खरं कौशल्य कशात?


कौशल्य म्हणजे एखाद्या गोष्टीत निपुण असणे. ती गोष्ट शंभर टक्के त्या व्यक्तीला जमणारंच, ती त्या कामात यशस्वी होणार हा ठाम विश्वास असणे म्हणजे कौशल्य!

शिल्पकार, मूर्तीकार, चित्रकार त्यांच्या क्षेत्रात निपुण असतात पण त्यांच्याही कामात खाचाखोचा काढणाऱ्या टीकाकारांचे मला जास्त नवल वाटते. एखादी सुंदर गोष्ट बघितली की आपण हरखुन जातो पण टीकाकाराचा अॅंटीना हा तयारच असतो. टीका करण्यात त्याने कौशल्य प्राप्त केले असते. टीका करणे हा त्याचा धर्म किंवा धंदा असतो. बरं त्यातलं खुप समजंत असतं असेही नाही पण टीका करण्यात तो पटाईत असतो. टीका केली की त्याला बरं वगैरे वाटायला लागतं. तो खुश होतो. बोचरी टीका करायला पण कौशल्य लागतं. बाण जिव्हारी लागलांच पाहीजे.

पण या टीकाकारांच्या टीकेला सडेतोड उत्तर देणारे महाभागही असतात. ते या टीकाकारांचे तोंड पद्धतशीरपणे बंद करतात. टीकाकारांची बोलती बंद होते. हे खरे कौशल्य! शेरास सव्वाशेर!
कारण काय टीका ही कधी सकारात्मक असते तर नकारात्मक! टीकेकडे बघण्याचा दृष्टीकोन ही महत्त्वाचा आहे.
नकारात्मक टीकेला सकारात्मकतेने उत्तर देण्याचे कौशल्य सामान्य माणसाने आत्मसात करणे गरजेचे आहे. नाहीतर टीकेच्या ओझ्याखाली दबून गुदमरायला वेळ लागणार नाही.

दुसरे कौशल्य मला वाटतं माणसे जोडून ठेवण्यात आहे. आयुष्यात विविध प्रकारच्या माणसांना तोंड द्यावे लागते. काही प्रेमळ, काही रागीट तर काही मुर्खही असतात. सगळ्यांशी जमवून घेणे सोपे नसते. हे कम्युनिकेशन स्किल प्रत्येकाजवळ नसते. कधी गोड बोलून, अपमान गिळून तर कधी स्पष्ट बोलून हे काम करावे लागते. हे कौशल्य तुमचे आयुष्य सुखकर करुन जातं. एखादी व्यक्ती अबोल असते म्हणजे ती माणूसघाणी असते असे नाही. प्रत्येकाचा स्वभाव असतो. तसंही आपल्यातील त्रुटींवर मात करून समोर जाण्यातच खरं कौशल्य आहे. जो यशस्वी होतो त्याच्या कौशल्याला दाद दिली जाते, जो हरतो त्याने नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येण्याचे कौशल्य दाखवले तर सिकंदर बनायला वेळ लागणार नाही.

अयशस्वी माणसाला आधार देऊन त्याला हुरुप देणे, आशेचा किरण दाखवणे ह्यात मला वाटतं खरं कौशल्य आहे.

शेवटी काय 'स्वतःच्या मुल्यांशी प्रामाणिक राहून कसे जगायचे' जगण्याचे हे कौशल्य अंगिकारले की आयुष्य नक्कीच सुंदर भासेल.

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »