लेख : स्टोन


स्टोन

इतके दिवस स्टोन म्हटलं की रंगबिरंगी सुंदर सुंदर खडे, ज्वेलरी आणि ती घालून सुंदर चमचमणाऱ्या तारका डोळ्यासमोर यायच्या पण नशिबाने स्टोन चे इतरही प्रकार अनुभवायला मिळाले.
रंगीत स्टोन बेरंगी झाले.
डोळ्यासमोर तारे चमकले आणि गरगरायला झाले.
ऐसा भी स्टोन होता है!
खतरनाक! जीवघेणा!

चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की मी कशाबद्दल बोलते आहे ते! माझ्या आयुष्यात चोर पावलांनी किडनी स्टोनने प्रवेश केला आणि मुझे पीने का शौक नहीं (पाणी हं) म्हणणारी मी बाटल्याच्या बाटल्या पाणी पोटात रिचवायला लागले.
असे ऐकले होते की पाण्यात एवढी शक्ती असते की ते दगडाचेही तुकडे तुकडे करतं आणि मार्ग काढत पण या दगडाचा तुकडा पडण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. त्या दगडाला काही पाझर फुटत नव्हता. तो कडक होता! फुटेगा नही साला!

एवढ्याशा दगडाने या अवाढव्य शरीरात हलचल माजवली होती.
उठता बसता कळा निघत होत्या. नेहमी सर्दाळलेली मी, आज एक जरी शिंक आली तरी कळवळत होती.
एकदा तर वाटलं एवढी जोरदार शिंक यावी की किडनीतला दगड वरवर सरकत नाकातून बाहेर पडावा.

'अहो' ना हे सांगितल्यावर ते दचकून माझ्याकडे बघायला लागले. मी निमूटपणे पुस्तकात डोके खुपसले.

कोणी पपईची पाने खा, भेंडी खाऊ नको, टोमॅटो खा पण साॅस नको खाऊस ह्या सगळ्या प्रेमळ सूचना दिल्या.

परतफेड तर सगळे करणारच!

पण या सूचनांचा फायदा काही होतं नव्हता आणि वेदना काही थांबत नव्हत्या.
यथावकाश सोनोग्राफी झाली. पोट फुगेपर्यंत पाणी पिऊन झाले.

शेवटी एका अनमोल स्टोन चा शोध लागला. जो कुठेतरी कोपर्‍यात लपून बसला होता. शेवटी दगडचं तो टोचणारच!
दगडाला काळीज असते का ते माहित नाही पण या दगडाला काटे असतात हे मात्र जाणवलं.

मला कित्येक वेळा रस्त्यावर पडलेल्या दगडाला मी उगीचच मारलेल्या ठोकरेची आठवण झाली. त्याचे तर शाप नसतील भोवले? आईचे शब्द आठवले, ती म्हणायची अग निर्जीवातही जीव असतो असा पाय मारु नये. पण आता वेळ निघुन गेली होती.
हे पाप मला सुखाने जगू देणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ होती हे माझ्या ध्यानात आले होते. भोकाड पसरून रडावेसे वाटतं होते.

सोनोग्राफी सेंटरमधील समोरचा नजारा बघून मात्र मी स्वतःला आवरले.
एक ६/७ वर्षांचा मुलगा सारखे पाणी पित होता. दर पंधरा मिनिटांनी बाथरूमला जायचा आणि बाहेर यायचा. परत नाही म्हणून मान डोलवायचा.
त्याला गेले ७/८ तास युरीन पास झाली नव्हती. शेवटी त्याच्या आईने नारळाचे पाणी आणले . परत बिचारा बाथरूममध्ये गेला, बाहेर आला तो हसतच आणि पटकन समोर असलेल्या गणपतीच्या मूर्तीला नमस्कार केला. लहानपण खरंच किती निरागस असतं!
आम्ही सगळेच हुश्श झालो.

देवाची करणी आणि नारळात पाणी, शैतानाची करणी आणि किडणीत दगड अशा काही भलत्या सलत्या म्हणी माझ्या मनात पिंगा घालायला लागल्या.

सोनोग्राफी सेंटरमध्ये एक बाई तर अक्षरशः रडत वेदनेने कळवळत आली होती. तिला ना धड बसवत नव्हते आणि ना धड उभेही राहवत नव्हते.
युरोलाॅजिस्ट देवाच्या रुपात धावून आला आणि तिला डायरेक्ट ऑपरेशन थिएटर ला नेले.

काळजावर दगड ठेवून मी त्या प्रसंगाकडे बघत होती.

समोर असलेल्या दगडाच्या देवालाही न घाबरणारी मी त्या न पाहिलेल्या दगडासमोर मनोमन नतमस्तक झाले होते.

मनात एक विचार चमकून गेला की दगडापेक्षा वीट मऊ असते मग.......

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev