बलुतं : पुस्तक परिचय


बलुतं काल परत एकदा वाचलं.

काही काही वाक्ये मनातून जातं नव्हती, जातीसारखीच!

'गावठी निवडुंगाला विलायती कॅकटस कलम करावं, तसं वाटतं'.

'ही जळजळ जेव्हा संपेल, तेव्हा स्वतःचच कलेवर घेऊन मी चाललो आहे, असं वाटेल आणि ह्यात मला मरणप्राय दुःख होईल',
पुस्तकाच्या शेवटी शेवटी हे वाक्य आहे. पुस्तक वाचल्यानंतर ह्या वाक्याचा खोलवर अर्थ समजून येतो.

पुस्तकात अजून एक वाक्य आहे
ते ठळकपणे जाणवतं आणि विचार करायला प्रवृत्त करतं. त्यांची आई म्हणते,
' लेका, तू आता लगीन कर. हवं तर घरात भंग्याची पोरगी आण, पण असा एकटा राहू नको!'
अंगावर काटा आला. म्हणजे खालच्या जातीचे, वरच्या जातीचे ही कीड सर्वांनाच पोखरून काढत होती. कधीतरी वाटतं जो समाज अन्याय सहन करतं होता तो पण अन्यायात भागीदार होताच! माणसातला अहंकार जातीच्या नावाखाली कुठपर्यंत पोसला जात होता.

जातीपातीचा उल्लेख, सवर्ण, राजकारण यापेक्षा अशिक्षितपणा, निरक्षरता, व्यसनाधीनता आणि स्वतःच्या समाजाप्रति असलेली त्याच समाजातील शिक्षित लोकांची उदासिनता या गोष्टी पुस्तक वाचतांना डाचायला लागल्या. हे घटक एखाद्या समाजाची पिछेहाट करण्यात कारणीभूत ठरतात. छळ, पिळवणूक ही समाजाला लागलेली कीड आहे, ही कीड समाज पोखरुन काढते. किती असहनीय आणि कल्पनेपलिकडच्या घटना वाचक अनुभवतो.

पुस्तक आधीही वाचलं होतं पण सध्या जो आरक्षणाचा प्रश्न गाजतो आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक काही मुद्द्यांवर ठळकपणे प्रकाश टाकतं.
खरंतर 24 डिसेंबर 1978 साली पहिली आवृत्ती निघाली. आता खूप बदल झाले आहेत समाजात. वैचारिक आणि शैक्षणिक झालेले बदल जास्त महत्वाचे आहेत. हे पुस्तक वाचतांना नकळतपणे तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यांत तुलना होते आणि कुठेतरी समाधान वाटतं की आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक परिस्थिती आता बदललेली आहे पण आरक्षणाचा मुद्दा का संपत नाही. आरक्षणाची इच्छा का? हा भेदभाव नाही का? जमीन अस्मानाचा फरक कधी नष्ट होणार? जातीचे राजकारण केव्हा संपणार?समाज असाच धगधगत राहाणार?

दादा, तात्या, आई, आजी, सई, हरी, गऊ, सलमा या व्यक्ति आणि त्यांच्या संदर्भातील एकेक घटना विचार करायला भाग पाडते. कधी कधी नायकाचा राग येतो, अनादर वाटायला लागतो त्याच्याबद्दल आणि मग अचानक सिनेमातील हीरो आठवले, ते कुठे धुतल्या तांदूळासारखे स्वच्छ आहेत? त्यांचे सिनेमे आवडीने बघतोचं नं! मग एका लेखकाकडून ही अपेक्षा का?दगडू आणि दया एकच आहेत नं?
की कुठेतरी जिवंत माणसाला नागडे करायचे पाप माथ्यावर घ्यायला नको म्हणून हा फार्स?
पुस्तकातले काही प्रसंग डोळ्यात पाणी आणतात. होस्टेलमधला आई आणि बहिणीशी संबंधित प्रसंग लिहायला धैर्य लागतं. मन हेलावून जातं. अपमानास्पद प्रसंग, स्वतःच्या चूका हे कबूल करणे मला महत्वाचे वाटले.
कावाखान्यातील प्रसंग वाचले की आपण एका दुसर्‍या दुनियेत जातो. ही नक्कीच जगावेगळी दुनिया आहे पण परिकथेतील नाही.
माणसे अशीही जगतात?

स्त्री - पुरुष संबंध, वैवाहिक जीवन, तरुणवयात मनात निर्माण होणाऱ्या लैंगिक इच्छा यावर १९७८ साली लिहिलेले आहे. लेखकाच्या या निडरतेचे आश्चर्य वाटते.

इथे परत एक गोष्ट ठळकपणे दिसून आली ती म्हणजे नायकाची आई, गऊ, सई यांची होणारी ससेहोलपट!
म्हणजे तिथेही अन्याय सहन करण्यात बायकांचा वरचा नंबर!
समाज, जाती कोणत्याही असोत शेवटी पुरुषप्रधान संस्कृती असतेच असते हे जागतिक सत्य प्रखरतेने जाणवले. 'पुरुषानं रांडबाजी करणं म्हणजे छातीवर एखादं मेडल लटकावणं, असाच समज भोवताली होता.' हे वाक्य सत्यपरिस्थिती सांगून जातं.

दगडू अतिशय सामान्य वाटतो पण हे सगळे खरेपणाने लिहून असामान्य झालेले दया पवार विलक्षण मात्र वाटायला लागतात.

पु. ल. देशपांडे यांनी शेवटच्या पानावर लिहिलेल्या ओळी सगळं काही सांगून जातात.


वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »