कॉफी सिनेमा : परिक्षण

कॉफी सिनेमा : परिक्षण

काल सहजच वेळ होता म्हणून कॉफी नावाच्या सिनेमावर क्लिक केलं. कोण कलाकार आहेत, दिग्दर्शक कोण आहे काहीच माहिती नव्हते आणि अजिबात कुठेही सर्च केले नाही. आवडला तर बघायचा नाही तर बंद करायचा. सुरवातीला स्पृहा जोशी दिसल्यावर जरा बरं वाटलं. मग चांदेकर दिसला आणि जरा इंटरेस्ट वाटायला लागला आणि खरं सांगते मी गुंतत गेले त्या सिनेमात! कधीतरी वाटायचं हा सिनेमा आता कभी अलविदा ना कहना च्या मार्गाने जाणार कधीतरी वाटलं हा डर सारखा होतो की काय? चांदेकरचे मृत आईशी बोलणे वगैरे पाहून. पण चांगला अपेक्षाभंग झाला.

तिघांचाही अतिशय तरल अभिनय, संवाद उत्तम, कशमकश तर खूप छान दाखवली आहे. कुठेही भडकपणा नाही. गाणी पण गोड आहेत.
फक्त नवरा करिअरच्या मागे लागला आहे, वेळ देत नाही म्हणून एवढी समजूतदार बायको दुसर्‍या माणसाच्या कशी काय लगेच प्रेमात पडू शकते? नवरा करिअरच करतो आहे नं? इतर बायकांच्या मागे तर फिरतं नाही आहे. म्हणजे हे समजण्याएवढी ती नक्कीच समंजस असते पण तरी तिला वाटतं की आधीसारखा दोघांच्या नात्यात फ्रेशनेस उरलेला नाही आहे. आणि तो फ्रेशनेस तिला चांदेकरच्या सोबत राहून मिळतो. एक क्षणभर तिचा राग येतो आणि मनात विचार येतो एवढी कशी ही उथळ आहे?आणि चांदेकरला प्रेमात पडायला फक्त एक विवाहीताच मिळते?
पण सिद्धार्थ चांदेकर आणि तिची केमिस्ट्री जमलेली पाहून कुठेतरी ते नातं खरं वाटायला लागतं पण अजुन दहा वर्षांनी ह्या दोघांच्याही नात्यात फ्रेशनेस उरला नाही तर? समाज कुठे चालला आहे? हा प्रश्न धडकी भरवतो.

तिच्या डोळ्यांतील उत्कटता, अपराधीपणाची भावना जाणवतं राहते. खासकरून ती जेव्हा नवऱ्याला सर्व प्रामाणिकपणे सांगते तेव्हा. दोघांचाही अभिनय जबरदस्त!!
नात्याला वेळ देण, फ्रेशनेस वगैरे या गोष्टींचे आमच्या पिढीला आश्चर्य वाटते. शिळ्या कढीला ऊत आणण्याची कला माहीत असलेली आमची पिढी! हा पिढीतील विचारांचा फरक म्हणता येईल.
आजच्या पिढीला या फास्ट फास्ट जगात या सर्व गोष्टीची गरज जास्त भासत असेल.
शेवटी दोघांना पटतं की ते त्यांच्या नात्याला फ्रेशनेस नाही देऊ शकले, पण कथा इथेच संपत नाही कारण दोघांचा एकमेकांवर अतूट विश्वास आहे आणि तिचा नवरा तिला एका रात्रीसाठी तिच्या प्रियकराकडे जायची परवानगी देतो, पटतंच नाही पण त्या आधी तो तिला विचारतो की तू एकाचवेळी दोघांवर कसे काय प्रेम करु शकतेस?
स्पृहा जोशी आणि कश्यप परुळेकर दोघांचे संवाद ऐकत राहावे असे. अभिनय उत्तमच! (मी कश्यप ह्या कलाकाराचे नाव प्रथमच ऐकले) . इथे आपल्याला स्पृहा जोशीची तगमग, हतबलता तिच्या डोळ्यात दिसते आणि सुरवातीला तिला दोषी ठरवणारे आपण तिच्या ओढाताणीत सामील होतो. ती कुठेतरी बरोबर वाटायला लागते आणि शेवटी ती प्रियकराकडे जाते. परत धक्का बसतो ते ती योग्य क्षणी कॉफी मागवते तेव्हा आणि आपण निश्वास सोडतो. ती नवऱ्याकडे परत येते, कायमची! स्पृहाबद्दल सकारात्मकता मनात उतरतं जाते आणि तिचा नवरा स्वप्नातीत वाटायला लागतो आदर्श वगैरे!!

पण शेवटी जेव्हा चांदेकरचे त्याच्या आईशी झालेले संवाद ऐकतो तेव्हा स्पृहा आणि कश्यप यांच्यासमोर चांदेकर खूप मोठा वाटायला लागतो किंबहुना त्याच्या प्रभावातचं सिनेमा संपतो. अनपेक्षितपणे!!

म्हणजे काय त्रिकोणातील तिन्ही कोन कसे आहेत यावर त्या त्रिकोणाचा आकार ठरतो. समभूज त्रिकोण बघायला छानच वाटतो.

वेळ असेल तर एकदा पहायला हरकत नाही.

वर्षा हेमंत फाटक

- Varsha Hemant Phatak





« Prev Next »