ललित : स्वागत


स्वागत असेही....

हा विषय वाचल्यावर मला संपूर्ण चातुर्मास या पुस्तकात एक कहाणी होती 'शुक्रवारची देवीची' ती कहाणी आठवली. आपल्याला सगळ्यांना ती माहिती आहे म्हणून जास्त काही सांगत नाही.
पण बहीण गरीब असते म्हणून तिचं सख्ख्या भावाच्या घरी होणार स्वागत आणि श्रीमंती आल्यावर त्याच भावाच्या घरी होणार स्वागत यांत जमीन अस्मानाचा फरक असतो.

आजही जागोजागी तेच तर आहे.
सबसे बडा रुपय्या च आहे.
म्हणजे स्वागत कोणाच होतं? तर संपत्ती च.
लिमोझिन मधून आलेल्या मूर्खाचेही स्वागत वाजतगाजत, लाळ टपकवत होते पण पायी येणाऱ्या बुद्धिमानाकडे दुर्लक्ष होते.
असे अनुभव आपल्याला बरेचदा येतात.
पैसे देऊन एखादी व्यक्ती एखाद्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविते आणि स्वागताची माळ गळ्यात पाडून घेते.
प्रसिद्धी प्रत्येकाला हवीच असते. येनकेनप्रकारे ती मिळवायचीच.

आपण एखाद्याच्या घरी गेलो की अगदी तोंडभरून स्वागत होतं.
सगळं कुटुंब छान गप्पा मारत बसतं. आपण एक चांगली आठवण तिथून घेऊन जातो.
पण अशा वेळी एक जुना विनोद आठवला की हसायला येत पण ते स्वागत मनाला लागतं.
'काका, बाबा म्हणाले की काकांना सांग की मी बाहेर गेलो आहे म्हणून'
काय बोलणार!

एखाद्या स्वागत समारंभात अनुल्लेखाने एखाद्याला टाळतात. हे अनवधानाने ही घडू शकत पण समोरच्याला खरं काय ते लक्षात येतच.

काही वेळा यजमानांकडे गेल्यावर एका स्मित हास्याने केलेले स्वागत बरंच काही चांगलं घडवून जातं. एक त्रासिक आठी नको वाटते.
मनापासून केलेले स्वागत आनंददायी असते.

मयसभेत कौरवांचे झालेले स्वागत पुढे घडणाऱ्या अनेक विपरीत घटनांचे कारण होते.

स्वागत समारंभासाठी देण्यात येणारे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ यांचे नंतर काय होते ते सर्वांना माहित आहे. पण तरीही..... चालायचंच! स्वागत म्हटलं की नारळ मिळणारंच!!!

मला सर्वात जास्त आवडणारे स्वागत म्हणजे घरात येणाऱ्या नव्या चिमुकल्याचे होणारे स्वागत! खरंच किती आतुरतेने त्याच्या आगमनाची सर्व वाट बघतात आणि बारसे नामक स्वागतसोहळा होतो. तो त्याच्या स्वागताचा दिवस किती अविस्मरणीय असतो. हे खरे स्वागत! पण ह्याचा आनंद व्यक्ती फोटोतून घेते. आजकाल व्हिडीओतून पण! या दुनियेतील त्याचे पहिले वहिले जोरदार स्वागत!
त्याच्या अस्तित्वाला एक नाव मिळतं.

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांच्याही मनात पृथ्वीवर येतांना पुनर्जन्माची भावना असेल का? पृथ्वीवरील त्यांचे स्वागत ही नक्कीच अविस्मरणीय घटना त्यांच्यासाठी असेल.
सर्व जग त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतं. स्वागत असावे तर असे!!
कल्पना चावलाचे ही असेच स्वागत करता आले असते तर......
सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात...

स्वागत हे वेगवेगळ्या तऱ्हेने,विविध प्रकारे केले जाते. प्रत्येकाच्या कल्पना शक्तीवर ते अवलंबून असतं. नव्या सुनेचे स्वागत करतांना फुलाची केलेली सजावट मन आकर्षित करते पण त्याचबरोबर दोन शब्द कौतुकाचे तिच मन जिंकून घेतात.

स्वागत असे हवे की ते कायम उत्सवमूर्तीच्या आठवणीत राहायला हवे.

सर्व ऋतूंचे, सणांचे स्वागत मनुष्य अतिशय आनंदाने करतो. कारण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. या स्वागताला उत्सवाचे स्वरूप आले की चौफेर आनंद फुलतो आणि सकारात्मकता येते.
वारीतील वारकऱ्यांचे स्वागत करायला सर्व भक्तगण उत्सुक असतात.

वार्धक्याचे आनंदाने स्वागत करायचे की वार्धक्याला नाकारायचेच हा एक कठीण प्रश्न आहे.

शेवटी स्वागत हे मनापासुन केले असेल तर मनाला भिडते नाहीतर मनातून ती व्यक्ती कायमची बाद होते.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »