मागच्या महिन्यातील गोष्ट आहे. सकाळी पेपर आला तर फाटलेला दिसला. बघते तर साॅफ्टटच ची अॅड होती आणि पाऊच काढून घेतलेला दिसत होता. मी अहोंना म्हणाले की पेपरवाल्याला फोन करून सांगा की त्या मुलाने पाऊच काढून घेतला आहे ते.
हे म्हणाले की मी तूला दूसरा आणून देतो नंतर पण आत्ता शांतपणे पेपर वाचूदे आणि एवढ्याशा पाऊच ने काय फरक पडतो. जाऊ दे त्याने ठेवला असेल. झालं आगीत तेल!
मी लगेच त्याच्या मालकाला फोन केला. दहाव्या मिनिटाला पाऊच आणून दिला आणि साॅरी चुकून झाले असे म्हणाला. मी पण जास्त ताणले नाही. मला म्हणाला की काकू मी घरी गेलो होतो परत आलो या पाऊचसाठी. मला उगीचच कानकोंड्यासारखे झाले. जिथे तिथे उगीचच नियम पाळतो आपण. रुखरुख लागून राहिली मनात.
पण संध्याकाळी सगळ्या मैत्रीणी भेटलो तेव्हा कळले की त्याने कोणाकडेच पाऊच दिला नाही. आधीच काढून घेतले होते. फक्त माझ्याएवढी तत्परता कोणी दाखवली नव्हती. प्रश्न १०/१२ रुपयांचा नव्हताच. ह्या वृत्तीचा राग येतो. विचारलं असतं तर सर्वांनी दिलंच असत. न विचारता परस्पर काढून घेतल्याचा सर्वांना राग आला होता. सगळ्यांनी मग तक्रार केली. कारण कंपनीची आणि ग्राहकांची दोघांचीही फसवणूक एका नववीतल्या मुलाने केली होती आणि इतका लहान मुलगा पेपर टाकतो म्हणून आम्हांला त्याचे कौतुक होते. पण भ्रमनिरास झाला आमचा. नंतर मात्र मी स्वतःची पाठ थोपटली. कारण कुठेतरी त्या मुलाला त्याची चूक समजली असेल असं वाटलं आणि या घाणेरड्या वृत्तीला आळा बसेल.