सोने घ्या सोने


सोने घ्या सोने

काल माझ्या स्वप्नात हातगाडीवर सोन्याच्या लगडींचा ढिग घेऊन हाळी देणारा माणूस आला आणि त्याच्याशी घासाघीस करणाऱ्या साळकाया माळकाया उभ्या राहिल्या. मी पण १/२ लगडी घासाघीस करुन घेतल्या बहुतेक. आठवत नाही आता.
मग विचार केला की असं स्वप्न का पडलं? अरे आज गुढीपाडवा! सोने खरेदीचा दिवस!
मनी वसे ते....


हिंदी सिनेमात सोन्याच्या विटा पाहून एक तरी सोन्याची विट आपल्याकडे असावी हे माझं स्वप्न होतं. लहानपणी अक्कल गहाण टाकली असते.

खरंतर सोन्यात केलेली इन्व्हेस्टमेंट ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे असं आता नेहमी वाटत राहतं. पण पाय कधीतरी सोनाराकडे वळतातच.
डेड इन्व्हेस्टमेंट हे विधान आपल्यासारख्या लोकांसाठी आहे जे लोक फक्त सामाजिक स्टेटस मेंटेन करण्यासाठी आणि मुलांच्या लग्नात उपयुक्त होईल म्हणून सोने खरेदी करतात. आपण लोक कधीच सोन वगैरे विकायच्या भानगडीत पडत नाही. ती लक्ष्मी असते आणि आपली सोन्यात भावनिक गुंतवणूकही जास्त असते. हा दागिना लग्नातला,हा बारशाचा, हा मुंजीतला वगैरे वगैरे. पण खरचं सोन्यापासून काय उत्पन्न मिळतं? उलट दरवर्षी लाॅकरचे भाडे भरायचे. लाॅकरमधून दागिने काढतांना आणि ठेवतांना दोन्ही वेळेला टेन्शन असत ते वेगळंच. म्हणजे विकतचे दुखणे!

माझ्या मैत्रिणीचा नवरा सोन घ्यायच्या एकदम विरोधात आहे. शेवटी ती नवऱ्याला म्हणाली की शेअर्स आणि FD च्या झेरॉक्स काढून आण, गळ्यात घालून फिरते. थोडक्यात काय तर याबाबत दोन टोकाचे विचार करणारे लोक आहेत.एक फक्त सोन्यात गुंतवणूक करतात आणि दुसरे सोन्याकडे ढुंकूनही पहात नाही.

एखादी बाई सोन्याने लगडलेली असते तर एखादीचे विचार सोन्यासारखे असतात. पण दुर्दैवाने बघताक्षणी सोन्याने लगडलेलीला भाव मिळतो. असो.

पण गरीब लोकांसाठी सोने फार उपयोगी असते. ते वेळ पडली तर सोन्याचे दागिने मोडतात, गहाण ठेवतात. मुलांच्या शिक्षणासाठी विकतात. अर्थात गरीब लोकांना शिक्षित केल तर ते पण सोन्याच्या ऐवजी बँकेत गुंतवणूक करु शकतील.आपल्या मराठी नायिका तर कित्येक वेळा बिचाऱ्या मंगळसूत्र पण गहाण ठेवतात. परिस्थितीच तशी असते. पण कधीतरी हे वास्तव स्विकारायला हवं.

मध्यंतरी बेनटेक्सच्या दागिन्यांनी धुमाकूळ घातला होता. अगदी खरं सोन वाटायचं. मग वन ग्रॅमची टूम निघाली. ते पण दागिने छान दिसतात. थोडक्यात काय जे चमकत ते सोन!! पण गरीबाची हौस पूर्ण होते.

मला आठवत लहान असतांना आई आणि मावशी एक ग्रॅम जरी सोन घेतल तरी एकमेकींना दाखवायच्या. छोटासा गुलाबी रंगाचा कागद त्यात छोटीशी सोन्याची तार असायची.
आता आपण किती सहज जाऊन एखादा दागिना घेऊन येतो. महागाई वाढली की कमी झाली?

सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत हे फक्त पेपरमधे वाचायचं. बाकी गर्दी आहे तशीच. एक तोळा 92000 हजार भाव!! गर्दी सेम! क्रेझ अजून वाढली.

दागिना मोडायला गेलो तर एक/दोन टक्का घट तर निघतेच निघते. परत आपल्याला आवडलेला दागिना हा वेगळाच असतो मग त्याची घडणावळ पण जास्त असते. थोडक्यात काय सोनार नावाची व्यक्ती आपल्याला मूर्ख बनवत राहते आणि आपण बनतो. Gst ची तर बातच और!!

सोन्याच्या विविध स्कीम सुरू असतात.
जेवढे सोने घ्याल तेवढी चांदी फ्री!! मला एवढं हसायला आलं. किती मूर्ख बनवायचं!! दहा ग्रॅम चांदीचं काय करणार??

मी एकदा त्या सोनाराला विचारले की दादा उलटं नाही होणार का? जेवढी चांदी विकत घेऊ तेवढे सोन फ्री!!!

तो पण भारी निघाला आणि म्हणाला की तुम्ही बायकांनी सोन्याचा सोस सोडला, दागिने घालणे बंद केले तर हे होईलही!!

काही काही गोष्टींची उत्तरे ब्रम्हदेवालाही माहीत नसतात.

मध्यंतरी बरेच गोल्डमॅन फेमस झालेत.
बऱ्याच सिरियलमधे आणि सिनेमांमध्ये श्रीमंती दाखवायला सोन्याच्या दागिन्यांचा वापर केलेला असतो. अजित, मोना डार्लिंग आणि सोना हे मला फार आवडायचं.

पण फक्त जेव्हा हुंडा म्हणून सोने मागतात आणि मिळालं नाही की मुलींची लग्न मोडतात तेव्हा मात्र वाटतं की सोन्याचा हव्यास कुठेतरी थांबायलाच हवा.

सोन्यापेक्षा सोन्यासारख्या मुली जास्त महत्वाच्या आहेत आणि त्यांना जास्त जपायला हवं.

वर्षा हेमंत फाटक, पुणे

- Varsha Hemant Phatak





« Prev