भ नीट आहे पण पुढे काय?
अजून तीन महिने ती ब्रेन डेड आई जिवंत राहील तिच्या बाळासाठी? लाईफ सपोर्ट इतके दिवस काम करेल की आधीच काहीतरी बरंवाईट होईल? मग त्या बाळाला कसे वाचवतील? का त्याच्या आयुष्याची दोरी तेवढीच होती असे मानायचे?

सतत 24तास माॅनिटरींग करून, लक्ष देऊन प्रगत, कुशल तंत्रज्ञान त्या बाळाला वाचवू शकतील का? देवाजीच्या मनात काय आहे माहीत नाही!

नास्तिक लोक असही म्हणतील की देवाला एवढी काळजी होती तर तिची ही अवस्था केलीच कशाला? असो.

पण मी तरीही त्या बाळाच्या निरोगी आयुष्याची कामना करते आहे. एका जीवाला वाचवण्याचा लढा देणाऱ्या डॉक्टरांसोबत मी आहे.

असं म्हणतात की आई शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या बाळाचे रक्षण करते.
कदाचित हे खरंही ठरेल.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »