कविता : पाणी
काय बाईसारखा रडतोस रे
शोभत का तूला
हे शब्द ऐकले
आणि तो बावरला
डोळ्यात पाणी आलेले
तिथेच थोपवले
डोळे नीटपणे कोरडे
केले
काळजात कळ आली
आणि गेली
कोणालाही न
जाणवताच विरली
वडील ताठपणे उभे होते
चेहर्यावरचे भाव
मात्र
केविलवाणे होते
आईचे सर्व कार्य
नीट पार पाडले
तेरवीला बरेच लोक
जेवले
हृदयावर दगड ठेवून
सर्व काही निभावले
डोळ्यात एक टिपूसही
ना आणले
दोघे मोठे धीराचे
समाजात कौतुक झाले
अश्रू वाळून मग
सुकूनच गेले
रात्री बाबा फिरुन येतो
म्हणाले
सोबतीला त्याला घेऊन
गेले
विहीरीकाठी मन
मोकळे झाले
दोन पुरुषांना रडतांना
तिने पाहिले
सकाळी सगळे
आश्चर्य चकीत झाले
आटलेल्या विहीरीला
अमाप पाणी आले
वर्षा हेमंत फाटक, पुणे
- Varsha Hemant Phatak
« Prev
Next
»